डॉ. माधवी किशोर ठाणेकर (मधुकिशोर)

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “पाखरमाया” – लेखक : श्री मारुती चितमपल्ली ☆ परिचय – डॉ.माधवी किशोर ठाणेकर (मधुकिशोर)

पुस्तक – पाखरमाया

लेखक – मारुती चितमपल्ली 

प्रकाशक – साहित्य प्रसार केंद्र, नागपुर 

तृतीय आवृत्ती 

पृष्ठे – १४०

मारुती चितमपल्ली यांच्या पुस्तकांची खासियत म्हणजे त्यांनी पुस्तकाला दिलेली नावे. केशराचा पाऊस असो, रानवाटा असो, पाखरमाया असो वा सुवर्णगरुड असो नाव वाचता क्षणीच मनात विचारांचं काहूर माजतं. त्याला भर म्हणजे पुस्तकाचे मुखपृष्ठ. मुखपृष्ठावर पुस्तकाच्या नावाला साजेसे असे किंवा त्याहूनही सुंदर चित्र असते. आणि आपण त्याच्याकडे आपसूकच ओढले जातो. सहज चाळायला म्हणून जरी पुस्तक हातात धरलं असलं तरीही त्यांच्या लिखाणात आपण स्वतःला विसरून जातो, आणि पुस्तकाशी एकरूप होतो.

‘पाखरमाया’ या नावावरून जरी पुस्तकांत पक्षी जगताबद्दल सर्व असेल अस वाटलं तरीही आत मात्र अनेक विषयांवर लेख आहेत. पक्षी, कीटक, लहान प्राणी, झाडं एकूण निसर्गाचं हे पुस्तक आहे. या पुस्तकांत पक्षी आपली घरटी कशी बांधतात याबद्दल अधिक विस्तृत महिती सांगितली आहे. तसेच वाळवी, चेलपतंग, काजवे, बेडूक, खेकडे यांची माहिती आहे. वानर आणि वांब माश्यावर देखील सुंदर लेख आहेत. आकाश आणि पृथ्वी ग्रहतारे यांच्या गमकाची वर्णने आहेत. तर झाडांमध्ये पिंपळ, चिंच, सुरु, कुसुमगुंजा, बाभूळ, महारुख, रायमुनिया आणि शेवग्याची बारीक माहीती दिली आहे. निसर्गातील सर्व गोष्टी सांगून त्यांचा आणि योग याचा संबंध शेवटच्या लेखामध्ये त्यांनी सुंदर प्रकारे मांडला आहे.

चितमपल्ली यांची पुस्तकं निसर्गाची नवीन ओळख करून देतातच परंतु त्यातील भाषा आणि चित्रमय गोष्टींमुळे आपल्याला निसर्गाविषयी आपसूकच आपुलकी निर्माण होते. त्यांचे साहित्य वाचून प्रसिद्ध लेखक “जी. ए. कुलकर्णी” यांनी त्यांना सुंदर पत्र लिहिलं आहे त्यावरूनच आपल्याला त्यांच्या लिखाणाची शैली समजून येते. ते पत्र असे आहे:

“प्रिय चितमपल्ली,

निरनिराळ्या नियतकालिकांतून मी तुमचे लेख वाचले आहेत. त्यांतील ताजेपणा व निरीक्षणातील नेमकेपणा मला फार आकर्षक वाटला. साधारणपणे अशा प्रसंगी लॅटिन क्लासिफिकेशन सांगून शास्त्रीय नेमकेपणा देत वाङ्मयीन गुणांकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती दिसते. शिवाय मराठीत केवढी शब्दसंपत्ती आहे यांचेही दर्शन घडते. निरनिराळी झाडे, पाखरे, वेगवेगळे प्राणी यांची इतकी नवी, जिवंतपणे रुजलेली नावे तुमच्या लेखनात दिसतात की आपणाला मराठी येते का याबद्दलच मला साशंकता वाटू लागते. याचे कारण म्हणजे केवळ व्यवसाय अथवा शास्त्रीय संकलन यापलीकडे जाणारी आतड्याची एक ओढ तुमच्या पावलांना रानवाटांची एक माहेर ओढ आहे.”

असा सुंदर अभिप्राय वाचल्यानंतर हे पुस्तक मला आणखीनच वाचावं असं वाटले. 

पुस्तकाच्या नावावरून असं वाटलं होतं की फक्त पक्ष्यांची माहिती असेल. वाचायला सुरू केल्यावर लक्षात आलं; पक्षीच नव्हे तर जलचर, उभयचर, प्राणी, कीटक, आकाश, पर्जन्य, वृक्षसंपदा, अशा कितीतरी गोष्टी आणि त्यासोबत त्यांचे विणलेले अनुभव, या सगळ्यांचा एकत्रित मिलाप म्हणजे ‘पाखरमाया’ आहे.

मला कॉलेज मध्ये असताना Botony आणि zoology चा अभ्यास करताना nursery आणि poultry च डोळ्यांसमोर यायची, आणि त्यात ते लॅटिन biological नावं लक्षात ठेवायची म्हणजे…

चितमपल्ली यांचे हे दुसरं पुस्तक वाचतेय मी, त्यांचे अनुभव वाचताना त्यापालिकडच्या जिवंत निसर्गाची ओढ लागते. महत्वाचं म्हणजे प्राणी पक्षी, वृक्षांची त्यांनी दिलेली मराठी किंवा आदिवासी बोली भाषेतील नावं इतकी साजेशी वाटतात, म्हणजे उगाचच आपण इंग्लिश नावं शोधत असतो असं वाटतं.

आपल्या पूर्वजांना असलेलं विस्तृत, सखोल आणि अचूक ज्ञान आणि त्याचा चितमपल्ली यांनी केलेला अभ्यास श्लोकासाहित दिलेला अर्थ वाचताना अचंबित व्हायला होतं.

चितमपल्ली हे साक्षात वनऋषीच. म्हणतात ना एखाद्या ज्ञानी व्यक्तीच्या सहवासात तासभर रहा, सतत नवीन शिकायला मिळतं. तशी अवस्था ही पुस्तकं वाचताना होते, एवढी त्यांनी आयुष्यभराची तपस्या आपल्या समोर पुस्तकरूपाने उघडून ठेवली आहे, आपण रसग्रहण करत राहावे. बरं एका वनाधिकार्याचे अनुभव म्हणजे सरळसोट गोष्टी असतील असं पण नव्हे. साहित्य, अभंग, दोहे, उपनिषद यांच्याशी अनुभवांशी घातलेली सांगड पाहून अचंबित व्हायला होतं. किती तो गाढा अभ्यास..

त्यांचे निसर्गातले अनुभव वाचतच राहावे असे आहेत..

**बहिरी ससाणा, सर्पगरूड उंच झाडाच्या शेंड्यावर घरटं बांधतात. बऱ्याच वेळा कावळे दुसऱ्याच्य घरट्यातल्या काड्या चोरून स्वतःचं घरटं बांधतात

**पक्षी अंड्यावर बसून तापमानाचा समतोल ठेवतात. कमी – जास्त तापमानाने आतला जीव गुदमरून मरू शकतो. पक्षी ठराविक दिवसाच्या अंतराने अंडी घालतात, मादी एकत्र सगळी अंडी घालू शकत नाही. सगळी अंडी घालून झाली की एकत्र उबवायला मादी सुरूवात करते.

**वानरांच्या शेकोटीची कथा तर facebook वर बऱ्याच ठिकाणी सगळ्यांनी वाचली असेल, ती कथा चितमपल्ली यांनी याच पस्तकात दिली आहे वानर म्हणे रामफळ-सीताफळाला हात लावत नाहीत. आता पुढच्या वेळी वनारांची टोळी आली की निरीक्षण करायला हवं.

**पावसाळ्या नंतर बेडूक जमिनीखाली महानिद्रेत जातात; विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट झाडाजवळ, विशिष्ट दिशेला खोदले तर त्यांना अचूक ठिकाणी शोधता येतं.

**लोयांग नावाचा एक जपानी गृहस्थ एका खंदकात पडला. तिथल्या खंदकातील भेगांत बेडकांनी आश्रय घेतला होता. सूर्य उगवताच सूर्यकिरण खावे तशी बेडकांनी जिभेची हालचाल सुरू केली, आणि लोयांग यांनी त्यांचे अनुकरण केले. असे केल्याने त्यांची भूक नाहीशी झाली, अगदी त्या खंदकातून सुटका झाल्यावर सुद्धा.

**खेकडे बिळात असताना आपल्या नांग्या आत ओढून घेतात. परंतु धोका वाटला तर नांग्या सज्ज करून बिळाच्या टोकाशी येतात. एकदा त्यांनी पकडलं की मग सहज सुटका नाही. अंदमान वरील खेकडे माडावरील नारळ पाडून, त्यांना छिद्र पाडून आतली माऊ मलई फस्त करतात. साधुबुवा खेकडा इतर जीवांनी सोडलेल्या शंखात राहतो.

**साप कात टाकतो त्याप्रमाणे खेकडाही कवच बदलतो.

**खेकड्याच्या डोळ्यांखालच्या कडांना राठ केस असतात. त्या केसांचा उपयोग ते कुंचल्यांसारखा डोळे साफ करण्यासाठी करतात, तेव्हा फुत्कारण्याचा आवाज येतो. खेकडे पाण्याखाली श्वासोच्छवास करताना बुडबुडे सोडतात, त्यांचाही आवाज येतो.

**कोल्हा आपली शेपटी खेकड्याच्या बिळात घालतो. खेकडा शेपटी पकडून बाहेर आला की खेकड्याला खाऊन टाकतो. खेकडे पावसाच्या आवाजाने हर्षभरित होतात. ठाकर/कातकरी लोकं दगडांचा पावसासारखा आवाज काढून खेकड्यांना बिळाबाहेर काढून शिकार करतात.

**गुंजांची पानं लाजळूच्या पानासारखी मिटून आपणाला भूकंप, ज्वालामुखी आणि हवामानातील प्रचंड उत्पाताची पूर्वसूचना देत असल्याचं वनस्पती शास्त्रज्ञांना आढळून आलं आहे.

**खाटीक पक्षी शिकार केलेले कीटक आणि सरडे बाभळीच्या काट्याना अडकवून देतो, मग सवडीने कुरतडून खातो.

–लँटाना या मूळ ऑस्ट्रेलियन झुडुपाला मराठीत घाणेरी / टणटणी आणि मेळघाटातील कोरकू लोक रान मुनिया म्हणतात. चंदनाच्या झाडाला सावली आणि अन्न देण्याकरता लावलेली ही झुडूपं अतिक्रमण वाटावं एवढी अतिवेगाने वाढली आहेत. त्यामुळे इथल्या वनश्रीची अंतिम अवस्था (climax stage) आली असल्याचं वन तज्ज्ञांचे मत आहे. मूळ ज्या ठिकाणी वनस्पती उगवते, त्या ठिकाणी त्यावर नियंत्रण ठेवणारे जीवही निसर्ग जन्माला घालत असतो. अशी वनस्पती दुसरीकडे नेली की अनियंत्रित वाढून स्थानिक निसर्गसंपदेचा घास घेते, याच मेळघाट हे ज्वलंत उदाहरण.

–शेवग्याच्या बहुविध उपयोगाविषयी चितमपल्ली आवर्जून सांगतात. पाखरांना बोलवायचं असेल तर अंगणात शेवग्याची झाडं लावण्याचा सल्ला पक्षीमित्रांना देतात.

–वन्य प्राणी हे सिद्ध जीव आहेत. परंतु मानवाला योगक्रियेद्वारे प्रयत्नांनी सिद्धी प्राप्त करून घ्यावी लागते. म्हणून ९०% योगासनांची नावे पशुपक्ष्यांच्या नावावरून आहेत.

–सिंहमुद्रेत जीभ लवचिक बनते, घसा आंबण्याची व आवाज फाटण्याची प्रवृत्ती कमी होते. मयूरासनाचा स्वामी झालेला योगी जहाल विष पचवू शकेल एवढी जठराची शक्ती प्राप्त होते. सापाचा श्वास निःश्वास या क्रिया प्राणायामाप्रमाणे दीर्घ असतात. योगशास्त्र च्या नियमानुसार दीर्घ जीवन प्राप्त होण्यासाठी प्राणायाम हे एक साधन आहे.

–संमोहन विद्या माणसाला योगसाधनेने साध्य होते, परंतु वन्य प्राण्यांच्या बाबतीत ती स्वाभाविक क्रिया आहे.

या गोष्टी फक्त teaser आहेत पुस्तक वाचताना शेवटचं पान कधी आलं तेच कळत नाही

चितमपल्ली यांचे अनुभव आणि निसर्गातील प्रगाढ ज्ञान वाचतच बसावं असं वाटतं

आवर्जून वाचावं, आणि निसर्गप्रेमींनि संग्रही ठेवावं असं पुस्तक आहे – पाखरमाया.

© मधुकिशोर (डॉ.माधवी किशोर ठाणेकर)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments