श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “ना मातीची माणसं… ना तिची माणसं…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
बया बया ! अगं इमले काय गं हि इमारत म्हनायची.. . किती झकपक लाईटीनी उजळलीया.. . दिवाळीच्या कंदीलावानी रंगीबेरंगी दिसतीया कि.. . अन उच तरी किती हाय म्हनतीस, आभाळालाच टेकली कि काय?.. . तिथनं म्होरं स्वरग दोनचं बोटं उरला असलं कि.. . बाई बाई!मानसानं मान तरी वर कर करून बघायची म्हटली तर डोईवरचा पदर खाली जमिनीवर पडला कि गं.. . चारीबाजूनं खिडक्या नि खिडक्याच दिसत्यात काय दारं बिरं ह्याला हायती का न्हाई काय कळंना कि.. . कुठूनशान जातात नि येतात गं या इमारतीतनं.. . कशी खुराड्यावानी घरं दिसत्यात.. . मानसंच राहत असत्याल नव्हं त्यात.. . का कोंबडा कोंबडीच.. . अन एव्हढ्या उचावर राहायचं भ्या कसं वाटंत नसंल.. . खाली बघून डोळं गरगरत नसत्याल त्याचं.. अन इमले मला सांग एकाच येळेला समंध सामान घरात आणत असतील का गं?.. . का आपल्यावानी साखरं राहिली जा पटाकन दुकानाकडं, , दुध आणायला पळ, मोहरी राहीली जा धावत.. . असं धा धा येळा येडताकपट्टीनं माणूस नि त्यो इजेचा पाळणा थकत नसंल.. आनि इतकी बिर्हाडांच्या ये जा नी बंद पडत नसलं.. अन कधी बंद पडलाच तर हाय का आली बैदा मगं.. . वरची माणसं वरचं लटकलेली आनि खालची खोळंबलेली.. . जिनं चढून जायच़ खायचं काम असेल का ते.. . एखादा धाप लागून फुकाफुकी मरायचा बी.. . इमले आपून नाय बा तुझ्या बरुर त्या परश्याच्या घराकडं जानार.. . त्याला म्हनावं आईला भेटायला तू खाली उतरून ये.. . माझ्या छातीत बगं हे समंध बघूनच लकलक व्हायला लागलयं.. . रातच्याला इतका उजेड पडलाय मगं सकाळी कसं दिसत असेल गं.. . अन खुळे त्या इमारतीच्या खालच्या अंगाला किती मोटारी उभ्या केल्या हायती बघ जरा.. . अगं मोटार इकायचं दुकानच काढल्यागत वाटाया लागलयं.. . काळी, पांढरी, लाल, निळी, मोरपिशी.. . रंगाची उधळण केल्यासारखी.. . बापय बी चालवितो नि बाई बी.. . सुसाट सुटतात मोटारी कानावर हाॅर्न जोराचा वाजवूनवाजवून बहिरं केलं बघ.. . या दिव्याच्या झगमगटानं डोळं दिपलं कि गं वेडे.. . इमले मला लै भ्या वाटाया लागलया.. आपून आपल्या गावाकडं माघारी जाऊया.. . परश्याला सांगावा धाडू अन त्येला तूच गावाकडं ये बाबा भेटायला असं सांगू.. . माझ्या सारखीची हि दुनिया न्हाई.. . इथं जल्माची लगिन घाई.. . कोन कुनाची चवकशी बी करीत न्हाई.. गेटवरचा वाॅचमेन लै आगाऊ.. आम्हालाच इचारतू अंदर आया काय कू.. . माझ्याच लेकराला भेटाया त्याची परमिशन लागती.. आरं म्या त्याची आय हायं धा वेळा सांगून झालं तरी बी मलाच गुरगुरतो हमे क्यू बताती.. . परश्याला द्यायचा व्हता आक्रिताचा धक्का.. आयेला अडानी समजू नकु एकलीच शेहरात येऊन सायेबालाच येडं करील बरं का.. . परं इथं आल्यावर कळल़ वाटलं तेव्हढं सोपं न्हाई.. . आपलीच माणसं आपल्याला भेटाण्याला झाली पराई.. . गावं ते गावचं असतया.. येशीपासून ते म्हसोबा पतूर समंध्यास्नी पिरमानं पुसतया.. . शेहरात कोन कुनाची फुकापरी करील सरबराई.. . इमले आपला गावचं बरा बाई.. स्वर्गच खाली उतरून इथं आला बाई.. . आपल्या मातीशी नगं गं बेईमानी.. .
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈