श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “कर चले हम फिदा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

# कर चले हम फ़िदा… अब तुम्हारे हवाले… #

“… हे काय? अजून तुम्ही स्टूलावरच उभे आहात काय? गळफास लावून घ्यायला धीर होत नाही ना? …पाय लटलट कापायला लागलेत ना! तो फास गळ्यात अडकवून घ्यायला हात थरथरायलाही लागलेत का?.. अगं बाई! चेहरा कसा भीतीने फुलून गेलाय… अंगालाही कापरं भरलयं वाटतं… आणि छप्पन इंचाची नसलेली छाती कशी उडतेय धकधक… ह्यॅ तुमची.. तुमच्याने साधं फासाला जाणं देखील जमणारं नाही…  घरातल्या इतर कामा सारखंच फाशी घेण्याचं कामं सुध्दा तुम्हाला जमत नाही…म्हणजे बाई कमालच झाली म्हणायची…अहो बाकीच्या  संसाराच्या कामात मेलं एकवेळ राहू दे हो  पण निदान फासावर जाण्याच्या कार्यात तरी पुरूषार्थ दाखवयाचा होताना…तितही डरपोक निघालात….तुका म्हणे तेथे हवे जातीचे हे येरागबाळ्याचे काम नोव्हे… आणि हे काय हातात लिहिलेला कागद कसला घेतलाय? बघु दे मला एकदा वाचून… आपल्या आत्महत्येला जबाबदार म्हणून माझं नावं वगैरे तर लिहिले नाही ना त्यात… हो तुमचा काय भरवंसा.. तुम्ही मनात आलं नाही तर फासावर लटकवून घ्याल नि व्हालं मोकळे एकदाचे… आणि मी बसते इथे  विनाकारण पोलिसांच्या ससेमिऱ्याला तोंड देत नि कोर्ट कचेऱ्याच्या हेलपाट्या टाकत आयुष्यभरं… तसं जिवंत पणीही तुम्ही मला सुखानं जगू दिलं तर नाहीच पण मेल्यावर सुद्धा माझ्या आयुष्याची परवड परवड करून गेल्याशिवाय चैन ती तुम्हाला कसली पडायची नाही… जळ्ळं माझं नशिब फुटकं म्हणून देवानं हा असला नेभळट नवरा माझ्या नशीबी बांधून दिला… अरेला कारे केल्याशिवाय का संसाराचा गाडा चालतोय… पण ती धमकच तुमच्या खानदानातच नाही त्याला तुम्ही तरी काय करणार… अख्खं गावं तुम्हाला भितरा ससोबा महणतयं आणि मला  जहाॅंबाज गावभवानी… पण कुणाची टाप होती का माझ्या वाटेला येण्याची… एकेकाची मुंडीच पिरगाळू टाकली असती… मी होते म्हणून तर इथवरं संसार केला… आणखी कुणी असती तर तेव्हाच गेली असती पाय लावून पळून… चार दिडक्या कमवून घरी आणता म्हणजे वाघ मारला नाही… घर संसार माझा तसाच तुमाचाही आहे… नव्हे नव्हे बायको पेक्षा नवऱ्याचा संसार जास्त महत्त्वाचा.. त्याचा वंशवेल वाढत जाणार असतोना पुढे… मग तो कर्ता पुरुष कसा असायला हवा हूशार, तरतरीत, शरीरानं दणकट नि मनानं कणखरं.. हयातला एकही गुण तुमच्याजवळ असू नये… जरा बायकोनं आवाज चढवला कि तुम्ही घरातून पळून जाता… कंटाळले मी तुमच्या या पळपुटेपणाला… एकदाचं काय ते कायमचे पळूनच का जात नाही म्हणताना आज तुम्ही हि फिल्मी स्टाईल स्टंटबाजीनं फासावर लटकवून घेण्याचं काढलतं.. कशाला मला भीती घालायला… असल्या थेरांना मी भिक घालणारी बाई नाही… माझ्या मनगटातलं पाणी काही पळून गेलंल नाही… माझं मी पुढचं सगळं निभावून न्यायला खंबीर आहे… तुम्ही तुमचं बघा… आणि काय ते लवकरच आटपा … आज एकच रविवारची सुट्टी असल्याने सगळं घरं झाडून घ्यावं म्हणतेय मी… मला ते तुमच्या पायाखालचं स्टूल हवयं.. तेव्हा तुमचा निर्णय लवकर अंमलात आणा… मला थांबायला वेळ नाही बरीच कामं पडलीत घरात… नाहीतर असं कराना एवीतेवी तुम्ही फासावर लटकायचं हे ठरवलंय ना.. मग जाण्यापूर्वी शेवटचं एकदा घर झाडून द्यायला मदत करुनच गेलात जाता जाता तरं माझ्या मनाला तेव्हढचं समाधान मिळेल हो… आणि त्या आधी तुमचे आवडीचे दडपे पोहे  नि त्याबरोबर गरम गरम चहा ठेवलाय तोही पिऊन घ्यालं… नाहीतर उगाच माझ्या मनाला नकोती रुखरुख लागेल… आता बऱ्या बोलानं खाली उतरतायं कि कसं.. का मारू लाथ त्या स्टूलाला अशीच… “

… ” नको नको…मी खाली उतरतो… तू म्हणतेय तसं फासावर जाण्यापूर्वी दडपे पोहे नि चहा घेतो… ते घरं झाडायला तुला मदतही करतो… पण पण तू असं समजू नकोस कि मी माझ्या निर्णायापासून परावृत्त झालो म्हणून… ते आपलं तुझ्या शब्दाचा मान राखावा आणि तुला ते स्टूल हवयं म्हणून… हे सगळं आवरून झालं कि मी माझा निर्णय  अंमलात आणणारं हं… मग भले त्यावेळी तू कितीही मधे मधे आढेवेढे आणलेस तरी माघार घेणार नाही… पण त्यावेळी तू मात्र दडपे पोहे नि गरमागरम चहाच्या मोहात फशी पाडू नकोस बरं… नाहीतर…. “

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments