पुस्तकावर बोलू काही
☆ “विटामिन जिंदगी…” – लेखक : श्री ललितकुमार ☆ परिचय – डॉ. मुग्धा सिधये तगारे ☆
पुस्तक – विटामिन जिंदगी
लेखक – श्री ललितकुमार
परिचय : डॉ. मुग्धा सिधये तगारे
आयुष्याला खुराक पुरवणाऱ्या, निराशावादी माणसाच्या डोळ्यात सणसणीत अंजन घालणारं हे पुस्तक… 47 वर्षाच्या एका (पोलिओग्रस्त) दिव्यांगाच्या आयुष्याची ही कहाणी आहे. लेखकाने अगदी बालपणापासून आपल्या आयुष्याचा पट इथे उलगडून दाखवला आहे. दिल्लीमधे सुतारकाम, मूर्तीकाम करणाऱ्यांच्या घरात त्यांचा जन्म झाला. चौथ्या वर्षापर्यंत इतरांसारखाच तो सामान्य धडधाकट मुलगा होता. त्यानंतर एक दिवस खूप ताप आला… बरेच दिवस राहिला आणि पोलिओच्या विषाणूचं शरीरावर आक्रमण झालं. लेखक म्हणतो,” पुढच्या दुःख व कष्टांसाठी नियतीनं “माझी” निवड केली आणि जणु आणखी कोणाला वाचवलं.” संपूर्ण पुस्तकामधे लेखकाने आपली संघर्षयात्रा विस्तृतपणे उलगडून तर दाखवली आहे पण कुठेही रडगाण्याचा सूर नाही! शरीर विकलांग असलं तरी मनं अत्यंत सुदृढ आहे. लहानपणापासूनच खरं तर सगळ्याच बाबी त्यांच्या विरोधात होत्या. घरी शिक्षणाची फारशी पार्श्वभूमी नाही (वडिल ११ वी शिकलेले) आर्थिक स्तर निम्न मध्यमवर्गीय, घराजवळ, शाळेत फारसे कोणी मित्र नाहीत…. तरीही त्यांच्याकडे असणाऱ्या + ve गोष्टींच्या जोरावर ते आयुष्यात एक एक पाऊल पुढे टाकत गेले.
सुरुवातीपासूनच एकत्र कुटुंबातील आजी-आजोबा, आई-वडिल काका-काकू, बहिण भाऊ हे सारे ललितच्या मागे भक्कमपणे उभे राहिले. बालपणी ४ वर्षांचा असताना अचानक पाय लुळे पडून उभं राहता येते नाही हा धक्का त्यांच्यासाठी मोठा होता. काहीही करून त्याला उभं करायचं या जिद्दीने त्याच्या घरच्यांनी वैदू, वैदय, डॉक्टर, जो कोणी जे काही सांगेल ते सर्व उपाय केले. सतत मालिश, पहाटे उठून गरम पाण्यात पाय बुडवून बसणे, नाही नाही ती चूर्ण, गोळ्या सतत खाणे काढे पिणे ह्या गोष्टी ४-५ वर्षाच्या मुलाच्या वयाला अतीच होत्या. पण लेखकाने बालपण कोमेजून गेलं असं न म्हणता घरच्यांचे प्रामाणिक प्रयत्न, जिद्द, कष्ट त्यांनी अधोरेखित केली.
शाळा कॉलेजमथले त्यांचे अनुभव वाचून समाज म्हणून आपण किती अससंस्कृत आहोत याचा सज्जड पुरावाच मिळतो. शाळेमधली मुलं त्याच्या कुबड्या हिसकावून घ्यायचे, चेष्टा करायचे पण शिक्षकही त्याच्यासमोरच त्याची कीव करायचे. एवढच की ११-१२ च्या वर्गातले शिक्षक, प्रयोगशाळा मदतनीसही त्याला काहीही मदत करायचे नाहीत. केवळ एका मित्राच्या मदतीमुळे मी रसायनशास्त्राचे प्रयोग करू शकलो असं लेखक म्हणतो. टोकाचा स्वाभिमानी, असलेल्या ललितला दुसर्याकडून कीव, दया, उपेक्षा मिळाली की चीड यायची. वाईट वाटायचं. आपल्याला इतरांसारखेच समानतेने वागणूक मिळावी एवढीच त्यांची इच्छा असायची. ती इच्छा फक्त परदेशी शिक्षणाच्या वेळी ‘स्काॅटलंड’ इथे पूर्ण झाली. होती. पण त्याची पायाभरणी फार पूर्वी शाळेतच झाली होती.
इतर दिव्यांगांपेक्षा ललित एवढा वेगळा आहे की त्याने आयुष्यात असाधारण गोष्टी केल्या. प्रत्येक वेळी सुरक्षित कोषातून तो बाहेर पडला व पुढे गेला. याचं कारण म्हणजे जिद्द व आत्मसन्मान. १२ वी मधे वर्गात त्याला सर्वात जास्त मार्क मिळाले. सर्वोत्कृष्ठ विद्यार्थी (best outgoing) म्हणून मंचावरून नाव घोषीत झाले तेव्हा खरं तर त्याला खूप आनंद झाला होता. पण जेव्हा मागच्या ओळीत बसलेला मुलगा तो अपंग आहे ना.. असं म्हणाला तेव्हा क्षणार्थात तो आनंद झाकोळला गेला. तेव्हा मनाशी ठरवले की, मी कधीही अपंग कोट्यातून कुठेही प्रवेश घेणार नाही. इथेच त्याचा ‘वेगळा’ ते ‘विशेष’ हा प्रवास सुरु झाला. पण त्याआधी शाळेच्या पायऱ्या चढण्यासाठी, कुबड्या घेऊन बसमधे चढण्यासाठी, 4-4 km. चालण्यासाठी त्याला अविरत शारीरीक कष्ट कसे घ्यावे लागले ते वाचून अंगावर काटा येतो.
BSC करता करताच माहिती काढून (इ.स. २००० चा सुमार) नवीनच सुरु झालेले जीएनआयटीचे काँप्युटरचे कोर्सेस त्यांनी केले. तिथच उत्तम मार्क मिळवून आधीच्या वर्गातल्या मुलाना शिकवले. शिक्षणाला, ज्ञानाला कसा मान मिळतो याचा प्रथम अनुभव त्यांना तिथे आला. त्यानंतर त्यानी संयुक्त राष्ट्रसंघाच्या दिल्ली कार्यालयात काम करायला सुरुवात केली. बरचसं स्वयंसेवी पद्धतीचं हे काम होत. त्यातून पैसे कमी मिळाले तरी प्रचंड अनुभव गाठीशी आला. त्यातच पुढे त्या ऑफिसमधे कायम नोकरी मिळाली. तरी त्याचा राजीनामा देऊन त्यांनी परदेशात शिक्षणासाठी अर्ज केले. व संपूर्ण शिष्यवृत्तीसह स्कॉटलंडला बायोइनफोरमॅटिक्स मधे दीडवर्ष एकट्याने राहून डिग्री घेतली. पुढे भारतात परतल्यावर अपंगांसाठी online forum स्थापन, केला व भारतभरच्या दिव्यांगांशी ते जोडले गेले – computory ज्ञान वापरुन त्यांनी भारतीय काव्य एकत्र आणून विकीपिडियावर काव्यकोषाची निर्मिती केली. कॅनडामधे शिष्यवृत्ती मिळवून PHD साठीही ते गेले पण शरीर अजिबातच साथ देईना. त्यामुळे परत फिरावं लागलं तरी घरी राहून ते १०-१० तास, काम करतात. त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष व्यक्तीचा रोल मॉडेल हा पुरस्कार मिळाला आहे.
आयुष्याच्या आजवरच्या प्रवासाबद्दल लेखक म्हणतो दुःख आणि असफलता हे जीवनाच्या इंजिनासाठी इंधन म्हणून उत्तम काम करतं. दुःखात जगणं व दुःखाबरोबर जगणं हया दोन्हीमधे खूप फरक आहे. खरंच किती समर्पक आहेत या ओळी ! म्हणूनच अत्यंत प्रेरणादायी असे हे पुस्तक जरूर वाचलं पाहिजे.
परीक्षण : डाॅ. मुग्धा सिधये – तगारे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈