सुश्री सुनिता गद्रे
पुस्तकावर बोलू काही
☆ सांगावा… श्री सचिन वसंत पाटील ☆ परिचय – सुश्री सुनिता गद्रे ☆
पुस्तकाचे नाव- सांगावा
लेखक -श्री सचिन वसंत पाटील
पृष्ठ संख्या -135
मूल्य- दोनशे रुपये.
अलीकडेच सांगावा हा खूप चांगला कथासंग्रह वाचनात आला.कर्नाळ या सांगली जवळच्या एका छोट्या गावात राहणारे लेखक सचिन पाटील यांचा!… त्यांना नुकताच भेटण्याचा योग आला. अक्षरशः विकलांग अवस्थेत जगणारा, सगळ्या विपरीत परिस्थितीशी लढणारा हा योध्दा!…त्याच्याबरोबरच्या नुसत्या बोलण्याने सुद्धा आपल्यात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.’ सांगावा ‘या कथासंग्रहाची मी वाचली ती चौथी आवृत्ती ! दहा वर्षात चौथी आवृत्ती निघणे ही कुठल्याही नवोदित लेखकाला अभिमान वाटावा अशीच गोष्ट आहे.
श्री सचिन वसंत पाटील
संग्रहातील सर्व कथा ग्रामीण जीवनाचा चेहरा मोहरा दाखवितात. यात एकूण बारा कथांचा समावेश आहे .कथा बीजाची दोन रूपे येथे आढळतात. पहिले रूप म्हणजे आजच्या खेड्यातील मूल्य संस्कृतीचा होऊ घातलेला -हास आणि दुसरे म्हणजे बदलत्या परिवर्तन प्रक्रियेत माणूस, माणुसकी,नाती, निती,आणि माती पण टिकली पाहिजे हा लेखकाचा दृष्टिकोन. या दोन कथा बीजांभोवती ‘सांगावा’ कथासंग्रहातील कथांचे वर्तुळ तयार झाले आहे.
संग्रहातील भूल ही पहिली कथा! स्वतःच्या हाताने जीवनाची शोकांतिका करणाऱ्या शेतकऱ्याची अंधश्रद्धा, अडाणी समजूत यातून ती साकारली गेलेली आहे. हणमा शेतकरी ऐकीव गोष्टीला बळी पडून ,आपल्या संसाराला रान भूल लागू नये म्हणून भ्रमिष्टासारखा जेव्हा आपल्या शेतातील वांग्याचे बहारातील पीक उध्वस्त करून टाकतो, तेव्हा वाचकाला खूप हळहळ वाटत राहते.
दुसरी कथा ‘काळीज’! ग्रामीण परिसरात ‘सेझ’चे आगमन आणि कृषी जीवनाची फरपट लेखकाने येथे चित्रित केली आहे. शामू अण्णा ,काळी आईचे जिवापाड सेवा करणारा शेतकरी! पण त्याचाच मुलगा जेव्हा त्यांना न विचारता जमीन विक्रीची परवानगी देतो, तेव्हा तो खचून जातो आणि वेडा बागडा बिन काळजाच्या, निर्जीव बुजगावण्यागत जगत राहतो. कथा वाचकाच्या काळजाला एकदम भिडते.
‘पावना ‘कथेत खेडेगावातल्या जीवन मूल्यांचा -हास चित्रित होतो. कितीही कष्ट, त्रास झाला तरी आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करणे, त्याला आधार देणे ,विचारपूस करणे हा ग्रामीण माणसाच्या मनाचा मोठेपणा कालौघात ग्रामीण माणसाकडून हिरावला गेलेलाआपल्याला या कथेत दिसतो.
‘मांडवझळ ‘ही एका लाली नावाच्या पाळीव कुत्रीची कथा! ती कुत्रीच येथे सगळं विषद करतेय. भरल्या घरात, लग्न समारंभा दिवशी त्या बिचारीला किती अग्नी दिव्यातून जावे लागले, किती यातना सोसाव्या लागल्या हे वाचून मन विषण्ण होते.त्या पाळलेल्या बिचारीला खायला द्यायची पण कोणाला सवड आणि आठवण नाहीय. तिचे झालेले हाल आणि अगतिकता बघून मुक्या प्राण्यांना भूक असते, भावना असतात त्यांचे मन समजून घ्या असा मोलाचा संदेश ही कथा देते.
‘वाट ‘कथेत मोठ्या बाहुबली शेतकऱ्याने जाण्या-येण्याच्या वाटेसाठी एका गरीब शेतकऱ्याची लावलेली वाट….आजही शेतकऱ्यांच्या नशिबीचा वनवास कसा असतो हे दाखवते.
‘धग’ ही संभा या कष्टाळू प्रामाणिक इस्त्री वाल्याची कथा आहे. त्याच्या जीवन प्रवास बघता, साध्या सरळ स्वभावाच्या माणसांची ही शोकांतिकाच असते काय?.. की त्याला उन्हाळ्याची धग, पोटातील भुकेची धग, न मिळालेल्या मायेची धग यात पिळपटून टाकलं जातं… असा प्रश्न मनात उभा राहतो.
मरणकळा ही नव्या जुन्या पिढीतील खाईची कथा. कथा नायकाला कितीही वाटलं तरी पत्नी विरुद्ध जाऊ न शकल्याने वडिलांचे होणारे हाल.. आणि त्यामुळे वडिलांच्या बरोबरच हळव्या मनाचा तो मरण कळा सोसतोय हे वास्तवाचं विदारक चित्रण येथे आहे.
‘सय’ एक स्वप्न कथा आहे. आपल्या आजोळी गेलेल्या सहा, सात वर्षाच्या मुलाची सय कथा नायकाला किती विचित्र स्वप्न पाडते हे लेखकाने छान रंगवले आहे.
‘चकवा’ ही खेड्यातील प्रेमाचा चकवा देणारी कथा! बाजारातून घरी जाणाऱ्या बज्याला लग्नाचा चकवा, स्त्री भेटल्याचा चकवा, अंधाराचा चकवा इत्यादी प्रतिमांमधून समाजातील अंधश्रद्धा, भूत, पिशाच्यावर विश्वास यावर प्रकाश टाकला आहे.
‘ओझ’एक सुंदर कथा आहे. गावातून शहरात जाऊन खूप मोठा आणि धनाढ्य झालेला मुलगा .गावात पंचवीस वर्षानंतर येऊन गावाचं… बारा बलुतेदारांचं आपल्यावर असलेलं ओझं उतरवतो खूप खुमासदार पद्धतीनं गावाचं चित्र रंगवलं गेलंय.
सांगावा ही संग्रहातील शीर्षककथा! मातृ हृदयानं आपल्या प्रिय पुत्रासाठी, किंबहुना हा एका पिढीने दुसऱ्या पिढीला दिलेला सांगावा आहे. आपल्या निर्वसनी मुलाला नाईलाजानं आईनं शहरात पाठवलंय. चार पैसे कमावले तर कर्ज फिटेल, गावात शेती करून मानानं राहता येईल हा त्यातला विचार. पण शहरातील छंदी-फंदीपणा,व्यसनं या सगळ्यामुळे पैसा हातात आला की नको ते करणं, संगतीचा परिणाम, सखू म्हातारीच्या मनात असंख्य चित्रे तयार होतात. नको तो पैसा नको ते शहरात रहाणं !पोराला बहकू द्यायचं नसतं. शेवटी मुलाला सांगावा देते”जसा असचील तसा घराकडे निघून ये.”ही कथाही काळजाला जाऊन भिडते.
आशय, अभिव्यक्ती भाषा मूल्य याने सांगावा कथा संग्रह वाचकांचे लक्ष खिळवून ठेवतो. लेखक सचिन पाटील यांनी ग्रामीण संस्कृती, लोकसंकेत, व्यक्ति, प्रवृतीचं दर्शन मोठ्या सूचकतेने केलं आहे. बोलीभाषा, निवेदनातील सजगता ,सहजता, घडलेला प्रसंग साक्षात् डोळ्यासमोर उभा करण्याची धाटणी खूपच वाखाणण्याजोगी आहे .एक उत्कृष्ट कथासंग्रह वाचल्याचा आनंद ‘सांगावा’ निश्चितच देतो.
** समाप्त**
परिचय – सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈