सौ.अस्मिता इनामदार
पुस्तकावर बोलू काही
☆“माझी टवाळखोरी” – श्री अमोल केळकर ☆ परिचय – सौ.अस्मिता इनामदार ☆
विनोदी साहित्याने जीवन आनंदी होते. टवाळा आवडे विनोद असं जरी रामदासांनी म्हंटले तरी टवाळ हा शब्द रिकामटेकड्या लोकांसाठी त्यांनी वापरला आहे. पण अमोलची – आत्ता हा जरी लेखक असला तरी आम्हाला तो अमोलच आहे – टवाळ खोरी ही टवाळगिरी नाही हे लक्षात घ्यायला हवे. शुद्ध भावनेने केलेले विनोदी लेखन हा या पुस्तकाचा गाभा आहे. हे लेख मनोरंजनाबरोबरच बोधप्रदही आहेत. अमोल उवाच – १ व अमोल उवाच -२ असे दोन भाग या पुस्तकात आहेत. पहिल्या भागात आपण विनोदी आठवणीत रमातो तर दुसऱ्या भागात विडंबन गीते आपल्याला खदखदून हसवतात. विडंबन कसे असावे याचा उत्कृष्ट परिपाठ इथे मिळतो
” कायप्पा ” च्या माध्यमातून आमोलची टवाळखोरी आपल्या समोर आली. कायप्पा हा शब्दही टवाळ खोरीचा मामला आहे. व्हॉटस् ॲप्स चे मराठी भाषांतर त्याने केलेय. काय अप्पा? = कायप्पा. मजा आहे ना ? निखळ आनंदाचा सागर निर्भेळ विनोद घेऊन या पुस्तकाच्या रूपाने आपल्या समोर आलाय. यातील प्रत्येक लेखावर बोलायचे झाले तर एक प्रबंधच सादर करता येईल. पहिल्या भागात एकूण ७१ लेख आहेत. दुसऱ्या भागात ४३ विडंबन गीते आहेत.
अमोल उवाच मधील काही निवडक लेखांचा मी उल्लेख करेन ज्यातून त्याच्या लिखाणाची सुंदर झलक दिसून येईल. सध्या कोरोना मुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. भविष्यात शाळेचा वर्ग कसा असेल हे ” आधुनिक शाळेतील एक दिवस ” यात समजते. या लेखातील शिक्षण पद्धती खरोखरच थक्क करणारी आहे. शाळा आली की अनुषंगाने गुण पत्रिकाही आलीच. त्यावर मस्त खुसखुशीत टवाळखोरी आहे.
भाई अर्थात पु. ल. यांच्या वरचे ५ ही भाग एकदम भन्नाटच आहेत. ते जर पु. ल. नी वाचले तर तेही छान दाद देतील. या बरोबरच गायकी ढंगातले संगीत रागही आपले अस्तित्व दाखवून जातात. ” शाळा चांदोबा गुरुजींची ” या गीतातून सर्व ग्रह नक्षत्रांची मांदियाळीच भेटते. ” जो उस्ताद तोच वस्ताद ” यातल्या कोपरखळ्या खदखदून हसवतात. ” साप शिडी ” हा वैचारिक लेख आपल्या जीवनावरच बेतलेला वाटतो.
” एक रस्ता आ हा आ हा ” हा एक प्रवासी. प्रवास हा अमोलच्या जीवनाचा अविभाज्य घटकच आहे. प्रवास हा त्याचा छंदच आहे हे त्याच्या स्टेटस वरच्या फोटोने लक्षात येते.
” बदाम सत्ती ” हा एक वैचारिक लेख आपल्याला छान सल्ला देतो. आयुष्यातली अनियमितता किंवा कुठल्याही परिस्थितीत आशावादी राहणे हे या सत्तीकडून शिकायला हवे. ” एक संवाद त्यांचाही ” हा लेख अमोलची अप्रतिम कल्पनाशक्तीच प्रत्ययाला आणून देतो. सगळ्या रेल्वे गाड्या आपापसात जे काही बोलतात याची आपण कधीच कल्पना केलेली नसते. त्या बरोबरच एस टी चा ही संवाद आपल्याला प्रवासाचा आनंद देऊन जातात. ” मराठी भाषा दिन १ आणि २ हे लेख तर नक्कीच आवडण्या सारखे आहेत. मराठी भाषेचा अभिमान सर्वानाच असतो पण त्याबद्दलची अनास्था बघितल्यावर खंतच वाटते. ” इथे साहित्याचे साचे मिळतील ” हा ही लेख भन्नाट आहे. हा जो मॉल दाखवला आहे तो बघून थक्कच व्हायला होतं. त्याच्या मालकांनी तो मॉल बघायला बोलावलं आहे तेव्हा आपण नक्कीच जाऊ.
आता जरा विडंबनाकडे वळूयात. या भागाचे शीर्षकच मार्मिक आहे. ” अशी विडंबन येती आणिक मजा देऊनी जाती ” आठवलं ना ते गाणे ? अशी पाखरे येती…. यातले प्रत्येक विडंबन गाजलेल्या गाण्यावर आधारित आहे. हा साहित्य प्रकार फारसा लोकप्रिय नाहीय. विसंगती पकडणे हा विडंबनाचा मुख्य गाभा आहे, तो सापडला की विडंबन योग्य होते. सर्वच गीतांवर लिहिणे वेळेअभावी शक्य नाही, पण काही लक्षात राहण्यासारखींची शीर्षके सांगते, गाणी तुम्ही ओळखायची. ” खोटी खोटी रूपे तुझी “,
” जिवलगा कधी रे येशील तू ” ” स्विगीची भाकरी “, ” ही पाल तुरू तूरू “, ” सुंदर ते यान “, ” अजी मोदकाचा दिनू “, ” योगा
योगा अखंड करूया “. ही गाणी प्रत्यक्ष वाचली तरच त्याचा आनंद मिळेल.
जाता जाता एक सांगावेसे वाटते की काही लेखात राजकीय भाष्य केले असले तरी राजकारणातला खवटपणा त्यात अजिबात नाही. अमोलची ही टवाळखोरी मनोरंजनाबरोबरच बौद्धिक विचारांना चालना देणारी नक्कीच आहे.
आता जास्त पाल्हाळ न लावता माझा हा टवाळ लेख इथेच संपवते.
जय टवाळखोरी….
परिचय – अस्मिता इनामदार
पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ, वखारभाग, सांगली – ४१६ ४१६
मोबा. – 9764773842
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈