श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ गो माय ऽऽ… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

 “आई आज असं अचानक तुला मला प्रेमानं जवळ घेऊन थोपटत का आहेत सगळे?… ते ओवळणं, हिरवा चारा खाऊ घालणं, अंगावर भरजरी शाल टाकणं!.. अगदी आपण देव असल्यासारखे पुजन का करताहेत?… नमस्कार तर कितीजण करताहेत… आज कुठला विषेश दिवस आहे वाटतं… आज अचानक आपल्या बद्दल त्यांना प्रेमाचा पान्हा फुटावा!.. सांग ना गं आई!.. “

“.. वासरा त्यांच्या या प्रेमाच्या दिखाव्याला भुलू नको बरं… अरे वर्षानुवर्ष चालत आलेली ती वसुबारसाची परंपरा  चालवताहेत झालं.. त्यांची दिवाळी सुरु होतेय ना आजपासून म्हणुन पहिला मान गोधनला देतात… आपणं भरपूर दुधदुभतं कायम देत राहावं असा मतलबी डाव असतो त्यांचा… वासरा पूर्वीचे आपले वंशज  प्रत्येक घराघरात गोठ्यात राहतं होते.. मोठ्या संख्येने.. मोठ्या घरात अविभक्त कुटुबाचा काबिला तसं गोठ्यात पण मोठ्ठ कुटुंब गाई, म्हशी, बैल, शेळ्या, कोंबड्या एकत्रित राहत होतो.. देखरेखीला चौविसतास माणसं असायची.. खाण्यापिण्याची तरतूद भरपूर, रानावनात भटकणे भरपूर, नदी तळ्यात मनसोक्त डुंबणं सारं सारं काही पाहिलं जात असे… मग ईतकी काळजी घेतल्याने आपणही संतत कासंड्या भरभरून फेसाळते दूध देत गेलो… वयोमानानुसार ज्यांची कास सुकत गेली, गाभण राहता येईना, दूध आटत गेले त्या भाकड गाईनां रेडा महणून पोसले गेले होते.. पण त्यांना कधीच गोठ्याबाहेर काढले गेले नाही.. दैववशात पंचत्त्व पावलेलीच घराचा गोठा कायमचा सोडून जात असे… अंगी धष्टपुष्टपणा आणि तजेलदारपणा असल्याने घरातली गोठ्यातले गोधनाची वाढती संख्या श्रीमंतीचं मापदंड ठरला जात असे… कडबा, वैरण, पेंड याने गोठ्यतला एक कोपरा कायम भरलेला असे… पाऊस भरपूर असल्याने कोरडा दुष्काळ कधी दिसलाच नाही… झाडं, डोंगर, कधी  छाटले नव्हते… आपल्यात देवत्त्वाचा अंश असल्याची त्यांची पुज्य भावना होती तेव्हा… पण पण हळूहळू  माणसांच्या प्रवृत्तीत बदल होत गेला.. आधुनिकतेचे वारे वाहू लागले.. गावात सुधारणेचा सोसट्याचे वादळ घुमले.. शिक्षणाचे फायदे दिसू लागले अन जुने संस्कार काटे होउन टोचू लागले.. भावकीत दरी पडली नि घरं दुभंगून मोडली.. शेताचा भार एकीकडे नि दुधाचा बाजार दुसरीकडे.. विभक्त कुटुंबाची घरचं टाचकी मग गोठ्यावर का न यावी टाच ती… हळूहळू एकेक गाई गुरं जनावरांच्या बाजारात गेली… दुधाच्या मिळकती पेक्षा वैरणीचा खर्च परवडेना, , माणसाच्या हातातलं घड्याळ देखभालीची वेळच दावेना.. काही गणित जुळेना म्हणून गाई गुरांना  ठेवले पांजरपोळच्या आश्रयाला.. तर काही हडखलेली, उताराला लागलेली कसायाने लाटली… शेण गोमुत्र सुद्धा आटले तिथे दुधाची काय कथा… मग आपल्याला पोसणार कोण?… कशाला बांधुन घेईल गळ्यात आपल्या फुकाची धोंड!… वासरा ! अरे हे माणसांचं जगचं मतलबी… इथे खायला कार नि भुईला भार होणारी त्यांना जड होतात ;अगदी वृद्ध असाह्य जन्मदात्या  माता पिता सुद्धा.. त्यांना देखिल त्या वयात वृद्धाश्रमाला पाठवतात तर तिथं तुमची आमची काय कथा… वर्षभर सांभाळताना, दुधाचा गल्ला वाढता राहताना, आखुडशिंगी, चारा कमी खाणारी नि शेणा गोमुत्राचा कमीत कमी उपद्रव देणारी गाई गुरं असतील तोवर आपला प्रतिपाळ करत राहणं फायद्याचं असतं.. यातलं एक जरी मागं हटलं कि लगेच त्याचं आपलं नातचं तुटलं… जोवरी हाती पैका तोवरी इथं बुड टैका हा जसा माणसाने माणसाला न्याय लावलेला असतो अगदी तसाच न्याय आपल्याला असतो… मग एक दिवस करतात आपली साग्रसंगीत  पुजा… वासरा आपल्यासाठी म्हणून ती काही पूजा नसतेच मुळी ती असते त्यांच्यासाठी… एक आदराची प्रेममय  कृतज्ञतेची दृष्टी असली आपल्यावर तरीही पुरेशी असते रे… कितीही झालं तरी ते माय लेकराचं नातं असते ते.. माय आपल्या लेकरावर माया लावणारी चिरतंन  असणारी.. मग ती माय कालची असो वा  आजची किंवा उद्याची असणारी… तिला कसही असलं तरी आपलं लेकरू कधी जड होत नसतं… पण हे लेकराला  कधीच कळत नसतं..

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments