सौ. अर्चना मुळे
पुस्तकावर बोलू काही
☆ “लामणदिवे” – लेखक : श्री सदानंद कदम ☆ परिचय – सौ. अर्चना मुळे ☆
पुस्तक – लामणदिवे
लेखक – श्री सदानंद कदम
प्रकाशक – अक्षर दालन
पृष्ठ संख्या – १४४
मूल्य – रु. २००/-
जेव्हा जेव्हा समाजात अनीती, भ्रष्टाचार फोफावतो तेव्हा तेव्हा समाजाला दिशा देणारा, अंधारात प्रकाश देणारा, छोटीशी ज्योत सतत तेवत ठेवणारा कुणीतरी जन्माला येतो असं म्हटलं जातं. कोणताही काळ मनश्चक्षू समोर आणला तर फक्त एकच सत्य गोष्ट जाणवते, ती म्हणजे सदासर्वकाळ ‘शिक्षक’, ‘गुरु’ हे लोक लहान मुलांवर खरे संस्कार करतात. ही संस्काराची देण दिव्यासम सतत तेवत ठेवतात. हे तेवणारे दिवे मात्र संख्येने नगण्य आहेत हेच खरे.
शाळांमधे मुलाना तोच अभ्यासक्रम सर्जनशील, कृतीशील राहून शिकवणारे, व्यावहारीक ज्ञान देणारे कल्पक शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला आवडले नाहीत तरच नवल! संपूर्ण महाराष्ट्रात असे कितीतरी शिक्षक कार्यरत आहेत. त्यांची माहिती मात्र आपल्यापर्यंत पोहोचत नाही. प्रत्येक पालक अशा शिक्षकांच्या शोधात असतो. पण ते अवलिया शिक्षक हर शाळेत थोडेच असतात. ते असतात लाखात एक! दूरवर!
अशाच शिक्षकांबद्दल भरभरून सांगणारं, त्यांचं कौतुक करणारं आणि त्यांच्या संकल्पना आपल्यापर्यंत पोहोचवणारं एक पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय. ‘आयुष्यात अक्षरांची जादू असणार्या सर्व गुरुजनांना सादर… ‘ असं म्हणत लेखकाने सुरुवात केली आहे. लेखकही साधा माणूस. त्याचं साधं वागणं, रांगडी बोलणं, मोकळंढाकळं राहणं याचा लवलेश अधूनमधून पुस्तकात डोकावतो. तो ज्या वाचकाला सापडला त्याला पुस्तकातील सर्व शिक्षक पात्रं नीट समजली असं म्हणता येईल. कारण लेखकाचं भाषेवर कितीही प्रभुत्त्व असलं तरी उगीचंच शब्दांच्या अलंकृतपणाचा आव कुठेही आणला नाही. पुस्तकात शिक्षक – विद्यार्थी, शिक्षक – प्रशासकीय अधिकारी, दोन शिक्षक, शिक्षक – गावकरी यांच्यातील संवाद अगदी सहज, साध्या, सोप्या शब्दात मांडला आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचकांना खिळवून ठेवतं.
हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील १९ अवलिया शिक्षकांची विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवणारी उत्तम प्रयोगशाळा. शिक्षकांचं फक्त कौतुक करायचं म्हणून नाही तर या शिक्षकांनी केलेले प्रयोग अनेक शाळांमधे केले जावेत. मुलांचं शिक्षण आनंददायी व्हावं. मुलांचा आनंद कशात आहे हे लेखकाला चांगलं माहीत आहे कारण तोही एक जिल्हा परिषदेचा या पात्रांसारखा आगळावेगळा शिक्षकच. म्हणून हे पुस्तक महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासात महत्त्वपूर्ण ठरेल यात शंकाच नाही.
प्रत्येक शिक्षकाला लेखकाने जवळून अनुभवलंय. शिक्षकांचं शिकवणं, त्यानी केलेले प्रयोग स्वत: डोळ्यानी बघितलेत. काही अनुभवी शिक्षक सहकार्यांना गुरु मानलंय. त्यानुसार वेगळी, मुलुखावेगळी, तिची कथाच वेगळी, अवलिया, ध्येयवेडा, अंतर्बाह्य शिक्षक, चौसष्ठ घरांचा राजा, स्वप्नं पाहणारं नक्षत्र, विवेकवादाचं झाड, जिद्दी, झपाटलेल्या, सेवाव्रती, कर्मयोगी, कणा असलेले गुरुजी, स्वप्नं पेरणारा माणूस, हाडाचा मास्तर, जंगलातले गुरुजी, मूर्तीमंत आचार्य, मार्तंड जे तापहीन अशा शीर्षकांमधून त्या त्या शिक्षकी सेवेमधील त्यांचं तप दिसतं.
मुलांना मराठी, इंग्लिश, गणित, विज्ञान या सर्व विषयांचं आकलन व्हावं, मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मुलांच्या सर्वोत्तम प्रगतीसाठी झटणार्या या शिक्षकांच्या कार्यकर्तृत्वाला हृदयापासून माझा सलाम!!
महाराष्ट्रातील हे सर्व शिक्षक म्हणजे लेखक सदानंद कदम यांच्या नव्या पुस्तकातील मुलखावेगळे लामणदिवे.
लामणदिवे मधील ही शिक्षक पात्रं कोण आहेत? त्यानी नेमके असे कोणते प्रयोग केले आहेत? ते मुलखावेगळे का ठरले आहेत? महाराष्ट्राच्या कोणत्या शाळेत हे शिक्षक काम करत आहेत? हे पुस्तक वाचल्यावर यातील पात्राना भेटावसं वाचकाना नक्कीच वाटेल. म्हणून शिक्षकांचे छायाचित्रांसह भ्रमणध्वनी क्रमांक पुस्तकाच्या शेवटी दिले आहेत.
हे पुस्तक म्हणजे पालक शिक्षकांच्या हातातील विद्यापीठ. अक्षरदालन, कोल्हापूर म्हणजे पीठाधिपती. प्रत्येक वाचक हा पुन:श्च असा विद्यार्थी ज्याला वाटेल की असे शिक्षक मला लहानपणी भेटले असते तर… मी वेगळा घडलो असतो.
पालक शिक्षक विद्यार्थी यांच्याबरोबरच समाज विकासाची ज्योत तेवत ठेवण्याची इच्छा बाळगणार्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवं!
असं हे अद्भुत ‘ ला म ण दि वे!! ‘
परिचय : सौ. अर्चना मुळे
समुपदेशक
संपर्क – 21 ए बी,पार्श्व बंगला, श्रीवास्तुपूरम, धामणी रोड, सांगली – 416415
फोन – 9823787214 email : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈