श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “थरथरला धरणीधर…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“नारायण! नारायण!… देवा खाली मर्त्य लोकात मानवांची गर्दी…जत्रा भरली जत्रा पाहिलीत का.!..  नजरं ठरतं नाही तिथवरं पसरलेली!…त्यांचा कुणी क्रिकेट नामक क्रिडेतला विजयी  शर्मणे नामविधान रोहीत, विराट सूर्य,ऋषभदेव , समुह तिथे अवतरणार आहे म्हणे त्या सगळया भक्त गणांना दर्शन देण्यासाठी!… कसलासा द्वि संवत्सराचा  विश्वाचा  रौप्य चषकाची विजयी श्री मिळवून आणली आहे त्यांनी त्याचा हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी जमलेत सगळे!…अबब काय तो अलोट जनसागर!… त्यांच्या जयजयकाराच्या आरोळ्यांच्या ध्वनी कंपनाने येरु गडगडून  खाली कोसळला.त्यांची प्रचंड उर्जा नि शक्ती बघून  क्षीरसागर पण भयभीत होऊन आक्रसून मागे मागे हटला.! .. संध्यावंदनाच्या समयाला जन सागराच्या महाकाय  लाटांवर लाटां त्या तिथे येऊन धडका देऊ लागल्यात… खरी  भरतीची वेळ  क्षीरसागराची ,उचंबळून किनाऱ्यावर येऊन धडका देण्याची होती…पण त्या जनसागराचे ते महाप्रचंड रूप पाहून तो भयभीत झाला.. आपला काही टिकाव त्या पुढे लागणार नाही हे त्याला कळून चुकले म्हणून त्याने सपशेल माघार घेऊन शांत राहणे पसंत केले…रवीला देखील तो सोहळा ऑंखेदेखा हाल पाहायचा होता..पण त्याला दुसरीकडे अपाॅईटमेंट असल्याने थांबता आले नाही..बिचारा किरमिजी,तांबूस चेहरा करून हिरमुसून  निघून गेला…वरुणाने देखील हलकासा शिडकावा करत वातारणात तप्त मृतिकेचे सुंगंधी अत्तराचे सिंचन करण्यात धन्यता मानली… मरूतगण मंद मंद झुळूकेने वाहत असताना त्या जन सागराच्या आनंदाच्या लहरी लहरींना कुरवाळत राहिला आणि त्याचा मोद सगळ्या आसमंतात दूर दूर नेऊन पसरू लागला… संध्या रजनी हसत खेळत पदन्यास करत  अवतरली, तिच्या पायीचे नुपूर पदपथावरील दिव्यांत खड्या सारखे झळाळले…पदपथावरील झाडे लता वेली आपल्या माना उंच उंचावून सरसावली, आकाशीच्या प्रांगणात निळा मखमली जाजम अंथरला त्यावर शशांक आणि लखलखत्या चांदण्या दाटीवाटीने सज्जा सज्जातून तो सोहळा पाहण्यासाठी उत्सुक झाल्या…वसुंधरेवर पौर्णिमेचा चांदणचुरा उधळू लागल्या…हे देवेंद्रा !एक वारी ..लाख वारी विठोबाची पंढरपूरास निघालेली आणि दुसरी हि अनुपम्य वारी सोहळा  चाललेला पाहून… विजयी यात्रेचा  रथ  द्वारकेतून आणलेला पाहूनच  काही कलुषितानी कांगावा केला त्यांना मुळी  विजयी सोहळ्यात स्वारस्य नव्हतेच मुळी.. असं जरी असलं तरी जगज्जेतेपदाचा अश्वमेधाचा वारू  विचरून आलाय…मानवाने आता देवगणांची जागा घेतली की!… कोण विचारतोय तुम्हाला तुमच्या देवलोकाला!…  अब कि बार …मानव के लिए खुले स्वर्ग द्वार…आता तुम्हालाच त्यांचं मांडलिकत्व घ्यावं लागलं बरं.!.. असा हा भव्य दिव्य सोहळा पाहून डोळयाचे पारणे का बरं नाही फिटायचे!…त्या देवासाठी लाखावरी भक्त वेड्यासारखे धावून आलेत.. मानवाच्या राज्याचा विजयी डंका दुमदुमला…आणि  आणि देवळाचा  गाभारा काय आता अख्खं देऊळच रिते, ओस पडून गेले… संपली सद्दी आता तुमची देवा… हरी हरी म्हणत मानवाचा करा हेवा… मी त्यावेळीच तुम्हाला धोक्याची सुचना केली होती.. मानवाला अचाट बुद्धीचं वरदानं देऊ नका बरं.. तो दिवस दूर असणार नाही इंद्रालाच करील घाबरंघुबर… आता आला ना प्रत्यय आपल्या त्या घोड चुकीचा.. अहो असं ऐकलयं मानवांच्या राज्यात चुकीला माफी नाहीच…त्यांनी देखील आपली पूर्वापार चालत आलेली घटना कालमानानुसार  अपडेट करून घेण्यास सुरुवात केलीय ..चित्रगुप्ताला म्हणावं तुला देखील अपडेट व्हर्जन आणल्या शिवाय पर्याय नाही….आजवरी कुठल्या देवदेवतांच्या जत्रेला झाली नसेल ईतकी प्रचंड गर्दी  पाहून माझी छाती सुद्धा दडपून गेली… आता स्वर्गलोकी राहण्यात काहीच मतलब उरला नाही… आपला  जर उदो उदो करून घ्यायचा असेल पृथ्वी सारखे स्थान नाही… एकजात सगळे मानव कायमचं वेडानं झपाटलेले असतात… तिथं एकच अमर सत्य आहे दुनिया झुकती है बस् झुकानेवाला चाहिए… आणि त्यांची तर रांग न संपणारी आहे… देवा मी सुद्धा त्या रांगेत उभा राहायला निघालोय… तुम्ही येताय का कसे.. नाहीतर मला निरोपाचा तांबुल द्या.. हा मी मार्गस्थ झालो… नारायण ! नारायण!… “

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments