सुश्री वर्षा बालगोपाल
बोलकी मुखपृष्ठे
☆ “चाकोरीतल्या जगण्यामधून” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
एक सुंदर खिडकी वजा दरवाजा••• त्यातून कुतुहलाने बाहेर डोकावणारी स्त्री••• मागे स्वयंपाक घरातील दिसणारी मांडणी•••
बस एवढेच चित्र. पण त्याच्या मोहक सौंदर्याने लक्ष वेधून घेते आणि काही क्षण तरी निरिक्षण करायला भाग पाडते.
नंतर दिसते ते चित्राच्या खाली असलेले पुस्तकाचे शिर्षक••• ‘चाकोरीतल्या जगण्यामधून ‘.
मग लगेच विचारचक्र फिरू लागते आणि चित्राचा वेगळा अर्थ उमगतो की स्त्री••• जी संसाराच्या चाकोरीत अडकली आहे, तिलाही संसाराच्या पलिकडच्या जगाचे कुतूहल आहेच की! त्याच कुतुहलाने ती बाहेर डोकावून बाहेरच्या जगाचा अंदाज घेत आहे•••
नीट पाहिले तर तिचा संसार म्हणजे तिचे स्वयंपाकघर हे मुख्य असले तरी सध्याची परिस्थिती पहाता ती चूल आणि मूल यामधेच गुरफटून न रहाता संसाराला मदत म्हणून या चौकटीतून बाहेर पडून काही करण्याच्या विचारात आहे आणि त्यासाठी तिचे एक पाउल बाहेर पडले पण आहे .
जरी तिचे एक पाऊल बाहेर पडले असले तरी अवस्था मात्र नरसिंहासारखी द्विधा झाली आहे. ना धड घरात ना धड बाहेर••• ना मुक्त ना बांधलेले तरीही या उंबरठ्याशी जगडलेले•••
स्त्रीने कितीही बाहेर पडून स्वर्ग हाती घेतले तरी तिला आजही घरचे सगळे बघावेच लागते. ती कोणत्याही कारणाने घराच्या चौकटीच्या बाहेर आली तरी सरड्याची धाव कुंपणार्यंत तसे काहीतरी तिच्या बाबतीत होते आणि घर , घराचा उंबरठा हे तिचे मर्मस्थानच बनते.
हे प्राधान्य असले तरी आजकालची स्त्री ही घराच्या चौकटीतून बाहेर पडू लागली आहे हे वास्तव स्पष्टपणे दिसते.
नीट पाहिले तर या चौकटीवर धावदोर्याची टीप दिसते आणि यातूनही बरेच अर्थ प्रेरित होतात. स्त्रीचे आयुष्य हे घरचे बाहेरचे ऑफिसचे सणवार पाहुणेरावळे यामधे धावतेच झालेले आहे .तीच तिची चाकोरी बनली आहे.
अजून विचार केला तर वाटते स्त्रीचे आयुष्य बाहेर वेगळे असले तरी तिच्या भावना या धावदोरा घालून घराच्या चौकटीतच शिवल्या गेल्या आहेत.
अशा अनेक स्त्री समस्यांना वाचा फोडणारे हे चित्र. त्या स्त्रीच्या चेहर्यावरील हावभावामुळे स्त्री व्यथेतून मोकळी होऊन आपले विश्व मी निर्माण करीन. चौकटी बाहेर जाऊनही चौकटीची मर्यादा मान हे जपून संसार फुलवेन या आत्मविश्वासाचे द्योतक वाटते .
अर्थातच या नावामुळे आणि त्यातील गर्भितार्थामुळे पुस्तकाच्या अंतरंगात डोकावायची ईच्छा होतेच.
ईतके साधे चित्र पण कल्पकतेतून त्याला विविध आयाम द्यायच्या कसबतेमुळे मनाचा ठाव घेते .त्याबद्दल मुखपृष्ठकार नयन बारहाते, संवेदना प्रकाशनचे प्रकाशक नीता,नितीन हिरवे आणि लेखिका सविता इंगळे यांचे मन:पूर्वक आभार
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈