‘सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सौ राधिका भांडारकर
संपादकीय निवेदन
अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!
मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित ‘ भाऊबीज विशेष लेख स्पर्धा ’ या राज्यस्तरीय स्पर्धेत आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका सौ. राधिका भांडारकर यांच्या “मानसुमने“ या लेखाला प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.
लेखाचा विषय होता… “लाडक्या बहिणीला भेट हवी : दानाची नाही मानाची“
या पुरस्काराबद्दल राधिकाताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि यापुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.
आजच्या अंकात वाचूया हा प्रथम पुरस्कारप्राप्त लेख.
– संपादक मंडळ
ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग
मनमंजुषेतून
☆ मानसुमने… ☆ सौ राधिका भांडारकर ☆
सोनियाच्या ताटी । उजळल्या ज्योती ।
ओवाळीते भाऊराया । वेड्या बहिणीची वेडी ही माया ।।
या ओळी वातावरणातून कधीही लहरत आल्या की कान आणि मन तृप्त होतं. बहीण हा शब्द कधी एकट्याने येतच नसावा. अदृश्यपणे बहीण या शब्दाबरोबर भाऊ हा शब्द असतो आणि ज्या ज्या वेळी बहीणभाऊ असा जोडशब्द उच्चारला जातो तेव्हा नकळत त्या भोवती मायेची, प्रेमाची, भावबंधनाची झालर सहजपणे विणली जाते.
हिंदू संस्कृतीत बहीणभावाच्या या नात्याला अपरंपार महत्त्व आहे आणि हा ममतेचा रेशीमबंध सदैव जपला जावा म्हणूनच *रक्षाबंधन*, *भाऊबीज* यासारखे सण बहीणभावामधली प्रेमाची गाठ अतूट राहण्यासाठी साजरे केले जातात. परंपरा आणि संकेतात गुंतलेला हा भावनिक धागा अशा रीतीने जपला जातो.
अर्थात बहीणभावाचं सांस्कृतिक पातळीवरचं नातं असं असावं अशी सामाजिक अपेक्षा असते. प्रत्यक्षातले अनुभव कदाचित निराळे असू शकतात. मुळातच नाती टिकवणं, नाती जपणं, नात्यातला बंध पाळणं, नात्याला अधिक सुंदर करणं या गोष्टी आजच्या यंत्रयुगात मात्र काहीशा धूसर झालेल्या जाणवतात.
जगण्याच्या कल्पनाच बदलल्या आहेत का? की यांत्रिकतेत, कमालीच्या गतिमानतेत, स्पर्धेच्या युगात, स्वातंत्र्याच्या अफाट कल्पनेत, स्थळ काळानुसार कुठेतरी या संकेतांनाच नकळत पायदळी चिरडले जात आहे का?
एक हजारो मे मेरी बहना है
सारी उमर हमे संग रहना है।।
हे फक्त गाण्यापुरतंच उरलं आहे का?
पण या साऱ्या सांस्कृतिक पारंपरिक प्रश्नांची उत्तरे शोधण्यापूर्वी एक गमतीदार विचार मनात येतो तो सध्या राजकीय क्षेत्रात गाजत असलेल्या *लाडकी बहीण* या शब्द समूहामुळे. वास्तविक या लेखाला मला कुठलंही राजकारणी स्वरूप नक्कीच द्यायचं नाही अथवा राजकारणावर टीका करण्याचा माझा हेतूही नाही पण समाजात जगत असताना “जगणं आणि राजकारण” याची फारकत कशी करणार? शिवाय एका राजकीय पक्षाकडून लाडक्या बहिणीला मिळणारं हे अनुदान नक्की कशासाठी? हा प्रश्न दुर्लक्षित कसा काय करणार? “आवळा देऊन कोहळा” काढण्यासारखं नाही का वाटत हे? *घ्या अनुदान करा मतदान* अशी एक अंतस्थ घोषणा नाही का ऐकू येत? भेटीत दानाची भूमिका असेल पण या दानात बहिणीचा मान, सन्मान खरोखरच राखला आहे का आणि तसं असेलच तर मग पुढचा अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलंत प्रश्न निर्माण होतो तो महिलांच्या सुरक्षिततेविषयी.
प्रत्येक मिनिटाला तीन ते पाच बलात्कार होत असलेल्या आपल्या देशात *लाडकी बहीण* या शब्दरचनेला कुठला अर्थ प्राप्त होतो? पंधराशे रुपयाची भेट तिच्या खात्यात जमा करा आणि तिच्या स्त्रीत्वाचे, स्वाभिमानाचे, अस्तित्वाचे धिंडवडे पहात रहा.
परवाच मी माझी मदतनीस कविता हिला सहज विचारलं, “ का गं ! तू *लाडकी बहीण* योजनेत तुझं नाव नोंदवलंस की नाही?” तेव्हा तिने ताठ मानेने डोळे रोखून माझ्याकडे पाहिलं आणि ती म्हणाली, ” ताई मला दान नको मला मान हवा. “
घरोघरी ती काम करते, चार पैसे कमावते. मुलाच्या शिक्षणाचे स्वप्न पाहते आणि दारुड्या नवऱ्याचा रोज मार खाते. रस्त्यातून चालत येताना तिला असंख्य विकारी नजरा झेलाव्या लागतात तेव्हा कुठे जातो हा लाडक्या बहिणीचा भाऊ आणि त्याच्या मनगटावर असंख्य भगिनींनी रक्षाबंधनाच्या दिवशी बांधलेले ते धागे?
ओवाळणीच्या ताटात दिलेल्या भाऊबीजेतून बहिणीला हवा असतो विश्वास. भेटीत केवळ काहीतरी दिल्याचा भाव नको. राखला जावा तिचा मान, जपली जावी तिची सक्षमता, तिचा जगण्याचा अधिकार, तिची आत्मनिर्भरता.
महिला सक्षमतेच्या विविध कायद्यांची अंमलबजावणी आणि कायद्याचे ज्ञानदान तिला मिळावे. वडिलोपार्जित मालमत्तेतला तिचा हक्क तिला सन्मानाने मिळावा. तिच्या स्त्रीधनाची बूज राखली जावी. एका ओवाळणीने तिला लाचार किंवा उपकृत करुन एक प्रकारच्या अदृश्य दास्यात बांधण्यापेक्षा तिच्यासाठी सन्मानाची दालनं खुली करून द्या.. जिथे नसतील हिंसा, मानहानी, निर्भत्सना, अत्याचार, तिच्या देहाची केलेली लक्तरे, तिच्या जन्माची झालेली हेळसांड. तिथे फक्त असावी मानाच्या सुमनांची शुद्ध मोकळी उधळण.
.. अपेक्षा ही आहे.. नुसत्या दानाची नव्हे.. तर सन्मानाची.
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈