श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ आयुष्याचं झाडं… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

या आयुष्याच्या झाडाला बालपणीची पहिली डहाळी सर्वात उंच उंच असते .माय पित्याच्या मायेच्या ढोलीत सख्या सोबत्यांच्या संगतीत किलबिल किलबिल गुजगोष्टीने, प्रत्येकाला रंगीबेरंगी फुलाप्रमाणे स्वप्नं पाहात, पंखातले बळ अजमावत गगनाला गवसणी घालण्याची इच्छा मनात येते. वेळ येते तेव्हा काहींचे मनसुबे पूर्ण होतात तर काहींचे मृगजळाचे रूप घेऊन हुलकावणी देत राहतात.. देव भेटत नाही आणि आशा सुटत नाही याचा प्रत्यय ठायी ठायी येतो. दमछाक होते. नाद सोडून दिला जातो.. आता एकटेपणाचा उबग येतो नि जीवन साथीची गरज भासते.. शांत, सरळ, एकमार्गी धोपट जीवन जगावेसे वाटणे स्वाभाविक असते.. ती आयुष्यातली गोड गुलाबी सल्लज कुजबूज, हितगुज आपल्या प्रियतमांच्या कानात सांगाविशी वाटते. मानवी जीवनातला हा सर्वात सुंदर सुवर्णकाळ असतो.. स्वप्नांच्या पूर्ततेचा हा टप्पा असतो..या संसाराच्या फांद्यावर आता आपलचं स्वतंत्र घरटं असतं.. आणि बालपणीचे सखेसोबतीत अंतर दुरावलेलं असतं.. इथं संबंध झाड हिरवेगार तजेलदार, पानाफुलाने नि फळांनी बहरून आलेलं असतं. मग हळूहळू तो बहर ओसरू लागतो, पानं पिवळी पडत जीर्ण शीर्ण होऊन गळू पाहतात, फुलं कोमेजू लागतात, फळ झाडापासून तुटून खाली पडू पाहतात… ही वार्धक्याची डहाळी झाडाच्या बुंध्याला येऊन टेकलेली असते.. बरेच उन्हाळे पावसाळे झेलून झालेले असल्याने आता कशाचीच असोशी उरलेली नसते.. अगदी जीवन साथीची जवळिकतेची सुद्धा.. केवळ अस्तित्वाने जवळ असणं पुरेसे वाटतं. संवादाला नाहीतरी विवादाला तरी सोबत असावी असचं वाटू लागतं ,मनाप्रमाणे शारिरीक अंतर पडू पाहतं..मावळतीचे काळे करडे राखाडी रंग तनामनावर उमटले जातात.. बालपणीचा किलबिलाट, तरूपणीची गुंजन हवेत कधीच विरून गेलेली असते, आणि आता वृद्धपणी ची कलकल हुंकारत असते.. गुणापेक्षा अवगुणाची एकमेंकाची उजळणी करत करत, एक दिवस विलयाचा येतो नि जगलेल्या जीवनातील आठवणींचा सुंगध मागे दरवळत राहतो.. अशी पाखरे येती नि स्मृती ठेवूनी जाती हेच खरे असते नव्हे काय? 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments