सौ. दीपा नारायण पुजारी
☆ सुखद सफर अंदमानची… भाग – १ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆
सेल्युलर जेल
विहार ट्रॅव्हल्स सोबत आम्ही पोर्ट ब्लेअरच्या विमानतळावर पाऊल ठेवलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा घाम ज्या भूमीवर गळला त्या भूमीवर आपण उभे आहोत ही भावना आमच्यातल्या प्रत्येकाच्या मनात होती. भारतीय असल्याचा अभिमान सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. समोर होता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा. त्या पुतळ्याच्या पायथ्याशी उभं राहिलं की समोर दिसतात
देवनागरी लिपीतील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा ही अक्षरं. हे नाव वाचताना मान आणि खांदे दोन्ही अभिमानानं ताठ होतात. भारतभूमीचा हा हिस्सा कुणा इंग्रज अधिकाऱ्याच्या नावानं असावा ही किती दुर्दैवी गोष्ट होती. पण आता बदल होतोय. इथली सगळी बेटं कात टाकलीय जणू. भारतीय नावांनी ओळखली जाऊ लागली आहेत. एक फोटो इथं घेतला जातोच.
इथं बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. दुपारी आम्ही समुद्रिका मरिन म्युझियम बघितलं. या ठिकाणी अंदमानच्या समुद्रात मिळणारे अनेक सागरी प्राणी ठेवले आहेत. काचेच्या पेटीतील, नैसर्गिक वातावरणात ठेवलेले हे सजीव छोटीशी समुद्र सफर करवून आणतात. निळ्या समुद्राखालच्या अनोख्या रंगीबेरंगी दुनियेत हरवून न जाल तरच नवल. शार्क माशाच्या हाडांचा मोठा सांगाडा आपलं स्वागत करतो. सावरकरांच्या भेटीची वेळ ठरलेली असते. त्यामुळे मस्य दुनियेतून बाहेरच्या जगात पाऊल ठेवावेच लागते. पुढील भेट जास्त महत्त्वाची असते.
आज राष्ट्रीय स्मारक असलेले सेल्युलर जेल, खरंतर ब्रिटिशांनी बांधलेला तुरुंग आहे. या तुरुंगाची रचना सायकलच्या चाकासारखी आहे. (ओक्टोपस या प्राण्यासारखी) या रचनेला पॅनोप्टिकॉन म्हणतात. एकोणीसाव्या शतकातील इंग्लंडमधील महान तत्त्वज्ञ बेंथमन यानं ही रचना सुचवली होती. इमारतीच्या मध्यभागी एक उंच टॉवर आहे ज्यावर चोवीस तास एक पहारेकरी असतो. या टॉवर वर एक घंटा आहे. ही घंटा वाजताच उठण्याची सक्ती होती. घंटा सुर्योदय होण्यापूर्वीही वाजे. दमलेल्या कैद्यांची झोप पूर्ण होण्यापूर्वीच. या टॉवरभोवती सायकलच्या स्पोक्सच्या आकारात सात इमारती. प्रत्येक विंगला तीन मजले आहेत. प्रत्येक मजल्यावर छोट्या छोट्या खोल्या. जणूकाही सजीवांच्या शरीरातील पेशी. या खोल्यांची संख्या सातशे. पण रचना अशी की इतर खोल्यांमधील कैदी बिल्कुल दिसत नाहीत. आपण समाजप्रिय आहोत. त्यामुळं आपल्या आजूबाजूला असणारे इतर कैदी दृष्टीस न पडणं हे सुद्धा खूप त्रासदायक ठरत असेल. आपल्या शरीरातील पेशींमध्ये देवाणघेवाण होत असते. या जेल मधील सेल्स मध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क साधता येत नसे. कैद्यांनी एकमेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न जरी केला तरी कठोर शिक्षा होत असे.
या जेल मधील प्रत्येक सेलची, लांबीरुंदी ४. ५मीटर×२. ७मीटर(१४. ८फूट×८. ९फूट) एवढीच आहे. तीन मीटरवर (९. ८फूटावर) फक्त एक खिडकी आहे. जेवणाचा दर्जा अतिशय निकृष्ट. एका पसरट लोखंडसदृश्य धातूच्या भांड्यात कसलं तरी हिरवट पाणी मिळत असे. त्यात किडे अळ्या पडलेल्या असत. पिण्याचं पाणी शारीरिक स्वच्छतेसाठी सुद्धा वापरू शकणार नाही इतकं घाण, गटारगंगेसारखं. वास सहन न होणारं. कैद्यांना कोलू ओढून तेल काढावं लागत असे. नारळ सोलावे लागत. साखळदंड बांधलेल्या अवस्थेत ही कामं विश्रांती न घेता करणं फारच कठीण होतं. त्यांना जर कोणी कामचुकारपणा करतोय असं वाटलं किंवा दिवसभरात दिलेल्या प्रमाणात तेल गाळलं गेलं नाही अथवा नारळ सोलले गेले नाहीत तर कोडे मारले जात. हात वर केलेल्या अवस्थेत पाठीवर, पायावर हे कोडे पडत. तरीही काम न झाल्यास, बंडखोरी केल्यास दोन पायांत आडवी काठी ठेवली जाई. मार तर खावाच लागे पण पाय जवळ घेता येत नसत.
शिक्षा जीवघेणी तर होतीच. निकृष्ट अन्न, पाणी, यांनी आजारपण ठरलेलंच होतं. अन्नत्याग केला किंवा उपोषण केलं तर जरबीनं नाकातून नळीनं दूध घातलं जाई. या धडपडीत फुफ्फुसात दूध जाऊन काही स्वातंत्र्यवीरांचा मृत्यू झाला आहे. या गोष्टी लपवल्या जात. काहींना वेडं ठरवलं गेलं तर काही खरंच स्वतःचं भान विसरून मानसिक स्वास्थ्य हरपून बसले.
याच परिसरात फाशीघर आहे. एक म्युझियम आहे जिथं, कोलू, साखळदंड, आसूड इ. ठेवले आहे. हे बघताना मानसिक यातना न झाल्या तर नवलच. इथं भेट देणारी एकही व्यक्ती अशी सापडणार नाही जिच्या डोळ्यात पाणी आलं नाही, मन भरून आलं नाही, देशाभिमान आणि स्वातंत्र्यवीरांच्या अभिमानानं उर भरून आला नाही. या इतिहासाची साक्ष देत उभा असणारा पिंपळ सुद्धा आपल्या सगळ्यांचं दैवत बनतो. इथल्या हुतात्मा स्मारकासमोर आपण नतमस्तक होतो. गुडघे टेकून इथली माती कपाळाला लावतो. जड पावलांनी, जड ह्रदयानं आणि त्याहून जड मनानं तिथून बाहेर पडतो…कदाचित एक मन तिथंच ठेवून…
– क्रमशः भाग पहिला
© सौ. दीपा नारायण पुजारी
इचलकरंजी
9665669148
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈