डॉ.सोनिया कस्तुरे
प्रतिमेच्या पलिकडले
☆ किनारा… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆
आनंदाचे बेट शोधता शोधता
सगाराची गाज अंतरात उतरली की,
मनातल्या लाटा बोलू लागतात.
अथांगतेच्या खोलीत खूप काही असतं
साठवून, दडवून ठेवलेलं
लाटेनं किनाऱ्याकडे कैकदा फेकलं तरी..
परतीच्या प्रवासात आपसूक आत सामावतं.
त्यात भरती ओहोटीची कथा औरच !
आतला समुद्र कितीही आपला तरी
तृष्णा शमवण्यास असमर्थ ठरतो.
आभाळ संभ्रमून जातं.
मन कोसळतं, तुडूंब साठलं की,
मनात पाऊस कोसळू लागतो.
पालापाचोळा थिजतो.
असह्यतेने नयनातून पाझरतो.
काळ्याकुट्ट ढगांना मोकळ करु पाहतो
मग रोजच मनात पाऊस पडू लागतो.
खिडकीतून बाहेर ओलाचिंब होतो
कितीही उंच जा पाऊस बरसत राहतो.
आधे-मधे रात्री-अपरात्री
अगदी कधीही कोणत्याही वयात
वयाच भान हरपून पाऊस पडतच राहतो.
क्वचित खिदळतो, थुईथुई नाचतो
मोहरुन जातो विस्मयकारी वाटतो
ऊन-सावलीत पाऊस पडतच राहतो.
आत कोसळणारा पाऊस अमाप सोबत केला तरी
तहानेने कधी कधी आपण व्याकूळच राहतो.
किनाऱ्यावर, रेतीत, समुद्रात नदीत…
कुठे कुठे आणि किती किती सांगायचं..!
तो बरसतच राहतो.
समुद्र, पाऊस दोघेही आपल्यात सामावलेले
ना समुद्राच्या आधीन ना
पावसाच्या स्वाधीन होता येते
मनाच्या सागरात पाऊस बरसत राहतो.
कधी बोलका, तर कधी अबोल पावसा सोबत,
आतल्या समुद्राशी बोलत बोलत..,
किनाऱ्यावर आपण स्वतःला शोधत राहतो..!
निगुतीनं चालत राहतो अविरत..!!
© डॉ.सोनिया कस्तुरे
विश्रामबाग, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 9326818354
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈