सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
☆ पुस्तकावर बोलू काही ☆ कुत्रा छंद नव्हे संगत – भाग-2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
“कुत्रा छंद नव्हे संगत “पुस्तकाचे अंतरंग भाग २
पहिल्या प्रकरणात कुत्रा आणि माणसाचा संबंध कसा आहे याचे दाखले दिले आहेत. वेदकाळात सरमा ही इंद्राची कुत्री आणि शामला आणि अबला ही तिची दोन पिल्ल.तसेच धर्मराजाचे श्वानप्रेम, दत्तात्रेयांजवळचे चार कुत्रे, शिवाजी महाराजांच्या वाघ्याची स्वामिनिष्ठा, शाहू महाराजांचा खंड्या अशी कुत्र्याबद्दलची आदरणीय उदाहरणे त्यांनी सांगितली आहेत. त्याचप्रमाणे युद्धभूमीवर काम करणारी श्वानपथके ,त्यांचे पराक्रम , पोलिसांना गुन्हेगार पकडण्यात मदत करणारे, अनेक ठिकाणी हेरॉईन स्फोटकांचा शोध घेणारे, मेंढ्यांच्या कळपावर राखण करणारे अशी कुत्र्यांच्या महती ची अनेक उदाहरणे त्यांनी दिली आहेत, चर्चिल यांचे लिखाण लॉर्ड बायरनच्या कविता श्वानाच्या सानिध्यातच झालेल्या आहेत.
कुत्रा घरात आणताना निवड कशी करावी , घराचा आकार, पाळण्याचा हेतू, आरोग्य कसे राखावे, शिक्षण कसे द्यावे, वेगवेगळ्या कुत्र्यांच्या जाती, रंग, बांधा, रुप, स्वभाव यासह माहिती त्यांनी आपल्या पुस्तकात सोप्या पद्धतीने सांगितली आहे. हाॅलीवुड मधील कोली जातीचा लसी कुत्रा कसा श्रीमंत झाला त्याचे रसदार वर्णन केले आहे.
श्वान प्रदर्शनांना सुरुवात कशी झाली, केंनेल क्लब मध्ये कुत्र्यांच्या कुटुंबाचा इतिहासात कशी नोंद होते ,स्पर्धेचे परीक्षक कसे गुण देतात त्यांचे फॅन्सी ड्रेस, सगळ्या गोष्टींप्रमाणेच श्वान प्रदर्शन का भरवली जातात, त्यांचे फायदे काय, हेही सांगितले आहे. पुस्तकात त्यांनी आपल्या प्रिन्स ला शिकविताना चे फोटो व अनेक जातींच्या कुत्र्यांचे फोटो दिले आहेत.
युद्धभूमीवर अनेक सैनिकांचे प्राण वाचविण्याचे पराक्रम केलेल्या कुत्र्यांची नावे आणि मर्दूमकीही वर्णन केली आहे. त्याचप्रमाणे पोलीस खात्यातही जिथे पोलीस शोध घेऊ शकत नाहीत, तेथे कुत्रा कशी मदत करतो याची उदाहरणे वाचताना तोंडात बोट घातले जाते.
कुत्र्यांचे आजार त्यावर पथ्य आणि होमिओपाथी ची औषधे ही त्यांनी सांगितली आहेत. पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात अनेक श्वान प्रेमींचे प्रश्न आणि त्यावर दिलेली उत्तरे यातून कितीतरी माहितीचे भांडार मिळते.
श्वान धर्माच्या उदाहरणाचा भाग पुढील भागात
क्रमशः….
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈