श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ अस्तासी गेला चंद्र काचेचा… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

… ‘थांब थांब!… असा करू नकोस अविचार… अधीर मनात उलट सुलट विचारांचे माजलेले तांडव घेऊन,.. मोडल्या शपथा, भाका, आणांचे पोकळ शाब्दिक वासे हाती धरून… ओल्या वाळूवरची कोरलेली आपली जन्माक्षरे पुसली जाताना बघून… आपणच बांधलेल्या किल्लाला ध्वस्त झालेला पाहून… चिडून दाणदाण पाय आपटत याचा अर्थ काय?,असा जाब त्या चंद्राला विचारायला निघालीस!… का तो आता हाताच्या अंतरावर आला आहे म्हणून?…तुझ्या प्रीतीचा एकमेव साक्षीदार होता म्हणून!.. त्यालाच विचारणार अशी का  प्रीती दुभंगली जी अक्षर आणि अमर अशी महती असताना तिची! . मग माझ्या वाटय़ाला हे आलचं कसं.?.. माझं ऐकतेस का थोडं!.. शांत हो शांत हो!..बेचैन मन स्थिर कर… अवघड असतं सुरूवातीला पण प्रयत्न केलास तर सवयीने हळूहळू स्थिरावतयं … मग कर आपुलाच संवादु आपुल्याच मनाशी..तुझ्या एकेक प्रश्नांची भेट घडेल तुझ्याच मनात दडलेल्या उत्तराशी… अविवेकाने करून घेतला असतास सर्वनाश जीवनाचा.. समोर दिसतयं ते क्षितिज त्याला तरी कुठं ठाऊक आहे का पत्ता अंताचा!.. तू जितके चालत निघालीस तसा तसा पावला पावलाने मागे मागे  सरकत निघालेय.. गवसले का ते कधी तुला!.. मनाच्या संभ्रमावस्था तुला कधीच नव्हत्या त्या कळणाऱ्या ,पण नाहक जन्मभर होत्या छळणाऱ्या…गोडगुलाबी रंगाची उधळण भिडली आकाशात.. निळया स्वप्नांचे पक्षी पंख पसरून बसलेत गगनात.. किरमीजी छटेचा काळोख नैराश्याची झालर लावतोय आकाशी मंडपात… अर्थाचे बुडबुडे तरंगले  भ्रामक शब्दांच्या वायूतून… विराणीचे उसासे  झंकारले तुटल्या तारातून…अन तो उदास चंद्र बापुडा पाहतो तुज कडे मान वाकडी करुन… ‘

‘अगं वेडे तो तुला सांगतोय…कालपर्यंत मी सगळ्यांच्या गुजगोष्टी बघता बघता साठवत गेलो.. रुपेरी,चंदेरी लखलखत्या कोंदणी…माझ्या कडून कोणी हिरावून घेणार नाही हा दिला होता विश्र्वास.. कारण मी तेव्हा खूप खुप दूर होतो.. पण काल चांद्रयान ते मजवर उतरले आणि मधले अंतरच नाही उरले गं…  वाटेवरच्या  बागेत जावे तसे आता येथेही वर्दळ वाढली ,अन जो तो  उदर माझे फोडू लागला कुतूहलापोटी.. गुपितं लपविण्याचा खटाटोप  व्यर्थ ठरला..माझा चंद्राचा बाजारभावच घसरला… म्हणून  आलो सांगायला.. सख्यांनो आता मला वगळा नि तुम्ही दुसरा चंद्र शोधा.. झालंगेल़ विसरून जाऊया तोच चंद्रमा नभीचा हवा  हट्ट सोडून द्या…तो एक दूर दूर  काचेचा चंद्र होता, हाती येता खळकन फुटूनी गेला… अस्तासी गेला चंद्र काचेचा… ‘

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments