श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “संचारबंदी…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
“अरे ये इकडे ये असा! संबंध शहरात एकशे चव्वेचाळीस कलमाखाली संचारबंदी लागू केली आहे ना? तुझ्या टाळक्यात आलयं कि नाही… दुकानं, चहाच्या टपऱ्या पानपटृया, सलून, दारूची दुकानं, बीयर बार, माॅल, सगळी वाहतूक वगेरे कडकडीत बंद ठेवलं असताना… तू कोण लाॅर्ड माऊंटन लागून गेला आहेस रे? एकटाच बिनधास्तपणे रस्त्यावरून खाली मान घालून हलेडुले चालत निघालास?… काय कुठून चोरून झोकून वगैरे आलास कि काय?…. कोणी आगांतुक बाहेर दिसताच क्षणी पकडून जेलात टाकण्याची आर्डर आहे आम्हाला… आणि असं असून तू कायद्याला धतुरा दाखवून निघालास… एव्हढी तुझी हिंम्मत… बऱ्या बोलानं आता तू चौकीवर चलं… तिथे सायेबच तुला आता कायदा मोडला म्हणून चांगलाच इंगा दाखवतील…. अश्या तंग वातावरणात बाहेर पडताना आपल्या घरच्यांचा थोडा तरी विचार करायला पाहिजे होतास… नशिब तुझं चांगलं कि बाहेर काहीच राडा वगैरे काही झाला नाही… नाही तर कुठे फायरिंग वगेरे झालं असतं आणि त्यात तू सापडला असतास तर आज तुझ्या घरच्यांवर काय आपदा आली असती… किती बिनडोक असशील तू! बघितलसं का या दांडूका कडे हाणू अंगोपांगांवर चार रटृटे.. गप्प गुमान घरात बायका पोरांच्या बरोबर बसून आजचा दिवस छान घालवयाचा सोडून हि अवदसा का आठवली तुला म्हणतो मी… चल चल बोल लवकर आता का दातखिळी बसली तुझी.. आं! “
“अहो हवालदार सायेब.. तुम्ही मला या दांडक्यानं चार रटृटे घाला मला चालेल… हवंतर चौकीत नेऊन जेलात टाका त्यालाही माझी तयारी आहे… कारण मी संचारबंदी चा कायदा मोडला हा गुन्हा मला कबूल आहे… पण पण तुम्ही नुसता पोकळ दम देऊन मला घराकडे पाठवून देऊ नका… अहो आताच तर त्या घरातल्या अवदसेच्या तावडीतून कसाबसा बाहेर निसटलोय… काय सांगू हवालदार साहेब माझी कर्म कहाणी तुम्हाला… अहो तो एकशे चव्वेचाळीस च्या कलमाखाली संचारबंदी या शहारात लागू झाली पण ती आमच्या घरात लागू झाली नाही ना… एरवी महिना महिना भांडंकुंडण करायला नवरा हाती लागत नव्हता तो नेमका या संचारबंदी मुळे आयताच घरात सापडला म्हणून बायकोने जे सकाळपासून तोंडाचा पट्टा सुरू केला तो थांबायलाच तयार नाही… आणि अख्ख्या चाळीला फुकटचा कौटुंबिक मेलोड्रामाचा स्पेशल एपिसोड बघायला भाऊगर्दी जमा झाली… मी चकार शब्द काढत नव्हतो.. हे पाहून तिच्या संतापाचा पारा आणखी वाढला आणि मग धुण्याच्या काठीने माझी धुलाई करण्यासाठी तिने पवित्रा घेतला… एक दोन तडाख्यावर निभावले आणि मी चाळी बाहेर पळत सुटलो… साहेब तुमच्या या एकशे चव्वेचाळीस च्या कलमाखाली संचारबंदीने माझ्या बायकोचं तोंडं काही बंद झालं नाही… आणि जोपर्यंत मी घरात तिच्या समोर दिसणार तोपर्यंत ती मुलूख मैदान तोफ अशी डागत राहणार.. तिच्या पासून बचाव करण्यासाठी म्हणून मी असा जाणून बुजून धोका पत्करला…. आता तुम्हीच काय तो निर्णय घ्या… आणि मला यातून सोडवा म्हणजे झालं… “
“अरे वेड्या कशाला मला लाजवतोस! … माझ्या घरी सुद्धा अगदी हाच नाट्य प्रवेश मगा घडला… आम्हा पोलिसांच्या वर्दीला कधी काळवेळ, सुट्टी नसतेच ना… आताहेच माझ्या बायकोनं देखील माझ्यावर इतकी आगपाखड केली म्हणून मगं मी रागा रागाने त्याच तिरमिरीत बंदोबस्तासाठी बाहेर आलो.. मनात चांगलाच राग खदखदत होता मनात म्हटलं आता जो कोणी रस्त्यावरून दिसेल त्याची खैर करायची नाही… आणि बायकोलाच बदडून काढतोय असं समजून त्याला चांगलचं बदडून काढायचं… मनातला सगळा राग शांत करायचा त्याशिवाय मनाला चैन लागायाची नाही… आणि नेमका तू सापडलास… आपण एकाच नावेतले दोनं प्रवासी… काही नाही रे.. या बायकाच असतात अश्या भांडकुदळ… आपला निभावच लागत नाही… कुठल्याही कलमाखालची संचारबंदी लागू करा पण ती बायकांना लागू होतच नाही… आणि अश्या नेमक्या वेळीच त्यांच्या अंगात मात्र असा काही संचार होतो म्हणून सांगतोस… त्यावेळी आपण बंदी, अगदी जायबंदी होऊनच जातो… आपण समदुखी आहोत हेच खरं… चल मित्रा त्या पुढून बंद असलेल्या चहाच्या टपरीवर मागनं जाऊन एकेक कटींग घेऊ मग तू तसाच कडे कडेनं तुझ्या चाळीच्या वळचणीला जा… आणि मी ड्युटी संपली कि माझ्या काॅलनीकडे जातो… शेवटी आपल्या घराशिवाय सुरक्षीत आधार तिथचं तुला नि मलाही मिळणार आहे गड्या…! “
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈