सौ अंजली दिलीप गोखले
पुस्तकावर बोलू काही
☆ लक्षावधी बीजं (अनुवादित लघुकथा संग्रह)… – हिन्दी लेखक : श्री. भगवान वैद्य ‘प्रखर‘ ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
पुस्तक : लक्षावधी बीजं (अनुवादित लघुकथा संग्रह)
मूळ कथाकार : भगवान वैद्य” प्रखर”
अनुवाद – सौ. उज्वला केळकर आणि सौ. मंजुषा मुळे
प्रकाशक : अथर्व प्रकाशन, कोल्हापूर
पृष्ठसंख्या : २४४
आज अचानक एक सुंदर सुबक पुस्तक हातात आले . त्याचे मुखपृष्ठ पाहूनच पुस्तक वाचण्याचा मोह झाला .मुखपृष्ठावर विशाल आभाळ अन् पाचूसारखे हिरवेकंच पीक आलेली विस्तीर्ण जमीन दिसते. डोळे तृप्त करणारे असे हे मुखपृष्ठ पाहून पुस्तकाचे “ लक्षावधी बीजं “ हे नाव यथार्थ आहे असे जाणवते. अशीच विचारांची लक्षावधी बीजे या कथांमध्ये नक्कीच आहेत.. हे पुस्तक म्हणजे हिंदीतील सुप्रसिद्ध लेखक भगवान वैद्य” प्रखर” यांच्या हिंदी लघुकथांचा अनुवाद . हा अनुवाद केला आहे, सौ .उज्वला केळकर आणि सौ मंजुषा मुळे या दोघींनी . दोघींचे नाव वाचून क्षणात माझ्या मनामध्ये शंकर – जयकिशन, कल्याणजी – आनंदजी, अजय – अतुल अशा संगीतकार जोडीची नावे तरळली अन् वाटले – हा अनुवादही अशा रसिक, साहित्यिक जेष्ठ भगिनीनी – मैत्रिणींनी केलेला आहे .
इथे एक गोष्ट आवर्जून स्पष्ट करावीशी वाटते. मराठीत आपण ज्याला लघुकथा म्हणतो त्याला हिंदीत ‘ कहानी ‘ असे म्हटले जाते. आणि हिन्दी साहित्यात कहानी आणि लघुकथा हे दोन स्वतंत्र साहित्य-प्रकार आहेत. आणि अशा लघुकथा सर्वत्र प्रकाशित होतात. अगदी अलीकडे मराठीत अशासारख्या कथा लिहायला सुरुवात झाली आहे.. हिंदीत २५० ते साधारण ४००-५०० शब्दांपर्यन्त लिहिलेल्या कथेला ‘लघुकथा ‘ म्हणतात. आणि अशा कथा म्हणजे मोठ्या कथेचे संक्षिप्त रूप किंवा सारांश अजिबातच नसतो. यात कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त मोठा आशय मार्मिकतेने मांडलेला असतो, ज्याला एक नक्की सामाजिक परिमाण असते. ती कथा आकाराने लहान असली तरी ती “अर्थपूर्ण” असते, तिला आशयघनता असते . भगवान वैद्य “प्रखर” हे उत्तम लघुकथा लिहिण्यामध्ये प्रसिद्ध आहेत. लक्षावधी बीजं या पुस्तकामध्ये, वाचकाला त्यांच्या अशाच कथा वाचायला मिळतात. अनुवादामुळे एका भाषेतील उत्तम साहित्य दुसऱ्या भाषेमध्ये वाचकाला तितक्याच उत्तम स्वरूपात वाचायला मिळते ही गोष्ट या अनुवादित पुस्तकामुळे पुन्हा एकदा नक्कीच अधोरेखित झालेली आहे. या दोघींनी निवडक कथांचा अनुवाद करून आपल्याला ” लक्षावधी बीजं ” या पुस्तकाच्या रुपानं वाचनभेट दिली आहे . यातील १२० कथांपैकी १ ते ६५ या कथांचे अनुवाद केले आहेत मंजुषा मुळे यांनी तर ६६ ते १२० या कथांना अनुवादित केलंय उज्वला केळकर यांनी .
या लघुकथा वाचताना मूळ लेखकाची प्रगल्भता, निरीक्षण क्षमता आणि अचूक आणि अल्प शब्दात मनातलं लिहिण्याची हातोटी पाहून आपण अचंबित होतो. वाचकाच्या कधी लक्षातही येणार नाहीत अशा विषयांवर चपखल शब्दात लघुकथा लिहिण्यात लेखक भगवान वैद्य” प्रखर” कमालीचे यशस्वी झालेत . म्हणूनच हिंदी साहित्य क्षेत्रात लघुकथा लिहिणाऱ्यांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. उज्वलाताई आणि मंजुषाताईंनी या सर्व लघुकथांना मराठीमध्येही त्याच हातोटीने उत्तमपणे गुंफून वाचकाला वाचनाचा आनंद दिला आहे आणि पुढील गोष्टींची उत्सुकता वाढवली आहे .सूक्ष्म निरीक्षण, विषयातील गांभीर्य, अल्प शब्दात परिणामकारकपणे त्या विषयावरचे लेखन, या सगळ्याची उत्तम गुंफण् करण्याच्या कामात हिंदी लेखक आणि दोन्ही मराठी अनुवादिका पूर्णपणे यशस्वी झाले आहेत . छोट्या छोट्या कथा असल्यामुळे पटापट वाचून होतात आणि एक आगळा वेगळा आनंद वाचकाला मिळतो .
“प्रत्येक वेळी” ही पहिलीच एक पानी कथा आपल्या हृदयाचा ठोका चुकवून जाते आणि समाजातील _ डोंबाऱ्यांमध्येसुद्धा असलेले मुलींच्या आयुष्याचे दुय्यम स्थान समजते . बिन्नी आपल्या आईला विचारते,” आई, दर वेळी मलाच का दोरावर चढायला लावता? भय्याला का नाही ?” या लहानशा प्रश्नावरून आपण विचार करायला प्रवृत्त होतो.
“मूल्यांकन” ही इवलीशी कथा . शेवटचे वाक्य कापसाचे भाव सांगणाऱ्या परीक्षकाच्या शून्य बुद्धीची जाणीव करून देते . या परिक्षकाला’ कापूस शेतात पिकविण्यासाठी शेतकरी अविरत श्रम करतो, त्याला किती जागरूक राहून काम करावे लागते याची काहीच कल्पना नसते .. त्याला वाटते साखर किंवा थर्मोकोल प्रमाणे कापसाचेही कारखाने असतात . परीक्षकाच्या बुद्धीची किती कीव करावी हेच समजत नाही . अडाणीपेक्षा निर्बुद्ध हाच शब्द योग्य वाटतो. लेखकाचे थोडक्या शब्दात हा खूप मोठा अर्थ सांगण्याचे जे कसब आहे, ते आपल्याला थक्क करते .
आयडिया या गोष्टीमध्ये, रेल्वे प्रवासामध्ये एक आंटी तरुण मुलाना त्यांच्याकडून झालेला कचरा व्यवस्थित गोळा करून प्लॅस्टिक पिशवीमध्ये, जशी आंटीने बरोबर आणली आहे, तशा पिशवीत टाकायची आयडिया सुचवतात. काही वेळानंतर थोड़ी झोप झाल्यावर, आंटी पहातात तर मुलांनी सगळा कचरा साफ केलेला दिसतो . पण – – पण आंटीच्याच पिशवीमध्ये गोळा करून भरून ठेवून मुले आपल्या स्टेशनवर उतरून निघून गेलेली असतात. .
ऑफीसमध्ये काम करणाऱ्यांना वेळेवर पगार न मिळणे हे नित्याचेच . मग तो पोस्टमन असो, एसटी डायव्हर असो की कुटुंब प्रमुख अन ऑफिसर . पोस्टमन एका घरी गृहिणीकडे आपला ३ महिने पगारच न झाल्याचे सांगत पैशाची मागणी करतो . ही गोष्ट जेव्हा ती गृहिणी आपल्या नवर्याला सांगते, तेव्हा तो म्हणतो, सांगायचं नाही का त्याला साहेबांचाही पगार ३ महिने झाला नाही . त्यावेळी ती थक्क होऊन विचारते, तुम्ही बोलला नाहीत ते? तेव्हा तो म्हणतो, कसा बोलणार ? कुटुंबाचा प्रमुख आहे ना?
छोटा संवाद पण खूप काही सांगून जातो ” कुटुंब प्रमुख” या कथेमध्ये ….. अशा साध्या साध्या प्रसंगातून घराघरातील परिस्थिती, मानसिकता, कुटुंब प्रमुखाची होणारी कुचंबणा, त्याचे धैर्य आणि अगतिकता अल्प शब्दात लिहिण्याचे लेखकाचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे .
अलीकडे लहान मुलांना मनसोक्त खेळायला, बागडायला जागाच नाही . त्यांची किलबिल, दंगा, आरडा ओरडा, हसण्या खिदळण्याचे आवाज येत नाहीत . मोठ्याना पण सुने सुने वाटते आहे . ही भावना ” दुर्लभ” या कथेतून वाचताना आपल्यालाही ही बोच मनोमन पटल्याशिवाय रहात नाही ..
हल्ली मुलांना शिक्षणातला ओ की ठो येत असो वा नसो पास करायचेच, नापास करायचेच नाही हा फंडा आहे . पालकांना माहिती आहे की आपला मुलगा वाचू शकत नाही, पाढे पाठ नाहीत तरी ४थीत गेला कसा? म्हणून शाळेत चवकशी करायला जातात तर त्याच वेळी शाळेचा निकाल – प्रत्येक वर्गाचा निकाल १००% लागल्या बद्दल शाळेचा, मुख्याध्यापक, सगळा स्टाफ यांचा सत्कार होणार असतो . टाळ्यांच्या गजरात कार्यक्रम पुढे सरकत असतो . ते पालकही, आपला पाल्य बोट सोडून पळून गेलाय याकडे दुर्लक्ष्य करून टाळ्या वाजवायला लागतात . शिक्षण क्षेत्रातला विरोधाभास, दुष्ट पण कटू सत्य आणि पालकांची अगतिकता लेखकानी थोड्या शब्दान टाळी या लघुकथेत वर्णन केली आहे .
लक्ष्यावधी बीजं हे पुस्तक वाचताना खूप वैशिष्ट्यपूर्ण कथा आपल्याला वाचायला मिळतात, त्यामध्ये ज्याचं त्याचं दुःख, मनोकामना, कर्ज, कठपुतळी , कर्जदार या सांगता येतील . आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे या कथा वाचताना आपण अनुवादित कथा वाचतो आहोत हे जाणवतसुद्धा नाही . मराठीत इतका सुंदर अनुवाद झाला आहे की जणू काही या कथा मूळ मराठीतच लिहिलेल्या आहेत असे वाटते, आणि ते या दोन अनुवादिकांचे यश आहे . फक्त आपल्याला कधी जाणवतं … तर त्यामधील पात्रांची जी नावे आहेत ती मराठीतली नाहीत … दादाजी, अनुलोम, दीनबंधू इ .आहेत एवढेच. यासाठी या दोन्ही मराठी लेखिकांना सलाम !
म्हणूनच समस्त वाचक वर्गाला विनंती की हे पुस्तक विकत घेऊन मुद्दाम वाचावे .सर्वाना आवडणारे, वेगळाच आनंद देणारे, समाजातील बोलकी चित्रे विरोधाभासासह रेखाटणारे हे पुस्तक पुरस्कारास यथायोग्य असेच आहे .
उज्वलाताई आणि मंजुषाताई दोघींनाही पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा .
परिचय : सौ अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈