श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ फुटबॉल विश्वचषक 2022… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
किलियन एम्बापे यास,
मानाचा मुजरा.तो अंतिम सामना विश्वचषक जेते पदासाठी तु आणि तुझ्या संघाकडून खेळला गेला त्याला तोड नाही.. प्रतिपक्षाच्या संघाकडून दोन गोल करून जे नैतिक दडपण आणले गेले , आणि हे ही तितकेच खरे आहे कि जो संघ असे गोल करतो तोच या सामन्याचा जेता दावेदार ठरतो हा इतिहास आहे, आणि हे ही तितकेच खरे आहे कि आजवरचे झालेले अंतीम सामने हे उभय पक्षात एकांगी झाले होते.. खरी लढत, त्या खेळातला तो शेवटच्या क्षणापर्यंतचा थरार फार क्वचितच अनुभवायला मिळाला होता. त्यावेळी बडे बडे दिग्गज नामांकित खेळाडूंचा कस लागणारी खेळीचं उत्कंठेचे समाधानही म्हणावं तसं लाभलं नाही.. अटीतटीच्या लढती झाल्या असतील पण आजच्या या लढतीचा अविस्मरणीय थरारची नोंद इतिहासात प्रथमच होईल.. दडपण आणि स्पर्धेतला खेळ यांचाच मिलाप कायम मैदानावर असतो त्यात अंतीम सामना आणि तोही विश्वचषकाचा असेल तर खेळाडू, तिथे जमलेले खेळाचे चाहते, जगभरातले चाहते इ्. इ. चें काळजाचे ठोके क्षणा क्षणाला वाढवत नेणारा तो माहोल असतो. असं सारं काही या अनुभवाची शिदोरी तुमच्या जवळ होती ती कालच्या खेळात अटीतटीच्या लढतीत दाखवून दिलीत.. कुठल्याही प्रकारची त्या खेळाची गोलाची आकडेवारीत, जी सर्वांना विदीत आहे, त्या तपशिलात न जाता, त्याचा थरार आणि थरारक खेळाचं कौतुक तुझं आणि तुझ्या संघाचं करावं तितकचं थोडं आहे.. जिंकणं हाच ध्यास तिथं दोन्ही बाजूला दिसत होता…मानवी प्रयत्नाला दैव देखिल साथ देते याची प्रचिती सुद्धा पदोपदी जाणवत होती.. नव्हे नव्हे ते दैव सुद्धा काही काळ स्वताला हरवून त्या खेळाचा थरार बघण्यात मश्गुल झाले असावे असेच वाटत होते.. इतका सुंदर तोडीसतोड खेळ, त्यातील पदलालित्य, गती, आवेग, शह, काटशाह, ऐनवेळेस बदल केलेली चाल, प्रतिचाल, गोलाचं लक्ष्य, ॲटक डिफेन्स, अश्या अगणित गोष्टींवर त्या वेगवान हालचालीत भानं ठेवून शांत डोक्यानं खेळायचं हे येरागबाळयाचं काम नाही..म्हणून तर अख्ख जगं या खेळानं खुळावले आहे..महासागराला देखिल मागे टाकले जाईल त्याहून कितीतरी प्रचंड चाहत्यांची संख्या हि जगभरात आहे आणि तिला ओहोटी हा शब्दच ठाऊक नाही.. इतकंच नाही तर राष्ट्रप्रमुख सुद्धा या खेळाचे चाहते, प्रेमी असावेत, आपल्या देशातील खेळाडूंचा खेळ पाहण्यास आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्यक्ष हजर असतात, हरलो तरी पाठीवर हात फिरवतात,उमेद देतात,हे पाहून देशभिभानाने उर भरून येतो.. मी देशाचा आहे आणि मी देशा करता खेळतो तेव्हा केवळ नि केवळ खेळावरच ध्यानकेंदीत झालेलं असतं.. अर्थात खेळ आहे तिथं हार जीत हि असायचीच, वेळेची मर्यादेची चौकट आणि जेता ठरवण्याचा निकषाचे पालन करुन विजेता हा ठरविला जातो..म्हणून काही जो जीता वही सिकंदर असा पूर्वापार प्रघात असला तरी हारणारा हा काही लेचापेचा नसतो.. हेच तुझ्या खेळातून तू दाखवून दिलेस.. भले त्या क्षणी तुझ्या मनात सामना हरल्याचं शल्य मनात टोचत असेल पण म्हणून तू दिलेली अखेर पर्यंतची लढत कमी मोलाची ठरत नाही.. सरतेशेवटी हा खेळ आहे.. एखादी खेळातील चुकचं सगळा खेळाचं पारडंचं बदलून टाकण्यास कारणीभूत होते. तो क्षण आपला नसतो..आपल्या हातात काहीही उरलेलं नसतं आणि शल्य मनात टोचत राहतं.. समजूती चे कोरडे सोपस्काराने मन शांत होत नाही, निवळत नाही.. अगदी खेळ संपल्यावर चाहत्यांकडून नि राष्ट्राध्यक्षांकडून सुद्धा मैदानावर येऊन पाठीवरून हात फिरवून सांगितले तरीही.. तुझा शांत आणि निराश चेहरा हेच दाखवत होता..
किलियन, मला या खेळातलं ओ कि ठो काही कळत नाही पण का कुणास ठाऊक तो गोल झालेला जेव्हा दिसतो तेव्हा मी पण आनंदाने टाळया वाजवतो.. फक्त विश्वचषकाचे सामने कधी कधी पाहतो.. आणि या खरा खेळयातील थराराचा अनुभव घेतो.. जे त्याच्या खेळाचं कौतुक होतचं होतं पण तितक्याच तोलामोलाच्या प्रतिस्पर्धीचं कौतुक मला करावसं वाटतं.. मला प्रत्यक्षात तुझ्या पाठीवर थाप दयायला आनंद वाटला असता पण ते अशक्य असल्याने या पत्राद्वारे ती थाप तुला पोहचवतं आहे…
.. सातत्यपूर्ण सराव, खेळा प्रती देशाभिमान, उंचावलेला आत्मविश्वास, नि सांघिक डेडीकशन या सर्व गुणात्मक गोष्टीनी परिपूर्ण असलेला खेळाडूच अशी देदीप्यमान कामगिरी करू शकतो हेच दोन्ही बाजूच्या संघानी जगाला दाखवून दिले आहे… एका रात्रीत चमकते सितारे जन्माला येणाऱ्या माझ्या देशाला तूम्ही आदर्श घालून दिला आहे.. आम्हाला पचनी कधी पडेल तो सुदिन कधी उगवतोय याची वाट पाहत आहे..कारण मी जिथं राहतो तिथं क्रिकेट आणि राजकारण हाच देशाचा प्रमुख सर्वव्यापी खेळ आहे.. आणि बाकी सारे त्यापुढे तुच्छ आहे.. हाच तुझ्यात आणि माझ्यातला मोठा फरक आहे.. असो.
यदाकदाचित मी फ्रान्सला आलो तर मी निश्चित तुझी भेट घेईन पण ते जरा अवघडच आहे.. पुढचा फुटबॉल विश्व चषकावर तुझंच नाव कोरलेलं बघायला मिळेल हि सदिच्छा करुन हे पत्र पूर्ण करतो..
तुझा एक चाहता
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470.
ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈