सौ. प्रांजली लाळे
प्रतिमेच्या पलिकडले
☆ घर… ☆ सौ. प्रांजली लाळे ☆
रस्त्यावरुन जाताना एखादे बंद घर दिसलं की बऱ्याचदा माझ्या मनात रेंगाळणारा भावनिक प्रश्न..हे घर कोणाचे असेल..कोण रहात असेल ह्या घरात या आधी.. आता ते बंद का आहे..काय कारण असेल बंद राहण्याचे?बरेचदा उत्तर मिळतच नाही खरं तर..पुर्वी गल्लीतील एखादे जरी घर रिकामे राहिले तर भुताखेतांच्या गोष्टी रंगायच्या.. कोणी फिरकायचे नाही.. आता दिवसागणिक बंगलेच्या बंगले रिकामे पडलेत..आजुबाजुला गवतं,झाडेझुडपे वाढलेले..असे बंगले,घरं दिसली की मन सुन्न होते..घराचे सौंदर्य काय असते हो..ज्या घरात माणसं असतात तीच घराची शोभा.. नाही तर नुसत्या भिंती काय कामाच्या !!अर्थात त्या भिंतीही बोलक्या असतील जेव्हा त्या घरातील माणसं तिथे रहात असतील..माणूस घर बांधताना स्वप्न पुर्तीचे किती मनोरे चढत असेल नाही.. शुन्यातून निर्माण केलेले क्षण घट्ट मुठीत ठेवत असेल बांधून..परंतु येणारा प्रत्येक क्षण त्याचाच असतो असे नाही ना..
कोरोनाने बरीच कुटुंब बरबाद केलीत..क्षणात घरं रिकामी झाली.. होत्याचे नव्हते झाले.. काहींची मुलं बाहेर परदेशात.. त्यामुळे आईबापही तिकडे नाही तर इहलोकी !! ह्या घरांची गरज नसते त्या मुलांना.. पैसा वारेमाप.. एखाद्या बिल्डरला ती भावनिक गुंतवणूक न ठेवता विकायची न् मोकळं व्हायचं..जो घर बांधतो.. तो ते सर्व इथंच सोडून जातो.. चार भिंतींबरोबर आपली आठवण कायमची तिथं ठेवून जातो..
© सुश्री प्रांजली लाळे
मो न. ९७६२६२९७३१
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈