सौ.अस्मिता इनामदार
पुस्तकावर बोलू काही
☆ “रानवाटा” – श्री मारुती चितमपल्ली ☆ परिचय – सौ.अस्मिता इनामदार ☆
पुस्तक : रानवाटा
लेखक : मारुती चितमपल्ली
जंगल, अरण्य म्हटलं म्हणजे हमखास मारुती चीतमपल्ली यांचीच मला आठवण येते. त्यांच्या ” चकवा चांदण ‘” या पुस्तकाच्या मी प्रेमातच आहे. त्यांचेच ” रानवाटा ” हे ललित लेखांचे पुस्तक हातात पडले आणि लगेच वाचायला घेतले.
एकूण १५ लेखांचा यात समावेश आहे. लेख जरी ललित असले तरी ते कथाच वाटतात.
अरणी हे नाव एका आदिवासी मुलीचे हे. पहिलाच लेख तिच्यावर लिहिला आहे. एका इंग्रज माणसाच्या सहवासात ती अचानक येते तशीच निघूनही जाते. याचे मार्मिक लेखन वाचताना ती जणू आपलीच कुणीतरी आहे असं वाटतं.
यातील प्रत्येक लेख म्हणजे रानातली एक वाटच आहे. अशा १५ रानवाटा या पुस्तकात आहेत, ज्या वरून चालताना आपण तिथे आहोत असा भास होतो. या रानवाटांवर अनेक नवे शब्द, नावे प्राणी, नवीन जागा आपल्याला वेळोवेळी भेटतात.
तणमोर, धनचिडी, हुदाळे, दिवारू, नाकेर, ढीवरा याचा अर्थ ते लेख वाचावे लागतात.
आपण बासरी किंवा पावा वाजवतो त्याचा बांबू वेगळ्या प्रकारचा असतो त्या बनाची माहिती ” वेणू वाजाताहे ” या लेखात आहे.
“गुलाबी पिसं ” यात अरुण बाड्डा या रानबदकाची ती पिसे आहेत हे समजलं. तसच तिथल्या ” घोटुल “
म्हणजे एक विशिष्ट प्रकारचे घर. ” तणमोर ” या पक्षाविषयी छान माहिती मिळते. हा पक्षी मोरासरखाच पण कोंबडी एवढा असतो. ती सर्व पक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढतो. ” रानातली घरं ” यात त्यांची सोलापुरातली घरं आणि रानातली घरं या विषयी सांगितले आहे. या शिवाय पखमांजर या पक्ष्याची ओळखही इथे होते. खरं तर ही एक उडणारी खारच आहे. नंतर येतात हुदाळे. म्हणजे पाणमांजर. त्यांच्या सवयी बद्दल विस्तृत वर्णन या लेखात आहे. दिवारू हा फक्त मासे मारणारा, पण जंगलाचं ज्ञान अफाट. त्याच्यावर एक संपूर्ण लेख आपल्याला वाचायला मिळतो. पक्ष्यांबरोबर जंगलातल्या विविध झाडा बद्दलही लेख आहेत.
” शाल्मली ” या लेखात शाल्मली आणि वारा यांच्या भांडणाबद्दल लेखकांनी सांगितले आहे.
याबरोबरच पक्षी निरीक्षण कसं करावं ही ही माहिती दिली आहे. मुख्य म्हणजे यासाठी दुर्बिणीची गरज असते. वेळ, काळ, नोंद वही, आणि मुख्य म्हणजे अनिश्चित काळ पर्यंत बैठक जमवावी लागते. या लेखात त्यांनी लिहिलंय. : ” झाड म्हणजे पाखरांचा स्थिर निवारा. बाहू सारख्या पसरलेल्या फांद्या सर्व पक्ष्यांना जवळ बोलावीत असतात. झाडांना चालता येत नाही म्हणून पक्षीच त्यांच्याकडे जात असतात. पाखरं आणि झाडं म्हणजे एक जिवंत शिल्प आहे. त्यांच्यात कधीही न तुटणारं नातं आहे. वृक्षाकडे झेप घेणारी पाखरं, वृक्षापासूनs दूर जाणारी पाखरं, शांत वृक्षावर गाणारी पाखरं, ही सारी दृश्ये म्हणजे सृष्टीतील काव्यच आहे.”
ज्यांना पक्षी निरिक्षणासाठी रानात जाता येत नाही त्यांनी आपल्या बागेत बर्ड टेबल करावं असं लेखक सांगतो.
शाल्मली या झाडा सारखाच त्यांनी पांगारा या झाडा विषयी ही लिहिले आहे. या झाडावर खूप पक्षी येतात. त्यामुळे घराभोवती याची खूप झाडे लावावीत.
वन्यजीव निरीक्षण ही एक जादू आहे असं लेखक म्हणतो. त्या बद्दलचे अनेक रोमांचकारी अनुभव त्यांनी या लेखात सांगितले आहेत.
या पुस्तकातील शेवटचा लेख हा या पुस्तकाचा आराखडाच आहे. जंगलात काय पहायचं, काय काळजी घ्यायची, आतील रस्ते, पाणवठे, झाडं, प्राण्यांची निवास स्थान या विषयी पुर्ण माहिती असणे गरजेचे असते. वाट चुकू नये म्हणून काय करावे, कपडे कोणते घालावेत, सॅकमध्ये कोणत्या वस्तू हव्यात हे सारे तपशील वार सांगितले आहे. तशा पुष्कळ गोष्टींचा ऊहापोह या लेखात आहे. पूर्ण पुस्तकाचे सारच यात आहे.
हे मी लिहिलेले परीक्षण तसे त्रोटकच आहे. ते समजण्यासाठी हे पुस्तक वाचणेच गरजेचे आहे.
या शिवाय प्रत्येक लेखाबरोबर रेखाचित्र दिले आहे.
एकंदरीत ” रानवाटा ” हे पुस्तक अतिशय रमणीय, उत्कंठावर्धक आणि आपली ज्ञानात भर घालणारे आहे.
परिचय – अस्मिता इनामदार
पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ, वखारभाग, सांगली – ४१६ ४१६
मोबा. – 9764773842
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈