श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “पप्पू पास झाला…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
…” अगं रखमे का गं असं कसनुसं त्वांड घेऊन बसलीयास!… कसला एव्हढा पेच पडलाय तुला? … परवाच्या दहावीच्या परिक्षेत तुझा पप्पू पास झाला न्हवं!… आखरीला त्येचं घोडं गंगेत न्हायलं कि!… तू त्यो पास व्हावा म्हनुनशान दर वरसाला कसलं कसलं उपास तपास करत व्हतीस.. हायं ठावं मला!…पप्पू आता लै मोठा झाला… मिळलं कि तालुक्याला त्येला एखादी नोकरी बिकरी!… मगं धाडलं कि पगाराचं पैसं तुला!… सुटका व्हईल बघ तुझी या काबाडकष्टातनं!… खाशील चार घास बघशील सुखाचं चार दिस… अगं आता हातातोंडाशी आलेला घास असताना तू हसत खेळत राहायचं सोडून बैजार का गं?… माझंच बघ कि समंध तुला ठावं हाय न्हवं… दोन पोरं पोटाला असून बघ कशी बेवारसा परमानं जगणं जिती… जाईल तिकडं त्येंना मुलूख थोडा हायच म्हनायचा..आनि मागचा दोर त्येंनी कापून कवाच टाकला… सोताचा संसार घरदार केल्लं नि मला म्हातारीला ,आपल्या घरला, गावाला इसरून गेलं… देवाची किरपा म्हनून डुईला छप्पार न भाताची पेज करून खायला चार दाणं भातं पिकवणारी जमिन हायं म्हनून तरले बघ… चार कायबाय बोला चालायला तुझ्यासारखी मैतरनी हायती तवा रोजचा दिस सरतो एकल्याला.. न्हाई तर काय बी खरं न्हवतं… परं रखमे तुझं तर लै बेस हाय कि… तरी बी काळजीनं काळी ठिक्कर पडलीयास कि… काय झालं, घडलं ते तर सांगशिल का न्हाई?”…
.”.. काय बोलायचं गोदाक्का!… संसाराचा खेळखंडोबाच लिवलाय माझ्या नशिबात!… त्यो ह्या जल्मात संपतोय का न्हाई कुनास ठावं.?.. सावकाराकडं चाकरीला धनी व्हतं पाच सा वरसा मागं त्येंना त्या सावकाराच्या खुनाच्या भानगडीत जे पकडून नेलया ते तिकडं जेलात… अजून कोर्ट कचेरीत खरा खोट्याचा निवाडा होतोय जनू.. किती दिसं, महिनं का वरिस जातील याला मोजदाद कुठवर करायची?… वकिलाला पैका द्यायला धडुत्यात तो असायला हवा कि!… शेतावर भांगलयाला जातं व्हते त्यावर पोराचं नि माझं प्वाटं तरी भरत व्हतं!… सरपंच देव मानूस बघं त्येनं पोराची शाळंची काळजी घेतली… तवा कुठं दहावी पतुर प्वारं शिकलं बघं.. न्हाई म्हनायला चार पाच येळेला गटांगळ्या खाल्या त्यानं बी.. पन तड गाठली… तुला हे काय म्या नव्यानं सांगायला हवं.!.. तुझ्या समोरच सगळं घडत बिघडतं गेललं दिसतं व्हतंच कि!… त्ये येळेला तू माझी जिवाभावाची भनीवानी आधार देत व्हतीस कि!…पन तुला यातली आतली गोम काय व्हती ती ठावं नसंल.?.. अगं शाळंपायी माझा पप्पू त्या सरपंचांच्या घराकडंच दिसरात गुरावानी दावणीला बांधल्यावानी तिकडचं कि गं!… मीच त्येला जाता येता हाळी मारून बोलयाची… पप्पू बोलायचा ,’आये तू माझी काय बी काळजी करू नगंस.. मी हथं बेस हाय बघ… सरपंच मला म्ह़नातात दहावी झाल्यावर तालूक्याला बाजार समिती वर नोकरीला लावतो म्हनून.. तवर इथली चार पडत्त्याल ती कामं करत जा… ‘चांगलं दिसं येनार ह्या आशेवर पप्पू नि मी राहिलो बघं… पन ते चार दिस आमच्या पतूर कधीच आलं न्हाईत… अन पप्पू मातर ते दिस येतील या खुळ्या आशेवर बसला नि राबराबत राहिला… संतरंज्या घालन्या काढन्यापासून, घरातली संबंध काम उरकन्यापर्यंत, विलेक्शन च्या मोर्चात, सभंत, लोकांना पैसं, धोतार, लुगडी वाटन्या पतूर.. पोस्टार लावणं म्हनू नको, ते घरघरात जाऊन सरपंचालाच मत द्या असा परचारचं म्हनू नको….. लोकांना मतदानादिवशी घेऊन आणयाला… आनि कशा कशाला पप्पू धावत व्हताचं… त्येला बी आपलं सरपंच निवडून यावं असं लै वाटतं हुतं… अगदी इमानदारीनं खपत हुता…त्या टायमाला एक दिस बी घराकडं त्यो आला न्हाई कि कवा माझ्या नदरंला पडाया न्हाई… सरपंचा च्या घरला इचारलं तर ‘त्ये बेनं असलं इकडं तिकडं बोंबलत गावातनं.. ‘असं काहीबाही वंगाळ सांगायचे… मला लै भ्या वाटायचं.. पप्पू ची लै काळजी वाटत हूती.. एक दोन बाऱ्या त्येच्या दोस्तांच्या कडं त्येची इचारपूस बी केली.. पन त्येंनी बी’ काय कि पप्पू ला दोन दिसा माघारापासून बघितालाच न्हाई असं जरा दबकतच बोलले… तोच कोन तरी मधीच त्वांड उघडलाच.. सरकारी हॉस्पिटलात पडलाय तो… कवाधरनं.’.. माझ्या पायाबुडीची वाळूच सरकली नव्हं… म्या तडक हॉस्पिटल गाठलं.. त्येच्या वारड बाहीर पोलीस उभा व्हता… मला त्यांनी आत सोडायची परमिशन न्हाई म्हनून अडवून धरलं.. म्या रडत भेकतं त्या पोलीसाचं पाय धरलं म्हनलं एक डाव नदरनं त्येला माझ्या लेकराला कसा हाय ते बघू द्या.. मगं मी हथनं हालन.. डोळ्याचं पानी खळंना आणि हृदयाचं पानी पानी झालेलं… काय झालं ?कशानं झालं ?कुणा मुळं ?कशा कशाचा पत्तया लागंना… सरपंचाची माणसं सारखी येत जात व्हती… त्या फौजदारी संगट हसत खिदळत बोलत असताना मला कळालं… सरपंच निवडणुकीत हरला व्हता… त्येचा राग धरून सरपंचाची पोरं जितलेल्ल्या पुढाऱ्यांच्या माणसांना लाठ्या काठ्या, सुरे तलवारी घेऊन मारायला धावले.. त्यांच्या बरोबर पप्पू पण व्हता.. बरीच हाणामारी, डोकी फुटली, हातपाय तोडले…पप्पूच्या डोक्याला जबराट लागलं… कुणीतरी उचलून त्येला हास्पिटलात टाकला.. सरपंच येऊन फौजदाराला सांगून गेला…’ हि दंगा करणारी माझी माणसं न्हाईत.. कुणीतरी भाडेकरू गुंड आणलेले दिसतात… तुम्ही यांना खुशाल जेलात टाका.. पन माझं नावं मातर कुठचं आणायचं न्हाई… आनि यांच्या घराकडं पन कळवू नका… उगाच माझ्या डोसक्याला न्हाई तो ताप व्हईल… तेपरीस इथचं पडनात का.’.. . एव्हढं त्या पोलीसांनी सांगितलं.. म्या पप्पूला आत जाऊन बघितलं तर त्येच्या डोक्याला प्लॅसटर.. हातपाय बांधलेलै.. नाकाला नळकाडं… बघितलं.. तिथली ती सिस्टर म्हनाली लै सिरियस केस हाय… कधी काय व्हईल काय नेम न्हाई… तवा… म्या तशीच बाहीर येऊन शान डोकं धरून बसून राहिलं… देवाला नवस करत… कोन येनार हायं माझ्या मदतीला अश्या वकताला… दिसरात ततचं काढले… पन अजून काई फरक दिसना..फौजदार मला महनले पोलीस केस झालीया… पप्पूला गुन्हेगार शाबूत केलयं.. जिता राहयला तर जेलात ठिवनार अन त्या आदुगर गेलाच तर केस बंद करून टाकनार…गोदाक्का माझ्या पप्पूनं आपुनच ती केसच आताच बंद करून टाकली… घराकडं निघाले तर वाटत तू भेटलीस…गोदाक्का माझा पप्पू इतकं दिसं नापास होत व्हता आनि नेमका यावेळेला तो पास झाला तवा…
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈