श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “वन्ही तापला तापला…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
पूरे करं बाबा आता तुझं असं आग ओकत राहणं… नाही रे नाही होतं आम्हाला हा ताप सहन करणं… त्या तुझ्या कडकडीत उन्हाच्या झळीने सावल्या देखिल करपून गेल्या… हिरव्या लता झाडाझुडांच्या फांद्या फांद्या भेगाळल्या.. नदी नाले ओढे बावी तळी विहिरी कोरडी कोरडी ठाक कि रे झाली… पाण्याच्या एका थेंबासाठी आसुसली भुमी नि माणसं राहिली तहानलेली… भेगाळलेल्या शेतामध्ये फुले निवडूंगाचा लाल बोंड… खायला चारा नसे पाणी नसे पिण्याला सुकून गेली सारी सारी तोंड… अविचाराने करत आलो निर्सगाचा र्हास तो आम्ही… त्याचीच फळे भोगतोय कि रे जन्मोजन्मी… हालेना झाडाचे ते पान वारा देखील रागावला.. जणू होळीचा तो वणवा वणवा गावातून नाही अजूनही शमला… निळ्या आभाळाच्या छताला भास्कर तो सदा तळपला… साऱ्या सृष्टीचा जीव तो व्याकुळला…
… जरा थांब तू घेशील सबुरीने.. देतो तुला वचन गळाशपथेने.. करीन सांभाळ वसुंधरेचा लाविन एकेक झाड..निश्चिय करतो हिरवाई आणायचा…विचाराला देईन कृतीची जोड.. तुझे रूप तुला मुळचे आणीन पुन्हा तू चिंता सोड… पण पण तू आता आवरते घे रे तापण्याला…अंगी अवसान गळपटले ते शिक्षा भोगण्याला… तू आमची मायबाप मग चुकले माकले लेकरू तुझे त्याला तू क्षमा नाही करणार तो कोण करणार सांग बरे आम्हाला…
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈