श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ दुभंगलेले पाणी… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

… ” तुला हजार वेळा बजावून देखील का येतेस या विहिरीवर पाणी भरण्यासाठी… या विहिरीवर फक्त गावातल्या उच्च जमातीच्या लोकांना पाणी भरण्याचा हक्क आहे… तुमच्या सारख्या कनिष्ठ जमातीला हिथं पाण्याचा थेंब देखील मिळणार नाही… आणि हे सांगुन देखील तू इथं रोजच सकाळ पासून उभी असतेस… तुझी सावली या विहिरीवर पडली तर त्यातले पाणी विटाळले गेले तर आम्हाला पाणी कसे बरे मिळेल… तुला इथचं उभी राहण्याची हौस जर असेल तर जरा या विहिरी पासून दूर उभी राहा कि जरा… आमच्या घरी कडक सोवळं ओवळं पाळलं जातं म्हटलं… गावाच्या कोसोदूर असलेल्या या विहिरीवरून पाणी न्यायची तंगडतोड करावी तेव्हा कुठे घरातले आम्हाला दोन वेळेचं खाऊ पिऊ घालतात घरात ठेवून घेतात…तुझ्या सारखं नाही.. सकाळीच तुला त्यांनी इथं पाण्यासाठी पिटाळली कि बसले ते दिवसभर चकाट्या पिटायला घराच्या ओट्यावर.. संध्याकाळ पर्यंत पाण्याचा एखादा माठ भरून घरी नेलास तरी तुझं किती कौतुक करत बसतात… आणि आमच्या घरी आम्हाला मात्र जरा उशीर होण्याचा अवकाश लाखोली वाहत असतात.. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो आम्हाला… जा जा दुसरीकडे कुठे विहीर शोध जा.. इथं बिलकुल थांबू नकोस.. “

… ” ताई आपल्या गावात हिच एक विहीर आहे हे तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे… तुमची उच्च जमातीच्या घरांपेक्षा आमची कनिष्ठ जमातीची घरं हाताच्या बोटावर मोजता येणारी.. या वैराण वाळवंटात  शेकडो मैल दूरवर गाव नि वस्ती आहेत.. तिथं देखील एखादं दुसऱ्या विहिरींना पाणी आहे.. आता आपल्या गावाची हिच विहीर गावकुसाबाहेर कोसांवर असल्यानं तुम्हाला पाणी नेण्यासाठी किती सायास करावे लागतात मगं आमची काय कथा… तुमचं सगळयांच भरून झालं  कि द्याल आम्हाला प्रत्येकाला निदान दोन दोन घागरी.. एक पिण्याला नि दुसरी स्वयंपाकाला… भागवून घेऊ आम्ही कसंतरी… पण तुम्ही नाही म्हणू नका.. पाणी देण्याचं पुण्य तेव्हढं तुम्हाला नक्कीच मिळेल… माणसांसारखी माणसचं आहोत आपण एकाच आकाराच्या देहाची, जन्माने उच्च निच्च माणसात भेदभाव जरी झाला तरी माणुसकी मात्र अभेद्य असते कि… तहान भूक जशी तुम्हाला तशीच ती आम्हालाही आहेच कि.. त्यांना कुठे असतो भेदभाव… तुमचे माठ मातीचे आणि आमचेही त्याच मातीपासून बनलेले.. प्रत्येक माठामाठात भरलेले पाणी  हे त्या विहिरीतलेच एकच आहे.. ते तुमच्या माठातले सोवळयाचे नि आमच्या ओवळयातले हा भेदभाव पाणी कुठं करते.. त्याला फक्त तहानलेल्याची तृष्णा भागविणे एव्हढेच ठाऊक असते… आपला स्त्री जन्मच मुळी अभागी आहे बघाना.. तुम्हाला तुमच्या घरी दासीचं जिणं जगावं लागतयं तेच आमच्या घरी सुद्धा चुकलेलं नाही.. या पुरुषसत्ताक परंपरेत स्त्रियांच्यावर अन्याय होत आलेत आणि आपण सगळ्या आपापल्या कोषात राहून मूकपणे सहन करत आहोत.. आपण आपापसातील दरी जर मिटवली नाही तर या अन्यायाचं परिमार्जन कसं करणारं… एक स्त्रीचं दुसऱ्या स्त्रीचं दुख समजू शकते.. कारण स्त्रीच्या हृदयात प्रेमाचा झरा अखंडपणे स्त्रवत असतो…माझी हि बडबड कदाचित तुम्हाला आवडणार नाही.. पण तो दिवस दूर नाही…स्त्रीचं समाजाचं नव्यानं परिवर्तन घडवून नक्की आणेल… पाण्यात काठी मारुन भेद होत नसतो… हेही लवकरच लक्षात आल्याशिवाय राहणार नाही… “

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments