श्री नंदकुमार पंडित वडेर
विविधा
☆ सहा जून : शांताबाई शेळके स्मृतीदिनानिमित्त – “आठवणीतील कविता…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
आज शांताबाई शेळके यांची वर्षा काव्यसंंग्रहातील हिरवळ ही कविता पाहणार आहोत… सात जूनला मृगाचं नक्षत्र लागलं … खऱ्या अर्थाने पाउस सुरू होतो असा पारंपारिक प्रघात आहे… कधी तो वेळेत उगवतो तर कधी उशीराने…
दडी मारुन जरी बसला तरी त्याच्या आगमनाची आतुरताही तितकीच असते… माणसाला,धरीत्रीला,साऱ्या सृष्टीला… आणि तो जेव्हा कधी पहिल्यांदा बरसून जातो… तेव्हा सगळं चराचर पुलकित होतं… तना मनाची तलखी शांत होते… जमीनीवर वरचा धारोळा धुतला जातो… जणू काही वसुंधरा पावसात सुस्नात न्हाऊन निघते… आनंदाच्या लहरी पसरवत जाते… हळूहळू ते पावसाचं पाणी जमिनीत मुरू लागतं … तृप्त जमीनीवर हिरवे हिरवे गवताचे कोंब उगवतात… वसुंधराचा आनंद ती गवताची पाती दवबिंदूत भिजून प्रगट करतात… आनंदाने न्हाऊन निघतात…हि कविता हेच सांगतेय…
☆ हिरवळ ☆
वर्षांची पहिली पर्जन्याची धारा
न्हाणुनिया गेली भूमिभाग सारा
लागली खुलाया अन् आताचं तिजवरती
या तृणांकुरांची हिरवी,कवळी नवती
*
किती उल्लासानें डोलतात हीन पाती
इवलाली सुन्दर फुलें मधूनी खुलती
चिमुकली फूलपांखरें डुलती मौजेनें
पाहुनी चित्त मम भरून ये हर्षानें
*
जणुं गालिचेच हे अंथरले भूवरतीं
जडविले जयांवर दंवबिंदूंचे मोती
या शाब्दलांगणी वाटे लोळण घ्यावी
अन् सस्यशामल भूमी ही चुंबावी.
*
चैतन्य किती या उसळे तृणपर्णात!
किति जीवनरस राहिला भरोनी यांत!
जो झटे येवढा तृणासही सुखवाया
किती अगाध त्याच्या असेल हृदयीं माया!
– शांता शेळके…
ती पहिली पावसाची सर भूमीला आलिंगन देते तेव्हा पहिला पाऊस शोषून घेते… कोवळी कोवळी गवताची तृणांकुरे जमीनीवर गालीच्या सारखी पसरतात… त्यातच काही गवती फुलं नाजूकपणे उमलतात… त्याच्या वर छोटी छोटी फुलपाखरं बागडतात… किती मनमोहक नजारा दिसतो तो…हि उगवलेली छोटी छोटी कोवळी गवताची तृणांकुरे किती रसरसलेली आणि टवटवीत दिसतात … साऱ्या सृष्टीला उल्हसित करतात….
…. सृष्टीचे चक्र माणसाला कळावे… दुखाचा उन्हाळा संपला की सुखाच्या पावसाची सर येतच येते… किती आनंदाने न्हाऊन निघाल, तो तुम्हाला जीवनामध्ये उल्हास वाढवेल… आता तृणांकुराचा आकार तो किती नगण्य पण त्याला दिलेला तो आनंद कितीतरी मोठा असतो… हि पाउसाची एक सर देउन जाते तेव्हा तिचं विशाल मायेचं हृदय दिसतं….. श्रीमंताने गरीबांना आणि उच्चवर्णीयांनी कनिष्ठ वर्णी यांना असे मायेने ममतेने पाहिले ..सांभाळले तर ते ते देखिल महतपदाला निश्चितच पोहचतील…
… हिरवळ हे आनंदाचं रूपक आहे… पाऊस हे साधन आहे… तृणांकुर छोटी गरीब दयनीय माणसं.. त्यांचा आनंद तो छोट्या छोट्या गोष्टीत असतो… तो जर त्यांना मिळाला तर जगणंच आनंदाचं होईल असं या कवितेचं सार आहे असं मला वाटतं…अशी हिरवळ प्रत्येकाला हवी असते आणि ती मिळण्याची धडपड चाललेली असते…
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈