श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ प्रतिमेच्या पलिकडले : तू छूपी है कहाँ… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

.. आजच्या विज्ञानाच्या चमत्काराने जग इतके जवळ आलयं.. टाचणी पॅरीसला आयफेल टाॅवर वरून खाली पडली तर त्याचा आवाज इथं लालबाग परळ च्या तेजुकाया मॅन्शन च्या अकरा नंबरच्या खोलीत असलेल्या टि. व्ही. त ऐकू येतो.. आता तुम्हाला प्रश्न पडला असेलच हे असे कसे काय बुवा?.. अहो त्याचं काय आहे दिवसरात्र त्या अकरा नंबरच्या खोलीतला तो टि. व्ही चालूच असतो.. चौविस तास ढॅंण ढॅंण ढॅंण…तरूणाई करियर घडवायला आपल्या स्वप्नांची पूर्तता करायला जेष्ठांचा आर्शिवाद घेऊन घर सोडून गेलेली असते.. त्यांचीच छोट्या छोट्या प्रतिमा युवावस्थेत करिअर कोणतं नि कसं घडवावे याचा शोध घेण्यासाठी दिवसाचे चोविस तासापेक्षा जास्त वेळ घराबाहेरच असते, केअर टेकर जेष्ठांना लोणकढी थापा वर थापा मारून.. मग घरात जागं राहते त्या जेष्ठांची एकल तर कधी असलीच तर दुकल..कर्तव्याची इतिकर्तव्यता झालेली असते.. भविष्याकडे धुसर नजरेने पाहत भूतकाळातील कडू गोड आठवणींचा रिटेलिकास्ट मनाच्या पडद्यावर बघत बसणे हाच एकमेव उदयोग वर्तमानकाळात करत बसतात.. ना बोलायला कुणी घरी ,ना चालायला कुणी दारी.. अवतीभवतीची समवयस्क बऱ्यापैकी विकेट टाकून गेलेली .नाही तर गावाला पळालेली, एखादं दुसरे असलं तरी आजारालाच दत्तक घेऊन एक कॉट अडवून बसलेली.. मग अश्या परिस्थितीत हातपाय हलते नि तोंड व्यवस्थित चालते, थोडक्यात सर्व ठिकठाक, असणारे या जेष्ठांना घरात वाली कोण असणार.?.तरुणाईच्या पैश्याच्या पावसाने घराचे नंदनवन फुलते .. सगळ्या बाजारातल्या आधुनिक उपकरणांनी जागा जागा व्यापून गेलेली असते..घंटो का काम चुटकीमें . कामाचा डोंगर निपटणारे. पण तेच त्या तरुणाईच्या मनाच्या कोपऱ्यात एक इंचभर जागा त्यांना मिळू नये..साधी प्रेमाने केलेली विचारपूस किती मनाला आधार देऊन जाते… मनाला हवी असलेली प्रेमाची ऊब,नि आपुलकीची भुक मात्र हे नंदनवन भागवू शकत नाही..असंख्य चॅनेल्स ने खचाखच भरलेला तो टि. व्ही. आणि त्या सारखी उपकरणं, रंगीबेरंगी विविध शंख शिंपल्यासारखे ,समुद्ररूपी कार्यक्रमांच्या लाटावर लाटा आदळत असतात.. तो अखंड बडबडत नि दाखवत सुटतो.. पण कान बहिरे असल्याने ऐकून मात्र घेत नाही.. आणि जेष्ठांना तो जे जे दाखवेल ,ऐकवेल ते ते बघण्या शिवाय पर्याय नाही..त्या समोर बसून चार उलटे नि सहा सुलटे टाके घालून वुलनचा स्वेटर विणायला घेतला तर तो कधी पुरा होणार नसतो..कारण त्याच्या उबेचीच गरज नसतेच मुळी पण वेळ घालवायचा तो एक चाळा असतो त्यांचा..रिमोट हाती असून चालत नाही ना.. टि. व्ही. काही काळ बंद झाला तर.. अख्खी चाळ गोळा होईल ना !अरे अकरा नंबरचा आवाज बंद झाला!.. म्हणजे काही तरी गडबड झाली आहे..त्याने होणारी सतत दाराची उघडझाप आणि त्यांच्या प्रश्नांला उत्तरे देण्याची दमछाक.. इतकचं काय आपली म्हणणारी नातीगोती आपल्यालावरच रागवणार, का देताय आम्हाला उगीच मनस्ताप?. आहे कुठे सगळ्याला दयायला उत्तर आपल्याकडे!.. नाही नाही आता उत्तरचं नसतात त्यांच्या कडे.. असतो फक्त एकच प्रश्न सतत मनात घोळत.. अरे देवा! मला तू येथून कधी…. ? तू छूपी है कहाॅ म्हणत… 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments