श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ दूर राहूनी पाहू नको रे… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
.. दूर राहूनी पाहू नको रे, प्रीतीची शपथ तुला जाऊ नको रे ,प्रिया जाऊ नको रे!..आकाशीच्या चांदण्या वसुंधेरवर उतरल्या आणि आपल्या प्रियतमाला साद देऊ लागल्या. आकाशी चंद्र आता एकाकी पडला.चांदण्याच्या विरहाची काळी चंद्रकला उदासीचे अस्तर लेवून आभाळभर पसरली.चंद्र अचंबित झाला. त्याला कळेना आज अशा अचानक मला सोडून वसुंधेरवर कुणाच्या मोहात या चांदण्या पडल्या!माझ्याहून सुंदर प्रेमाचा कारक असा वसुंधेरवर कोण भेटला?कालपर्यंत तर माझ्या अवतीभवती राहून आपल्या प्रेमाने रुंजी घालत असणाऱ्यांना, प्रत्येकीला मनातून आपला स्व:ताचाच चंद्र मालकीचा हवा असा वाटत होते.. मी त्यांचे मन केव्हाच ओळखले होते. प्रेमाच्या चंदेरी रूपेरी प्रकाशी त्या सगळयांना मी सामावून घेतलेही होते. कुठेही राग रुसवा, तक्रारीला जागा नव्हती. अगदी दृष्ट लागण्यासारखीच आमची अशी अक्षर प्रीती होती कालपर्यंत. पण आज पाहतो त्या प्रेमाचा माझ्या नकळत त्यांनी ब्रेक अप करावा.. ना भांडण, ना धुसफूस ना शिकवा ना गिलवा. हम से क्या भुल हुई जो हम को ये सजा मिली…एक, दोन गेल्या असत्या तर समजून गेलो असतो.. पण इथं तर एकजात सगळ्याच मला सोडून गेल्या .आपापल्या मालकीचा स्वतंत्र चंद्राबरोबर बसून मलाही त्या दूर राहूनी पाहू नको रे, प्रीतीची शपथ तुला जाऊ नको रे प्रिया जाऊ नको रे.. करून साद देत सांगू लागल्या ये रे ये रे तू देखिल इथं खाली वसुंधेरवर ये आणि तुला आवडणारी एखादी चांदणीशी सुत जुळव . आणि आता आपण सगळेच या वसुंधेरवर प्रीतीचं नंदंनवन करुया… म्हणजे पुन्हा गोकुळात रासलिला.. छे छे किती अनर्थ माजेल… नको नकोच ते.
.. मी त्यांना म्हटलं हा काय वेडेपणा मांडलाय तुम्ही.. त्या वसुंधेरवरची लबाड प्रेमी जन मंडळी आप आपल्या प्रियतमेला हवा तर तुला आकाशीचा चंद्र, चांदण्या आणून देतो असं आभासमय ,फसवं आश्वासन देऊन आपल्या प्रीतीची याचना करतात.. ते आपण इथून दररोज वरून पाहात आलोय कि.. कुणाचं सच्च प्रेम आहे आणि कोण भुलवतयं हे आपल्याला इथं बसून बघताना आपलं किती मनोरंजन व्हायचं.. आणि आणि ते सगळं पाहता पाहता आपण सगळे मात्र नकळत मिठीत बांधले जात असताना, त्या प्रेमाचे टिपूर चांदणे वसुंधेरवर सांडले जात असे… मग असं असताना आज अचानक तुमची मिठी रेशमाची सैल होऊन गळून का जावी.. अगं वेड्या बायांनो दूरून डोंगर.. आपलं वसुंधरा.. साजरे दिसतात हे काय वेगळं सांगायला हवं का मी तुम्हांला… आज तुम्ही ज्याला भुलालय तो जरी तुम्हाला मालकीचा स्वतःचा चंद्र गवसला असलाना तर तो तुमचा भ्रम आहे बरं.. अगं ते चंद्र नाहीत तर चमचमणारा काचेचा चंद्र आहेत.. तुमच्या सौंदर्यावर भाळलेला..भ्रमरालाही लाज वाटेल अशी चंचल वृत्तीची प्रिती असते त्यांची.. मग तुम्हाला ही आकाशीचा तो चंद्र आणून देतो हया फसव्या थापा मारतील.. आणि आणि त्यानंतर हळूहळू जसं जसं तुमचं सौंदर्य अस्तंगत होत जाईल ना तसा तसा तुमच्यातला त्याचा इंटरेस्ट कमी कमी होत जाऊन तो नव्या सौंदर्यवतीच्या शोधात राहिल.. मग तुमची काय गत होईल?..इथं निदान कालगती ने तुम्हाला उल्का होउन खाली तरी जाता येत होतं पण तिथं वसुंधेरवर तुम्हाला उल्का सुद्धा होता येणार नाही…
तेव्हा सख्यांनो हा वेडेपणा सोडा या बरं परत आपल्या ठिकाणी . दिल पुकारे आरे आरे… सुलगते साइनेसे धुवाॅं सा उठता है लो अब चले आओ के दम घुटता है….
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈