श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “रुलाके गया सपना मेरा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

पौर्णिमेचं  शशीबिंब आज माझ्या गवाक्षाशी बराच वेळ थबकलं.. तिथून न्याहाळलं होतं त्याला मी त्या गवाक्षात उभी असताना… आणि पुढे जाताना एक मंद स्मित रेषा आपल्या चेहऱ्यावर फुलवून निघायचं ठरवलं… अन मी नकळतपणे  आलेही… नव्हे नव्हे ओढले गेले.. त्या गवाक्षापाशी… हळूच मान लवून बघत राहीले… रस्त्यावरती सांडलेला चांदणचुरा चमचमताना किती गोड नि मोहक दिसत होता… हरपून बसले भान माझं..वेडं लावलं मला त्यानं स्वत:चं… नजर मिटता मिटत नव्हती नि कितीही पाहिलं तरी तृप्ती होत नव्हती… तरी बरं त्यावेळी आजुबाजूला.. खाली रस्त्यावर कुणी कुणीच नव्हते.. माझ्याकडे पाहत.. प्रेमात पडलीस वाटतं असचं एखाद्याला मला चिडवायला मिळालं असतं…

मी पण छे.. काही तरीच काय तुमचं…नुसत्या नजरेने पाहिलं तर ते का प्रेम असतं… असं मी स्वतःशीच म्हणाले… हो स्वतःशीच.. तिथं माझं ऐकायला तरी कोण होतं… पण मी ते सांगताना खूप लाजले तेव्हा गालावरची खळी खट्याळपणानं सारं काही सुचवून गेली… असा किती वेळ माझा.. माझाच का आम्हा दोघांचाही.. गेला.. नंतर रोजचा तसाच जात राहिला… भेटण्याची वेळ नि भेटण्याचं ठिकाणं ठरून गेलेलं….

नंतर हळूहळू त्याचं येणं उशीरा उशीरानं होऊ लागलं… माझी चिडचिड होऊ लागली… आधीच भेटायचा वेळ तो किती थोडा .. त्यात याच्या उशीरानं येण्यानं भेटीचा क्षण संपून जाई…तो नुसता जात नसे तर माझ्या मनाला चुटपूट लावून जाई.. हुरहुर लागे जीवाला ..  उद्यातरी  भेटायला वेळ भरपूर मिळेल नं… छे तसं कुठं घडायला दोन प्रेमी जीवांच्या आयुष्यात… नाही का…

आणि एक दिवस त्याचं येणचं झालं नाही… विरहाचं दुख काय असतं ते त्या दिवशी कळलं… मी गवाक्षात उभी होते नेहमी सारखी.. पण आज चंद्र प्रकाश नव्हता ..  होता तो काळोख सभोवताली… डोळे भिरभिरत होते त्याची वाट पाहताना…रस्त्यावरचा मर्क्युरी दिव्याचा प्रकाश माझी छेड काढू पाहताना  नारळाच्या झावळीतून तिरकस नजरेने बघत होता… आमच्या आठवणींच्या सावल्यांचा खेळ माझ्या नजरेसमोर मांडताना.. इतकंच कानात सांगून गेला…’ वो जब याद आये बहूत याद आये…’  आणि आणि माझं वेडं मन गुणगुणत होतं… ‘ रूला के गया सपना मेरा.. ‘

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments