श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “आली गाडी.. गेली गाडी…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“सांगितलं कि गं तुला कितीतरी बाऱ्या!… माझ्या गावा कडं येताना तू मोकळीच येऊ नगंस म्हनून!… तिकडनं मंमईहून येताना माझ्या सासुरवाशीण लेकीला संगट घेऊन येशील, चार दिवस आपल्या म्हातारीला भेटायला… पन तू काय मनावर घायचं नावं घेत न्हाईस!… अन फुकाच्या मातूर दिसरातीच्या सतरा बाऱ्या येरझारा घालतीस… तसं तुला काय गं कुणाच्या सुखदुखाचं काय पडलेललं नसतयं म्हना!… तू जोडून घेतलेला हाय नव्हं त्यो चौवीस डब्यांचा बारदाना… आमच्यावानी संसाराचा ओढत जातीस तुझा गाडा…बाया बापड्या, बापयं गडी मानूस, लेकरं बाळं, ट्रंका, बोचकी, पिशव्या नि हबशींनी ओतू जातोय डब्बा डब्बा… जसा जीवनाच्या प्रवासाला निघतातं तसं…कुणी हसतया,कुणी रडतया तर कुणी इवळतया तर कुनाची कुजबूज, शबुद नसलेली धुसफूस तर कुनाची कावाकाव…तुला यातलं काही कळंत नसतया तुझी असती रूळावरून वाघ पाठीमागं लागल्यासारखी धावाधाव…जाशील तिकडं मुलूख तुला थोडा जसा दक्षिणेतलं रामेश्वर अन उत्तरेतलं काशी…सगळीच अनोळखी कुणं कुणाची कशाला करतीय चवकशी… जो तो इथं वागतोय तालेवार असल्यावानी…सगळ्यांना घेतीस सामावून तू आपल्याच पोटात.. अन जो तो असतो आपल्याच नादात.. कुणाचं दुखलं खुफलं… मन फुलून आलं आनंदान.. तुला गं पडाया कशाची फिकीर.. शिटीवर शिटी फुंकत जातीस वरडत नि एकेक स्टेशान मागं सोडंत.. जत्रा भरेली फलाटावरची चढ उतार होतेय तू आल्यावर… वाईच पोट होतयं तुझं  ढवळल्यागत… पर तुला काहीच फरक पडतो काय… फलाटाला सोडून गेल्यावर त्या फलाटाचा उसासा तुला कधी कळतो काय?… साधू संतावानी तू अशी कशी गं निर्लेपवानी… अन तुला कसं कळावं एका आईचं आतडं कसं तिळ तिळ तुटतयं  लेकीच्या भेटीसाठी.. चार वर्षांमागं लेकीला गं सासरला धाडलं…काळजाचा तुकडाच दूर दूर गेला नि भेटीगाठीला गं आचवला… सांगावा तो तिचा यायचा सठीसाही माहीला सुखी आहे पोरं कानात सांगुन जायचा.. परी पोरीच्या भेटीसाठी जीव तो आसुसलेला असायचा… लिहा वाचायची वानवा हाय माझ्याजवळ..पतुर पाठवाया  उभा राहायतयं धरम संकट.. फोनची श्रीमंती आमच्या खेड्यातपतूर पोहचलीच नाही… बोलाचाली चा मायेचा शबुद सांग मंग कानावर कसा पडावा बाई..इकडच्या धबडगा घराचा उंबरठा नि शेताचा बांध कधी मला गावाची वेस वलांडून देईनात खुळे… अन तिकडं पोरीला सासरच्या जोखडात अडकवून टाकतात कारणांचे खिळे… मग तुझा घ्यायचा आधार असं मला लै मनात आलं.. म्हटलं तू सारखी ये जा करतीस लाखावरी माणसांची ने आण करतीस मगं तुला माझ्या पोरीला एकडाव तरी संगट घेऊन यायला जड कशाला जाईल.. अगं चार दिसं नसंना पण उभ्या उभ्या येऊन पोरं जरी येऊन भेटून, नदंरला पडून गेली तरी बी लै जीवाला बरं वाटंल बघ.. सकाळी सकाळी तू तिला इथं सोडायचं अन रातच्याला माघारी घेऊन जायचं… तू म्हनशील मगं तूच तसं का करीनास… न्हाई गं बाई… पोरीची अजून कूस उजवली नाही तवर तिच्याकडं जाता येत न्हाई हि परंपरा हायं आमची… तवा तुझ्याकडं पदर पसरून मागणं केलं… काही बी करं कसं बी जमवं पण एक डाव, या वेड्या आईला तिच्या पोरीची भेट एवढी घडवं… आणि पोरीला आणशील तवा हसऱ्या चेहऱ्याने  निळ्या धुराचा पटका हवेत उडवत, आनंदाचा हिरवा बावटा फडकत फलाटावर येशील… गळाभर लेकिला तिचं मी भेटल्यावर मायेच्या पायघड्या घालून तिला माहेराच्या घराकडं नेईन…औटघटकेचं का असंना पण माहेरपण करीन…आणि…रातच्याला पाठवणी करायला येईन तवा तू वेळ झाली निघायची म्हणून शिटीवर शिटी फुंकत…अंधारातल्या आकाशात ताटातुटीचे उमाळाचे काळे सावळे धुराचे सर रेंगाळत सोडशील…अन फलाट सोडून निघशील तेव्हा जड अंतकरणानं पाय टाकत पुढे पुढे जाताना… क्षणभरासाठी का होईना लालबावट्याला बघून थांबशील… वेड्या आईकडं  पोरीनं  पुन्हा एकदा मान वेळावून खिडकीतून बघितलं का याचा अंदाज घेशील… दोन निरोपाचे आसू गालावर टपकलेले निपटलेले  दिसल्यावर तू तिथून हलशील… इतकचं इतकचं माझ्यासाठी करशील… करशील नव्हं… “

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
jyoti kulkarni

chchan aahe eka aaicha manogat.