सुश्री मंजिरी येडूरकर
पुस्तकावर बोलू काही
☆ “एक नवी सकाळ”(अनुवादित कथासंग्रह) – अनुवादिका : सौ उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सौ. मंजिरी येडूरकर ☆
“ एक नवी सकाळ “ (अनुवादित कथासंग्रह ) अनुवादिका : उज्ज्वला केळकर परिचय : मंजिरी येडूरकर
पुस्तक : एक नवी सकाळ – ( अनुवादित कथासंग्रह )
अनुवादक : उज्ज्वला केळकर
प्रकाशक : नवदुर्गा प्रकाशन
पृष्ठे : 176
किंमत : रु. 390/-
हा कथासंग्रह म्हणजे हिंदीमधील निरनिराळ्या लेखकांच्या हिंदी कथांचा मराठीत केलेला अनुवाद आहे.
कथासंग्रहाला त्यांनी पहिल्या कथेचेच नाव दिले आहे. मुखपृष्ठावरही या कथेशी निगडित चित्र आहे. एक दिवस मुलगी आपल्या सावत्र आईला ‘आई’ म्हणून स्विकारते आणि दोघींच्या आयुष्यात एक नवी सकाळी येते, अशी कल्पना रंगवली आहे. त्या दोघींचा भावनिक प्रवास दाखविण्यासाठी मुखपृष्ठावर आईचा हात धरून चाललेली मुलगी दाखवली आहे. ही पहिलीच कथा सूर पकडते, व मग पुढे आपण त्या सप्तसुरांच्या गुंत्यात कसे अडकतो आणि भैरवी कधी येते कळतच नाही.
अनुवाद कसा असावा याबाबत खूपच मतभेद आहे. काहींच्या मते अनुवाद म्हणजे शब्दशः भाषांतरअसावे. म्हणजे मूळ लेखकच कथेमध्ये दिसला पाहिजे. काहींच्या मते कथेच्या गाभ्याला हात न लावता काही शब्द बदलण्याचे स्वातंत्र्य लेखकाला असावे. कारण त्या त्या भाषातले मनाला भिडणारे शब्द वेगवेगळे असू शकतात. त्याला मग अनुवाद किंवा भावानुवाद असं म्हणतात. काहींच्या मते मूळ लेखनाच्या भाषेतील शब्द जर अनुवाद करायच्या भाषेतही रूढ किंवा प्रचलित असते तर तसेच ठेवण्यास हरकत नसते. मूळ कथेमधील पर्यावरण, कथा ज्या काळात घडते तो काळ, तिथल्या प्रथा परंपरा या जर महत्त्वाच्या असतील तर त्या जशाच्या तशा अनुवादामध्ये असाव्यात.
उज्ज्वला केळकर यांचा अनुवाद कुठेही एकटाकी झालेला नाही. कथेला साजेसा असा योग्य तो प्रकारच त्यांनी अवलंबिला आहे. जेणेकरून कथा वाचकाच्या मनाला भिडेल. कांही कथा मराठी वातावरणात आणल्यामुळे मनाला भावतात. त्या कथातून आपल्याला उज्वलाताईच दिसतात. कधी भोंवतालची परिस्थिती, संस्कृती परंपरा तशाच ठेवल्यामुळे कथा पूर्णपणे त्या समाजाची त्या लेखकाची वाटते. तर कधी त्यातील माणसांची नावे, गावांची नावे, त्यांच्या बोली भाषेतील काही वाक्ये, सगळं तसंच ठेवल्यामुळे डोळ्यासमोर तो परिसर, ती माणसे जशीच्या तशी येतात व भावना खोलवर परिणाम करतात.
‘त्या दिवशी असं झालं ‘ या कथेत अतिरेक्यांशी झुंजताना घायाळ झालेला मेजर, आता वेदनांशी दोन हात करतानाही त्याचा मिस्कील स्वभाव मात्र सोडत नाही. चकमकीत तो जेव्हा घायाळ होतो व आपल्या जिवाचा भरोसा नाही हे त्याच्या लक्षात येतं, त्यावेळी त्याने प्रथम काय केलं असावं? नाही, मी सांगणार नाही, त्यासाठी कथाच वाचायला हवी. ‘त्याचं पाहिलं उड्डाण ‘ या कथेत चिमुकला पक्षी पहिल्यांदा घरट्याबाहेर उडण्यासाठी कसा झुंजतो याचं फार सुंदर वर्णन केलं आहे. आपल्या डोळ्यासमोर त्या पक्ष्याचं कुटुंब व त्यांचे कातर भाव जिवंत होतात. ‘शह आणि मात’ या कथेत कामगारांचे आंदोलन, ते चिरडणारे मालक, त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खेळी आणि मग उजाड झालेलं कामगारांचे भविष्य!
‘असंही घडतं’ या कथेमध्ये एक वर्ष, पत्र उशिरा मिळाल्यामुळे झालेला गोंधळ, मनस्ताप तर आहेच पण मुलगा- मुलगी यांच्यात जन्मापासून केल्या जाणाऱ्या भेदभावाला वाचा फोडली आहे. ‘वाटणी’ या कथेत आपण आईचा मोठा मुलगा असल्यामुळे आपल्याला आईचे मिळालेले प्रेम, आशीर्वाद हे इतर भावांपेक्षा जास्त आहेत, मग ज्या घरात आई नाही अशा घरात वाटणी कशाला हवी? असा विचार करणारा मुलगा आणि त्याच्या भावनांचं कथन आहे. ‘सुंदर वनातली अनोखी कथा’ ही तर फार सुंदर कथा आहे आदिवासी जंगलात राहणाऱ्या लोकांचे जीवन तर सुंदर उभं केलं आहे पण ती माणसं आणि जंगलातले प्राणी यांच्यातलं नातं स्पष्ट करणारी एक हृदयद्रावक कथा आहे. या कथेत लेखिकेने परिसर, लोकांची राहणी, भाषा याला महत्त्व असल्याने तो मूळ बाज बदललेला नाही. त्यांच्या बोलण्यातला हिंदी लहेजा सुद्धा काही ठिकाणी तसाच ठेवला आहे. त्यामुळे कथा आपल्या डोळ्यासमोर घडते आहे असं वाटतं. ‘नाही कुठे ठिकाणा’ ही कथा तर मेंदू बधिर करणारी आहे. नात्यातला फोलपणा मन सुन्न करून टाकतो. ‘रिसायकल बीन मध्ये मल्लिका ‘ ही कथा मला तरी नावावरून विनोदी असणार असंच वाटलं होतं, पण तशी नाही. मुलाला त्याचं प्रेम मिळावं म्हणून हळवी होणारी आई, त्यासाठी योग्य निर्णय घेण्याचे धाडस करणारी आणि मुलालाही धाडस देणारी आई बघितल्यावर आपला ही ऊर अभिमानानं भरून येतो. आता ही मल्लिका रिसायकल बिनमध्ये कशी व कां गेली, हे कथा वाचल्याशिवाय कळणार नाही.
या सगळ्या कथा निरनिराळ्या भावना, नातेसंबंध, व्यवहार यांची जाणीव करून देतात व त्यावर विचार करायला भाग पाडतात.
उज्ज्वला ताईंनी निवडलेल्या कथात काही भयकथा किंवा रहस्य कथाही आहेत. ‘अज्ञात ग्रहाचे रहस्य’ या कथेत अंतराळयानाच्या अपघातामुळे सगळे अंतराळवीर मृत्युमुखी पडतात, काही कालावधीनंतर त्या अंतराळयानाचे काही अवशेष सापडतात का हे पाहण्यासाठी एक अंतराळयान अवकाशात पाठवले जाते. त्यावेळी त्या अंतराळ वीरांना एक आनंदाची गोष्ट कळते व एक दुःखाची! त्या मीच सांगितल्या तर वाचतानाची उत्सुकता कशी राहील बरं! ‘तो परत आला होता या कथेमध्ये एका माणसाच्या हातून भिकाऱ्याचा नकळत खून होतो. पण त्यानंतर त्या भिकाऱ्याला त्याने दिलेली वागणूक ही मात्र माणुसकीला काळीमा फासणारी आहे. चिडलेला भिकारी नंतर त्या माणसाचा कसा बदला घेतो ते कथेतच वाचण्यात गंमत आहे. ‘आरसा ‘ही एक अशीच चित्त थरारक कथा आहे या कथेत अंधारात माणूस घाबरला की त्याला भास कसे होतात व भिती कशी वाढत जाते याचं वर्णन आहे. या कथेचा शेवट मात्र अफलातून आहे. एकदा भुवया उंचावल्या आणि तोंडाचा ‘आ’ वासला की लवकर मिटतच नाही.
या संग्रहात कांही विनोदी अंगानं जाणाऱ्या ही कथा आहेत. ‘चार शिशूंची कथा’ व ‘विक्रम वेताळ या कथा वाचल्या की मन हलकं फुलकं होतं. आणि लेखकाला हे विषय सुचलेच कसे असतील याचं कौतुक वाटतं. तशीच आणखी एक हलकीफुलकी कथा म्हणजे ‘गंगेत घोडं न्हालं ‘. लग्नापूर्वी मुलगा, मुलगी एकमेकांच्या आवडी – निवडी जाणून घेण्यासाठी एकमेकांना भेटतात. त्या जर जुळल्या तर लग्नाला होकार देतात. पण एकमेकाचे दोष, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी यांचा विचारच करत नाहीत. अशी लग्ने मग अल्पायुषी ठरतात. यावर वाचकाला विचार करायला प्रवृत्त करणारी कथा आहे. या कथेचं मूळ नाव आहे ‘तुम्हारी भी जय, हमारी भी जय’. पण कथा वाचल्यावर लक्षात येईल की याचं मराठीत भाषांतर न करता उज्वला ताईंनी ‘गंगेत घोडं न्हालं’ हा किती अर्थपूर्ण वाक्प्रचार वापरला आहे. त्यामुळे ही कथा मराठी माणसाला आपल्याच घरात घडते आहे असं वाटल्यावाचून रहात नाही. ‘खंधाडिया ‘ हे आदिवासी भागातल्या एका प्रथेचं नाव आहे. याला मराठीमध्ये योग्य शब्दच नसल्यामुळे लेखिकेने हेच नाव आपल्या कथेला दिले आहे. बाहेरख्याली व भ्रष्ट अधिकारी असणाऱ्या आपल्या मुलाला जातीतून बहिष्कृत करण्याची मागणी बाप करतो. बापाची सुने बद्दलची काळजी आणि मुलाबद्दलचा राग पराकोटीचा दाखवला आहे. एका भाबड्या मुलीचं खंबीर आईत होणार रूपांतर मनाला भावून जातं. तसेच खंधाडिया ठेवण्याच्या विकृत परंपरेविरुद्ध उभे राहणारी मुलगी ही समाजात होणाऱ्या चांगल्या बदलाचं प्रतीक व उद्याचं आशास्थान होते.
उज्वलाताईंच्या सगळ्याच कथा वाचकाला वाचायला खूप आवडतील अशा आहेत. माझ्या मते या कथासंग्रहातील उल्लेखनीय गोष्टी – –
- कथांची निवड फार छान केली आहे.
- त्यात निरनिराळ्या भावभावनांचा आविष्कार वाचायला मिळतो.
- कथांमध्ये खूप विविधता आहे. भयकथाही आहे. विनोदी अंगाने जाणाऱ्याही कथा आहेत.
- शिक्षणाचा अभाव असणाऱ्या भागात चुकीच्या प्रथा परंपरा अजूनही सांभाळल्या जातात आणि त्यात भरडली जाते ती स्त्रीच ! भोगावे लागते ते स्त्रीलाच ! आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर अशा चुकीच्या प्रथांना बळी पडते ती स्त्रीच! हा एक समाजाला पोखरून काढणारा धगधगता विषय ही त्यांनी अंतर्भूत केला आहे.
इतकं सुंदर पुस्तक तर आपल्या संग्रही हवंच !
परिचय : सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री
मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈