सुश्री वर्षा बालगोपाल

? बोलकी मुखपृष्ठे ?

☆ “प्रश्न टांगले आभाळाला” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

एका व्यक्तीची गडद सावली सारखी आकृती. तिच्या हातात मुळापासून उखडलेले झाड आणि झाडावर जाणवणारी फडफड.

किती गूढ चित्र आहे हे•••  मग शिर्षकावर नजर गेली, प्रश्न टांगले आभाळाला. आणि त्यातून त्या व्यक्तीच्या मनात येणारे पुष्कळ प्रश्न विचारांच्या झाडाला टांगून ठेवलेले असावेत आणि हे विचारांचे झाड मुळापासून कोणीतरी उपटावे  आणि क्षणार्धात ते प्रश्न आभाळाला जाऊन भिडावे असे त्या व्यक्तीच्या मनात आहे का असे वाटले.

खरोखर कुतुहल जागे झाले आणि त्या चित्राभोवती मन पिंगा घालू लागले. अशा गूढ चित्राचे वेगवेगळे अर्थ लावू लागले. 

०१) नीट पाहिले तर ती व्यक्ती धरती मातेचे रूप वाटली . या जमीनीच्या आत अर्थात भूगर्भात कितीतरी हालचालींच्या जाणिवा होत असताना त्याच्याशी निगडीत असलेले झाडच जर मुळासकट तोडले नव्हे तर उखडले••• तर  या काळ्या आईला किती वेदना होतील? ते झाड उखडले तरी वेदनांनी वाकलेली आई आपल्या या लेकराला आपल्या हातात झेलते. पण त्याचा जीव वाचवणे आता आपल्या हातात नाही म्हणून त्या झाडाची फडफड, तडफड तिच्या काळजाला पुन्हा पुन्हा जाणवते आणि मग हे असे का असा येणारा प्रश्न, हे माझ्याच बाबतीत का? असा प्रश्न, कधी थांबणार अन्यायाचा कल्लोळ हे सगळे प्रश्न आकाशा एवढे मोठे होऊन आभाळाला भिडतात.

०२) ती आकृती स्त्रीची मानली तर स्त्रीभृणहत्येचे झालेले आकाशा एवढे विराट रूप इतर अनेक समस्यांचे झाड होऊन त्या झाडाला तरी कसे नष्ट करणार असे प्रश्न जणू आभाळाला भिडले आहेत.

०३) ही आकृती एका मानवाची मानले तर त्याच्या मनातले समस्यांचे झाड मुळापासून उपटले तरी ते त्याच्याही नकळत त्याने आपल्याच हातात झेलले आहे. आता या समस्यांच्या झाडाला असलेले अनेक प्रश्न मग मोठे होऊन त्या भाराने त्या प्रश्नांच्या दबावाने हा मानव वाकला आहे.

०४) थोडे बारकाईने बघितले तर वृक्षतोडीने सिमेंट जंगल वाढताना या वृक्षतोडीमुळे निर्माण झालेले पक्ष्यांच्या घरट्यांचे प्रश्न, जमीनीच्या धूपेचा प्रश्न, स्थलांतर न होऊ शकणार्‍या गोष्टींचा प्रश्न अशा अनेक जाणिवांचे प्रश्न फार मोठे आहेत हे सुचवायचे आहे.

०५) थोडी दृष्टी विचार केली तर पृथ्वीचा अर्धा गोल वाटतो . म्हणजेच मानवाच्या मनातील प्रश्न हे वैयक्तिक , सामाजिक न रहाता वैश्विक प्रश्न आहेत हे सुचवून त्यातील महानता आभाळ शब्दात व्यक्त होते. 

०६) उखडून फेकून द्याव्याशा वाटणार्‍या असंख्य प्रश्नांची लक्तरे होऊन ती आभाळाला भेडसावू लागली आहेत. 

०७) अंतरंगात डोकावले तर कळते नितीन देशमुख यांचा हा गझलसंग्रह आहे. त्यातून अनेक समस्यांकडे पाहून निर्माण झालेले शेर आहेत. अनेक जाणिवांतून उठलेले वादळ आहे, अनेक तरणोपाय नसलेल्या प्रश्नांवरचे मंथन आहे.म्हणून त्या अनुषंगाने आलेले नाव आणि त्याला साजेसे असे हे चित्र आहे.

०८) अन्वयार्थाने विचारांची जमीन असलेला उला आणि उच्च खयालांची उकल असलेला सानी या दोन्ही मिसर्‍यामधे होणारी मनाची खळबळ या चित्रात सांगायचा प्रयत्न केला आहे.

असे अनेक मतितार्थ , अन्वयार्थ ,भावार्थ असलेले मुखपृष्ठ प्रतिमा पब्लिकेशन्सच्या दीपक आणि अस्मिता चांदणे यांनी निवडले आणि श्री नितीन देशमुख यांनी स्विकारले त्याबद्दल त्यांना मन:पूर्वक धन्यवाद !!

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments