सौ. अर्चना मुळे 

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “राखेतून उगवतीकडे” – मूळ लेखक : विंग कमांडर अशोक लिमये – अनुवाद : सुश्री सोनाली नवांगुळ ☆ परिचय – सौ. अर्चना मुळे  ☆ 

पुस्तक : राखेतून उगवतीकडे

(नकारात्मकता नाकारणाऱ्या लढवय्या वैमानिकाची गोष्ट) 

लेखक : विंग कमांडर अशोक लिमये. 

अनुवाद : सोनाली नवांगुळ. 

पृष्ठे : २३३

किंमत : ३२५ ₹

प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे

आयुष्यात आता सगळं संपलं असं वाटत असतानाही नव्या उमेदीनं केवळ जिद्द, साहस, चिकाटी, निष्ठा, आत्मविश्वास, स्वीकार आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर पुन्हा एक अशी झेप घेणं म्हणजे जणू फिनिक्स भरारीच. असं यश त्यांच्याच वाट्याला येतं, ज्यांच्या शब्दांत, विचारांत, मनात, कृतीत नकारात्मकतेला जराही थारा नसतो. त्यांचा सकारात्मकतेचा झरा ‘राखेतून उगवतीकडे’ या पुस्तकात पानापानांवर झुळझुळत राहतो. पुस्तकातील नायक विंग कमांडर अशोक लिमये हे भारतीय हवाई दलात कार्यरत असताना त्यांना आलेले अनुभव त्यांनी ‘द फिनिक्स रायजेस’ या पुस्तकात मांडले. लेखिका सोनाली नवांगुळ यांनी केलेला त्याचा अनुवाद ‘राखेतून उगवतीकडे’.

रोज एक पाऊल पुढं टाकत यश मिळवायचं असेल तर हे पुस्तक तो विश्वास देतं. ‘तू पुढे हो यश तुझ्या मागं आपोआप येईल’ असा आत्मविश्वास आपल्यात निर्माण करतं. पुस्तक वाचत जसंजसं आपण पुढं सरकत राहतो तसतसं हवाईदलात जाण्याची इच्छा बाळगणारे,  आकर्षणापोटी हवाईदल जाणून घेणारे, आपल्या मुलांना सैन्यात पाठवणारे, न पाठवणारे, सामान्य – असामान्य अशा प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर हवाईदल उभं राहतं. हा लेखनप्रपंच करण्याचा लेखकाचा उद्देशही तोच होता. 

पुस्तकाचे दोन भाग. पहिल्या भागात ‘नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (एन.डी.ए.)’तील प्रशिक्षणापासून ‘फायटर स्वाड्रनच्या जबाबदारी’ पर्यंतचे टप्पे आहेत.  प्रत्येक टप्प्यावर अभ्यास, नियम, कडक शिस्त, यश – अपयश, सततचं रिपोर्टिंग, कुठल्याही आकर्षणाला बळी पडायलाही वेळ नसणं, कधी मजा, कधी सजा, कधी कडवटपणा, कधी मायेनं ओतप्रोत भरलेला आधार अशा पद्धतीनं देशाच्या संरक्षण खात्याची धुरा प्राणपणानं सांभाळण्याची शारीरिक – मानसिक तयारी करावी लागली. ती करत असताना प्रचंड अनुभव मिळत गेले. इथपर्यंतचा लेखकाचा प्रवास थरारपूर्ण अनुभव देतो. 

ते अनुभव मांडताना सैन्यातील विशिष्ट शब्द, वाक्यं जशीच्या तशी दिली आहेत. उदा: स्वाॅड्रन, बटालियन, रिग, हँगर, ब्ल्यू बुक किंवा सुखोई ७, पासिंग आऊट परेड,राईट हँड सीट चेक इ. हे शब्द वाचताना वाचकांना कळावेत यासाठी पुस्तकात शेवटी परिशिष्टामधे त्याचे अर्थही दिले आहेत.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असतोच. पण त्यातील एक कोणतातरी दुसर्‍यापेक्षा कमी अधिक प्रमाणात आव्हानात्मक असतो. अशोक लिमयेंच्या बाबतीत दोन्ही भागांत त्यांना तितक्याच आव्हानांचा सामना करावा लागला. सैन्यदलात जायचं तर काही शारीरिक – मानसिक निकष पार पाडावेच लागतात. ते सगळं व्यवस्थित पार पडल्यानंतर ‘विंग कमांडर’ झाल्याचा आनंद होताच,  पण आणखीही काहीतरी वेगळं घडायचं होतं… घडणार होतं. 

नेहमीप्रमाणंच त्यांनी फायटर विमानाचं उड्डाण केलं आणि त्यांचा अपघात झाला. त्यानंतरचं अनुभवकथन पुस्तकाच्या दुसर्‍या भागात येतं. अपघात होऊनही व्हीलचेअरवर बसून त्यांनी भारतीय हवाईदलाला आपली सेवा दिली. अपघातानंतर पुन्हा घेतलेली झेप वाचताना अनेकदा वेदनांचं मोहोळ उठतं. विंग कमांडरांच्या दुसर्‍या जन्माचा पहिला दिवस वाचताना डोळ्यांत पाणी आल्यावाचून राहत नाही. त्या दिवशी फिनिक्स राखेतून उठला होता. त्यानं उडायलाही सुरुवात केली होती…पुन्हा एकदा! 

कथेचा नायक आणि अनुवादक दोघंही पॅराप्लेजिक असण्याच्या एका समान धाग्यामुळं हे पुस्तक मराठीत आलं. अगदी तसंच एक वाचक म्हणून हे पुस्तक आवडण्याचं कारण म्हणजे माझा जोडीदार असलेला भारतीय नौदलातील एक सैनिक. विवाहापूर्वीच्या त्यांच्या कष्टांची जाणीव या पुस्तकामुळं माझ्यापर्यंत पोहोचली असं मला वाटतं. एक सैनिक दिसणारा कडक शिस्तीचा कणखर पुरूष अगदीच मवाळ नसला तरी प्रेमळ, सहृदयी, मदतीसाठी तत्पर आणि प्रचंड जिद्द अशा गुणांनी संपन्न असतो हा माझा रोजचा अनुभव. या पुस्तकात असे बरेच समान धागे मला सापडत गेले. त्यामुळे दोन बैठकीत पुस्तक वाचून संपलं.

पहिला भाग पूर्णपणे प्रशिक्षणावर आधारीत आहे. त्यात वाचकांच्या अनुभवातले शब्द नसल्यामुळं काही शब्द वाचताना अडखळायला होतं. पणक्षदोन प्रकरणानंतर  सरावानं ते जमतंही. दुसऱ्या भागात अर्थातच ‘फिनिक्स भरारी’. दररोजच्या छोट्या छोट्या गोष्टींनी जे लोक नाराज होतात आणि निराशामय वातावरणात राहतात, अशांसाठी हे पुस्तक महत्त्वाचं. आशेचा किरण दाखवणारे. ज्यांना स्वत:चं छोटं दु:ख खूप मोठं वाटतं असतं ते ‘वेदनेची शिकार’ होतच राहणार. पण अशा वेदनांपासून सुटका हवी असेल तर ‘राखेतून उगवतीकडे’ वाचायला हवं.

ही कहाणी केवळ आकाशात भरारी घेणारा वैमानिक कायमसाठी चाकाच्या खुर्चीत जखडबंद होतो त्याची नाही. तर पुनश्च ‘राखेतून उगवतीकडे’ निग्रहानं झेपावतो त्याची आहे. 

परिचय : सौ. अर्चना मुळे

समुपदेशक

संपर्क – 21 ए बी,पार्श्व बंगला, श्रीवास्तुपूरम, धामणी रोड, सांगली – 416415

फोन – 9823787214 email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments