पुस्तकावर बोलू काही
☆ “जोहड…” – लेखिका : सुश्री सुरेखा शहा ☆ परिचय – डॉ. मुग्धा सिधये तगारे ☆
पुस्तक – जोहड
लेखिका – सुरेखा शहा
‘Waterman of India’ म्हणून ओळखल्या जाणार्या राजेंद्र सिंह यांच्यावरचं हे चरित्रात्मक पुस्तक.फार वर्षापूर्वी लिहिलेलं. पुस्तकाची सुरुवात होते ती राजस्थानातील अलवर या जिल्ह्यातील एका दूरवरच्या खेड्यातून.हजार बाराशे वस्तीचं हे गाव पाण्याच्या दुर्भिक्षामुळे देशोधडीला लागलेलं असतं.शेतात फारसं पीक नाही,खायला अन्न नाही, सार्यांची पोटं खपाटीला गेलेली.म्हातारी व स्त्रिया मागे राहिलेल्या…पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन.. स्रियांना दूरवर पायपीट करायला लागते आहे.अशक्त, उपाशी मुलं, गरीबी,निरक्षरता, उपासमार अशा दुर्दैवाच्या भोवर्यात सापडलेली कुटुंब…
१९७५ सालातलं हे वर्णन आहे. सातपुडा पर्वत रांगांमधील सरिस्का जंगलाजवळचा हा जिल्हा. तिथे बेसुमार जंगलतोड सुरू आहे.सगळीकडे प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे. या पार्श्वभूमीवर ‘त्याचं’ आगमन होतं. तो एक ध्येयवादी तरुण राजेंद्र.समाजाचं आपण काही देणं लागतो या भावनेनं आलेला. नुसतंच लग्न, मुलं, संसार करत जगायचं आणि मरुन जायचं या आयुष्याला काही अर्थ नाही. म्हणूनच तरूण वयात सरकारी नोकरी सोडून, समान ध्येय असलेल्या चार मित्राना घेऊन राजास्थानातील या ‘किशोरी’ गावात तो येतो. काय काम करायचं हे या मित्रांचं ठरलेलं नसतं. हे सर्वजण शहरी, सुशिक्षित तरूण. राजेंद्र तर बी ए एम एस डाॅक्टर. पण तिथली एकूण परिस्थिती पाहून ‘पाणी’ प्रश्नावर काम करायचं निश्चित होतं.आजुबाजूला पाहणी केल्यावर लक्षात येतं की, पूर्वी इथे ‘जोहड’ होते. जोहड म्हणजे पावसाचं पाणी अडवणारे छोटे बांध. ज्यामुळे तळं निर्माण होतं व पुढचा पाऊस येईपर्यंत त्याचं पाणी पुरत असे. मात्र हे जोहड अनेक वर्षांमधे दुर्लक्षित होते. त्यात माती, गाळ साचून निरुपयोगी झाले होते. ही गोष्ट लक्षात आल्यावर राजेंद्रनी हे काम हाती घ्यायचं ठरवलं. सुरूवातीला गावातले लोक यासाठी पुढे येईनात. तेव्हा राजेंद्रने स्वत: हातात कुदळ घेऊन काम सुरू केलं.त्यांच्याबरोबर आलेले सुशिक्षित तरुणही हे श्रमाचं काम करायला कचरले. गावकर्याना किमत नाही तर आपण का घाम गाळा असे म्हणून ते निघून गेले. राजेंद्र मात्र हरला नाही. आठ दिवस एकटा घाम गाळत राहीला. नियती जणु त्याची कठोर परीक्षा घेत होती.अखेर गावातील एक स्त्री घुंघट घेऊन हातात घमेलं, फावडं घेऊन मदतीला आली. ते पाहून लाज वाटून आणखी काही लोक आले.हळूहळू चित्र पालटलं. पावसाळ्याआधी काम पूर्ण झालं. पावसाळ्यात त्यात पाणी साचून राहिलं.शेती चांगली झाली. अन् गावाचं चित्रच पालटलंच.हळूहळू राजेंद्रना ‘तरुण भारत संघ’ या संस्थेचे इतर कार्यकर्ते येऊन मिळाले. त्यानंतर गावागावात या ‘जोहड’ च्या कामाला गती आली. वीस वर्षांमधे ८६०० जोहड बांधून या मरूभूमीचा कायापालट झाला. हळूहळू शेती, शिक्षण, आरोग्य, वृक्षारोपण, बेकायदा जंगलतोड थांबवणे अशा सर्वच क्षेत्रात काम सुरू झालं.
वर्षामागून वर्षे गेली आणि झालेला विकास पाहून या कामाचं अनन्यसाधारण महत्त्व सगळ्यांच्या लक्षात आलं. घर सोडून माहेरी निघून गेलेली राजेंद्रची पत्नी परत आली. समाजानेही या कार्याची दखल घेतली. २००१ साली राजेंद्रना मॅगसेसे पुरस्कार मिळाला.२००५ साली जमनालाल बजाज पुरस्कार, २०१५ साली Stockholm पुरस्कार – Noble Prize for Water मिळाला. यानंतर त्याना अनेक पुरस्कार मिळाले.पाणी प्रश्नावर काम करणार्या विविध सरकारी व बिगर सरकारी समितीवर राजेंद्र निवडले गेले.जंगलातील बेकायदा खाणकाम थांबवलं.खाणमजूराना एकत्र केलं म्हणून चिडून खाणमालकानी, भ्रष्ट अधिकार्यानी तीन वेळा त्याना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तिन्ही वेळा त्यातून ते वाचले.
उत्तर प्रदेशच्या खेड्यातील एका जमिनदाराचा हा मुलगा.शाळेतील शिक्षकानी त्याच्यावर समाजकार्याचे संस्कार केले. गांधीवादी विचारसरणीचा प्रभाव त्यांच्यावर पडला.गांधीजी म्हणाले,’खेड्याकडे चला’ म्हणून ते राजस्थानात खेड्यात गेले. जयप्रकाश नारायण यांचाही त्यांच्यावर खूप प्रभाव पडला.२५ – ३० च्या कोवळ्या तरुण वयात घरदार आणि पत्नीला सोडून घरातलं फर्निचर विकून दूर खेड्यात जावून काम करणारा, दृढ निश्चय, प्रखर ध्येयनिष्ठा असणारा हा अवलिया…
त्यांच्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवं.
परीक्षण : डाॅ. मुग्धा सिधये – तगारे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈