सौ.अस्मिता इनामदार
पुस्तकावर बोलू काही
☆ “जांभळमाया…” – श्री सुभाष कवडे ☆ परिचय – सौ.अस्मिता इनामदार ☆
नाव : जांभळमाया
लेखक : श्री सुभाष कवडे
माझा अभिप्राय मी देणारच आहे पण त्या आधी लेखकाने त्यांच्या मनोगतात जे सांगितलंय ते त्यांच्याच शब्दात : .. ” प्रत्येकाला आपलं बालपण आणि शालेय जीवन खूपच महत्वाचं वाटतं असतं. आपली जडण घडण खऱ्या अर्थाने याच काळात होत असते. आपली जन्मभूमी सभोवतालचे वातावरण, निसर्ग, समाज व्यवस्था, या साऱ्यांचा परिणाम आपल्या आयुष्यावर पडत असतो. यातूनच या काळात असे काही प्रसंग, घटना घडतात की ज्या आपण कधीच विसरू शकत नाही. बालपणीच्या काळातला सभोवातीचा निसर्ग, शिक्षणासाठी केलेली धडपड, या धडपडीतून मिळालेले बळ या साऱ्यांचा आपल्या मनावर विलक्षण प्रभाव पडतो. शालेय जीवनातल्या संघर्षमय घटना आपल्या आयुष्यात उर्जादायी ठरत असतात.”
त्यांचे बालपणीच्या जगाचे र्हृद्य दर्शन त्यांनी या पुस्तकात आपल्याला घडवले आहे. यात लेखांचे दोन भाग केले आहेत. पहिल्या भागात ते त्यांच्या – माझा माणदेश – जीवनाचा पूर्वार्ध मांडतात. यात एकूण ३१ गोष्टीरूपी लेख आहेत. भाषा सोपी व ओघवती आहे. वाचक जणू काही आपणच ती वास्तवता जगतोय असा रंगून जातो. ” भाकरीचा प्रवास “, ” ” करंजछाया “, ” आयुष्यातले संगीत “, ” माझा अक्षरांचा प्रवास ” हे लेख तर खूपच हृदयस्पर्शी आहेत. खरं तर हे लेख असे वेगळे करताच येणार नाहीत.
पुस्तकातील दुसरा भाग ललित लेखांचा आहे. यातील १५ ही लेख म्हणजे एकेक हिराच आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती ही उक्ती या लेखांमधून दिसून येते.
” ते एक मिनिट “, ” ओले मूळ भेदी, पाषाणाचे अंग “, हे लेख मनात घर करून राहतात.
” वाचन, ग्रंथ, माणूस आणि निसर्ग ” या सर्वांचे एकमेकाशी असलेले जवळीकतेचे नाते किती सुंदर शब्दात वर्णन केले आहे ते, तो लेख वाचल्यावरच समजेल. या लेखाच्या शेवटी ते म्हणतात – ” पुस्तकं घरात वाचता येतात. ग्रंथालयात वाचता येतात. मात्र माणसं व निसर्ग वाचण्यासाठी भटकाव लागतं. मग कधी झळा सोसाव्या लागतात तर कधी छानसा शिडकावा अंगावर येतो. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जसे हार – प्रहार सोसावे लागतात तसेच पुस्तकं, माणसं आणि निसर्ग वाचण्यासाठी आपणाला या वाचनाचा लळा लागावा लागतो ” तसेच ” रुमाल” हा लेख खरोखरीच वाचनीय आहे. रुमाल हा शब्द आपण किती सहजतेने वापरतो. हा उर्दू शब्द आहे. पण आपल्या जीवनात ती किती चपखल बसतो हे या लेखात समजते.
एकंदरीत हे पुस्तक आपण सगळ्यांनी वाचलंच पाहिजे.
या पुस्तकाला डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी दिलेली प्रस्तावनाही खूप सुंदर वाचनिय आहे.
परिचय – अस्मिता इनामदार
पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ, वखारभाग, सांगली – ४१६ ४१६
मोबा. – 9764773842
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈