श्री कचरू सूर्यभान चांभारे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “ज्ञात अज्ञात अहिल्याबाई होळकर” — लेखिका : सुश्री विनया खडपेकर ☆ श्री कचरू सूर्यभान चांभारे ☆

पुस्तक .. ज्ञात अज्ञात अहिल्याबाई होळकर

लेखिका .. विनया खडपेकर

प्रकाशक .. राजहंस प्रकाशन पुणे

प्रथमावृत्ती  2007

सातवी आवृत्ती: एप्रिल २२

पृष्ठे …288

अहमदनगर आता अहिल्यानगर नगर म्हणून ओळखलं जाईल….ज्या कर्तुत्वान मातेचे नाव या जिल्ह्याला देण्यात आले आहे …त्या  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील हा ग्रंथ !

ग्रंथाचा आरंभ करताना लेखिका विनया लिहितात की ….

अहिल्याबाई होळकर…

ती सत्ताधारी होती .पण ती सिंहासनावर नव्हती.ती राजकारणी होती पण ती सत्तेच्या चढाओढीत नव्हती.

ती पेशव्यांची निष्ठावंत होती पण ती त्यांच्यापुढे नतमस्तक नव्हती.

ती व्रतस्थ होती पण ती संन्यासिनी नव्हती.

जेव्हा लढाई हे जीवन होते आणि लूट हा जेत्याचा धर्म होता, हुकूमत हा सत्तेचा स्वभाव होता ,तेव्हा..

तिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटांमधून उमटले. तिच्या जीवनदायिनी प्रेरणेने तळी, अन्नछत्रे, धर्मशाळा असे रूप घेतले. तिच्या अनाक्रमक धर्मशीलतेचे मंगल प्रतिध्वनी भरतखंडाच्या मंदिरामंदिरातून घुमले…. मात्र ती सर्वगुणसंपन्न देवता नव्हती, तर तिला माणुसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या.

… लेखिकेने अहिल्याबाई चरित्र ग्रंथ मांडताना हा जो पहिलाच परिच्छेद लिहिला आहे ,त्यात ग्रंथाचे सार आहे, तसेच लोकमातेचेही जीवनसार आहे.

युगपुरूष ,लोककल्याणकारी राजांची आई राजमाता जिजाऊसाहेब, मुत्सद्दी येसूबाई राणीसाहेब, भद्रकाली ताराराणी मातोश्री  ,लोकमाता अहिल्याई ,झाशीची राणी लक्ष्मीबाई, अशा अनेक नारी नररत्नांनी इतिहासाच्या पानावर अतुलनीय छाप सोडलेली आहे. दुर्दैवाने त्या काळात स्त्रियांविषयी लिहून ठेवण्याची रीत नव्हती किंवा लिहिलं तरी भरभरून लिहावं अशी वहिवाट नव्हती. त्यामुळे नारी वंशात जन्माला येऊन  आणि नरश्रेष्ठाहून काकणभर अधिकची कामगिरी करूनही या अग्निरेखा थोड्या दुर्लक्षितच राहिल्या. अलीकडील काळात बरेचसे लेखन झाले आहे ,हा भाग वेगळा.

कुंभेरीच्या लढाईपासून लेखिकेने या चरित्र कादंबरीची सुरूवात केली आहे. सुरजमल जाटासोबत चाललेली ही लढाई अंतापर्यंत पोहचत नव्हती. निकराची झुंज चालू होती पण अंतिम परिणाम येत नव्हता. दुर्दैवाने १७ मार्च १७५४ रोजी  भर दुपारी अत्यंतिक दुर्दैवी घटना घडली. फिरत्या तोफेतून आलेला एक गोळा खंडेराव होळकरांच्या वर्मी बसला ,अन् होळकरशाहीच्या एकुलत्या एक खांबास उद्धवस्त करून गेला. खंडेरावांच्या जाण्याने मल्हारबाबा कोसळून पडले. उणंपुरं तिशीचं वय ,पदरात दोन लेकरं असताना अहिल्यामाईस वैधव्य आलं. धार्मिक आचरणाचा पगडा असलेल्या अहिल्यामाई सती जाण्याचा निर्णय घेतात पण मल्हारबाबा त्यांना परावृत्त करतात. संसार हे मिथ्या मायाजाळ असल्याचे एक मन सांगत असले तरी लहानग्या मालेरावातून व लाडक्या मुक्ताईतून लोकमातेचा जीव निघत नव्हता. मल्हारबाबा हे अहिल्यामाईस गुरू होते, पिता होते. त्यांच्या आज्ञावजा विनंतीचा मान ठेऊन अहिल्याई मागे थांबतात.

धर्मपरायण राज्यकारभार करताना अहिल्यामाईंनी प्रजेवर पुत्रवत प्रेम केले.त्यांच्या आयुष्यातील सर्व प्रसंग, घटना लेखिकेने सविस्तर मांडल्या आहेत. अहिल्यामाईंचे चरित्र मांडताना थोरले बाजीराव पेशवे ते दुसरा बाजीराव पेशवा असा अठराव्या शतकाचा राजकीय पट लेखिकेने वकुबाने मांडला आहे. शिंदे व होळकर हे पेशवाईचे दोन नेत्र होते. शिंदे-होळकरातील संघर्ष ,दुरावा व जवळिकताही लेखिकेने मांडली आहे. कर्तबगार राज्यकर्ती व धर्मपरायण पुण्यश्लोक म्हणून अहिल्यामातेस दोन बाजू आहेत. या दोघांचाही सार ग्रंथात आला आहे.

मल्हारबाबा व मालेरावांच्या मृत्यूनंतर राघोबादादा इंदूर संस्थानावर वरवंटा फिरविण्याच्या विचारात असतात. अर्थात याला माधवराव पेशव्यांची संमती नसते. पण तरीही पेशवेपद न मिळाल्यामुळे अस्वस्थ राघोबा काहीतरी अचाटच उद्योग करत असतात. त्यांच्या या निकृष्ट चालीला अहिल्यामाईंनी मुत्सद्दीपणे प्रतिशह दिला, या घटनेला तोड नाही. पण पुढे राघोबादादा दुर्दैवाच्या फे-यात अडकतात. नारायणराव पेशव्यांच्या खुनानंतरही बारभाई कर्ते राघोबास पेशवाईची वस्त्रे मिळू देत नाहीत. गोरे अस्वल (इंग्रज ) राघोबाला गुदगुल्या करत ,स्वतःच्या जाळ्यात ओढतात. राघोबा भरारी फरारी जीवन जगत असताना   राघोबाच्या पत्नीस म्हणजे आनंदीबाईस आसरा देतात. राघोबाच्या पापाच्या छायेची आठवण न करता मायेची छाया देतात…. हे सगळेही या पुस्तकातून समजते. 

धार्मिक कार्य करताना अहिल्यामाईंनी राज्याची सीमा लक्षात घेतली नाही. पश्चिम टोकाच्या गुजरातच्या सोरटी सोमनाथपासून ते अति पूर्वेच्या जगन्नाथ पुरीपर्यंत ,समुद्र काठच्या रामेश्वर दक्षिण तीरापासून ते उत्तरेत अयोध्या ,बद्रीनाथ, गया ,मथुरा अशी सर्वत्र मंदिराची बांधकामे, नदीवरील घाट, धर्मशाळा, अन्नछत्रे लोकमातेने घडवून आणली. त्यांचा न्यायनिवाडाही चोख होता. चोर ,पेंढारींचा बंदोबस्त करताना शिक्षा करण्याऐवजी त्यांच्या हाताला काम उपलब्ध करून देऊन ,विघातक हात ,विधायक हात बनविले.

प्रजाहितरक्षक लोकमातेचे कार्य देवगणातले असले तरी मनुष्य गणातले दुःख त्यांना चुकलेले नव्हते. सत्तर वर्षाच्या दीर्घ आयुत त्यांनी दोन डझनाहून अधिक जवळच्या लोकांच्या मृत्यूचे कडवट घास गटगट गिळले. पती खंडेरावांचा आभाळदुःख देणारा मृत्यू, पतीसोबत सती गेलेल्या स्त्रियांचे मृत्यू, पितृछत्र देणारे सासरे मल्हारबाबा, पुत्र मालेराव, सासू गौतमाबाई, सती गेलेल्या सुना, जावई यशवंत फणसे, नातू नथोबा ,लेक मुक्ताईचं सती जाणं ,सुभेदार तुकोजी होळकरांच्या पत्नी रखुमाईचा मृत्यू …..असे किती प्रसंग सांगावेत…  मृत्यूचे कडवट प्याले रिचवत रिचवत मातोश्रींचे जीवन पुढे पुढे सरकत होते. मुक्ताईच्या मृत्यूनंतर मात्र लोकमाता खरोखरीच खंगल्या होत्या. त्यानंतर अल्पावधीतच लोकमातेचा देह निष्प्राण झाला.

अखेरचे पर्व व उपसंहार या शेवटच्या दोन प्रकरणात लोकमातेच्या कर्तृत्वाचा अर्क मांडला आहे. वाचकाने शेवटचं  लेखनतीर्थ जरूर प्राशन करावं.

ऐतिहासिक शब्दांचे अर्थ देण्यासाठीही लेखिकेने आठ पाने खर्ची घातली आहेत.अनेक ऐतिहासिक संज्ञा स्पष्ट होण्यासाठी हा दस्तऐवज उत्कृष्ट आहे. ‘ अहिल्यामाईंचे जनकल्याण कार्य ‘ ही यादी वाचताना त्यांच्या आसेतुहिमाचल नवनिर्माणाची आपल्याला कल्पना येते. त्यानंतरच्या पानावर लोकमातेच्या जीवनातील ठळक घटनांचा तपशील तारीखवार मांडला आहे. संदर्भ सूची वाचताना लेखिकेच्या परिश्रमाची कल्पना येते. व शेवटच्या पानावर आपल्याला लेखिकेचा परिचय वाचायला मिळतो.

बीड-अहमदनगरच्या सीमेवर छोट्या गावात जन्मलेली एक ग्रामकन्या, पेशवाईच्या मातब्बर सुभेदाराची सून होऊन परराज्यात जाते, दुःखाचे अगणित कढ झेलत होळकरशाहीचा ध्वज लहरता ठेवते, आदर्शाचे नवनिर्माण पीठ तयार करत पुण्यश्लोक बनते…. हा अहिल्यामाईंचा जीवनप्रवास रोमांचकारी व प्रेरणादायी आहे. ‘ ज्ञात-अज्ञात अहिल्याबाई ‘ वाचत असताना अज्ञात असलेल्या अनेक गोष्टी ज्ञात होतात.एवढे मात्र खरे. “ ज्ञात-अज्ञात “  एकदा तरी वाचावेच ,अशी विनंती करतो.

पुण्यश्लोक लोकमातेस स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.

परिचयकर्ता – श्री कचरू सूर्यभान चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments