श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “रबने बना दी जोडी…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… हे बघ ना सुधीर ! या पुस्तकातलं ताजमहालाचं चित्र किती भारी वाटतयं.. अगदी खराखरा ताजमहाल दिसतोय… आणि त्याच्या खाली.. शहेनशहा शहाॅंजान ने आपल्या सौंदर्यवती बिवी मुमताजच्या आठवणी प्रित्यर्थ बांधला असं दिलयं… त्या दोघांचं प्रेमाचं प्रतिक चिरकाल तसचं उभं आहे… खरचं दोन प्रेमिकांनी प्रेम करावं तर असं असावं.. मला हा ताजमहाल खुप आवडतो.. हवाहवासा वाटतो.. सुधीर तु एक शिल्पकार आहेस ना मग आपल्यासाठी या ताजमहालाची प्रतिकृती करुन आण की… आपणही प्रेम अगदी तसंच करायचं हं… कधीही एकमेकांशी बिल्कुल भांडण तंडण, राग, रूसवा करायचा नाही… अगदी मी जरी हट्टाला पडले, चिडले तरी तू मात्र मला प्रेमानं समजूत घालायची, माझा हट्ट उशिराने का होईना पण पुरवावास.. म्हणजे आपलं प्रेम अधिक दृढ होईल… तुला संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर स्टेशनवर न्यायला रोज येत जाईन मग फिरत फिरत कधी ड्रेस, टाॅप, जीन, मेक अपचं सामान असं किरकोळ खरेदी करून घरी येऊ.. घरी आल्यावर स्विगीवरून मागवलेलं जेवणं जेऊन घेऊ.. रात्री मग मी माझ्याआईला फोन करेन त्यावेळी तू वाॅशिंग मशीन लाव नि दिवसभराची पडलेली दोन चार भांडी तेव्हढी घासून काढ… आईशी फोन वरचं बोलणं झालं कि मग दोघं मिळून काॅटवरचं बेडशीट बदलुन झोपी जाऊया… जानू तू सकाळी एकदा ऑफिसला गेल्यावर घर मला खायला उठतं बघ… चैन कसली पडत नाही.. इतकं बोर होतं म्हणून सांगू.. टि. व्ही. वरच्या सगळ्या सिरियल्स नि मोबाईल वरचे नेटफ्लिक्स, प्राईम, च्या वेब सिरीज बघून देखील कंटाळा दूर होत नाही.. वेळ जाता जात नाही.. मग घरातलं कुठलचं काम करायचा मुड लागत नाही.. मग तू येण्याची आतुरतेने वाट पाहत बसते… घरातलं पडलेलं काम तसच टाकून देते.. ऑफिसमधून तू घरी आल्यावर तु हि कामं न सांगता करणारच हा माझा विश्वास असतो… कारण आपल्या खऱ्या प्रेमाची तर ती ओळख आहे…

सगळ्यांनीच काही शहाजहानसारखा मुमताजसाठी बांधलेल्या सारखाच ताजमहाल बांधायला हवा असं नाही.. तर अगदी घरची धुणी भांडी, झाडू पोछा आपल्या बायको च्या प्रेमाखातर इतकं केलं तरी पुरेसे आहे… दुसऱ्याला आनंद देण्यात खरा आनंद आपल्यालाच मिळतो.. नाही का?. मग जानू माझ्यासाठी तुझ्या लाडक्या सुधासाठी छोटीशी मदत करणार नाही का… मग मी दरवर्षी वट सावित्रीच्या पूजेच्या वेळी सात जन्मच काय जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे म्हणून मागून घेईन नि दोन तासाचा उपवास करीन… आपल्या माणसासाठी ईतकं तरी मला करायलाच हवं नाही का. ?.. मगं शेजारचे पाजारचे, सगेसोयरे आपल्यावर जळफळतील.. म्हणतील क्या रब ने बनायी जोडी…! ”

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments