श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ मी आले, निघाले, सजले फुलले, फुलपाखरू झाले… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
… ” अगं ये! ऐकलसं का? आमच्या ऑफिसची पिकनिक निघालीय येत्या शुक्रवारी रात्री लोणावळयाला. आणि रविवारी रात्री उशिरापर्यंत परत येणार आहे, चांगले दोन दिवस मौजमजा करुन. तेव्हा जाताना मला भडंग आणि कांदे मिरच्या बांधून देशील.. आम्ही प्रत्येकाने काय काय खाणं आणायचं तेही वाटून घेतलयं बरं.. तुला उगाच करत बसायला त्रास पडायला नको म्हणून अगदी बिना तसदीचं मी ठरवून घेतले आहे.. थंडी फार असेल वाटते आता तिकडे तेव्हा माझे स्वेटर्स, पांघरूण शिवाय दोन दिवसाचे कपडे देखील बॅगेत भरून देशील..बऱ्याच वर्षांनीं पिकनिक निघतेय. तेव्हा मी न जाऊन चालेल कसे?.. “
“.. हे काय मी एव्हढ्या उत्साहाने तुला सांगतोय आणि तू हाताची घडी घालून डोळे बंद करुन हसत काय बसलीस? कुठल्या स्वप्नात दंग झाली आहेस? मी काय म्हणतोय ते ऐकतेस आहेस ना?.. “
” हो हो डोळे बंद असले तरी कान ऊघडे आहेत बरं! झालं का तुमचं सांगुन? का आणखी काही शिल्लक आहे? नसेल तर मी आता काय सांगते ते ऐका! काय योगायोग आहे बघा! आमची महिला मंडळाची सुद्धा पिकनिक निघालीय याच शुक्रवारी रात्री लोणावळयाला,आणि रविवारी रात्री उशिरापर्यंत परत येणार आहे, चांगले दोन दिवस मौजमजा करुन. बऱ्याच वर्षांनीं पिकनिक निघतेय. तेव्हा मी न जाऊन कसे चालेल ?. आम्हा बायकांना तुम्ही पुरुषांनी संसाराच्या चक्रात बांधून पिळून काढत आलात.. फक्त नोकरी आणि तिच्या नावाखाली आजवर आम्हाला वेठीस धरलंय तुम्ही.. रांधा वाढा घर सांभाळा, आलागेला, पोरबाळं आणि गेलाबाजार सासूरवाडीचा बारदाना झेला.. यातच आमचा जन्म वाया गेला… कधी तरी हौसमोज करायची होती.. मेली काटकसर आमच्या नशीबी पाली सारखी चिकटली ती काही सुटायचं नाव घेईना.. साधं माहेरला चार दिवस जाऊन निवांत राहिन म्हटलं तरीही ते जमेना… या उसाभरीत तो जीव कातावून गेला मग आमच्या महिला मंडळाने हा स्व:ताच पुढाकार घेतला.. आम्ही सगळया झाडून पिकनिकला जातोय म्हटलंय.. अगदी एकेकीने पदार्थ पण वाटून घेतलेत.. तयारीसुद्धा सुरू झाली… मी तुम्हांला सांगणारच होते पण म्हटलं तुम्ही काही शनिवारी रविवारी घर सोडून जाताय कुठे? जायच्या आधी एक दिवस कानावर घालू मग जाऊ.. “
“.. तेव्हा लेडीज फस्ट या न्यायाने मी पिकनिकला जाणार हे नक्की.. तुमची यावेळची पिकनिक पुढे ढकला.. नि मला पिकनिकला जायाला जरा मदत करा… आणि हो एक महत्त्वाचं या पिकनिकच्या दिवसात तुम्ही घर सांभाळणार आहात कुठलीही कुरबुर न करता समजलं.. मला कसे जमेल म्हणायचा आता प्रश्नच येत नाही.. संसाराला आता पंचवीसहून अधिक वर्षे लोटली..आता येथून पुढे संसाराची अर्धी जबाबदारी तुम्हालाही द्यायची ठरली… “
“अहो असं काय बघताय माझ्या कडे डोळे विस्फारून.? मी काही चालली नाही तुम्हाला सोडून.!. आता पन्नास टक्के हक्काचे अधिकार आमचेही आहेत त्याचाच लाभ घेणार.. आमच्या मंडळाने ही जागृती केली.. आणि आणि आम्ही सगळया बायकांनी ती आता अंमलात आणायला सुरुवात केली.. तिचा पहिला उपक्रम हि पिकनिक आहे.. तेव्हा बंच्चमजी तुम्ही इथंच थांबायचं आणि मी एकट्याने पिकनिकला जायचं.. “
मी आले, निघाले, सजले फुलले, फुलपाखरू झाले.. वेग पंखाना आला जसा, आला या लकेरी , घेतली भरारी…
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈