सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 14 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆

सौ.अंजली गोखले 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

इतक्या वर्षाच्या घोर तपश्चर्ये नंतर आणि अथक प्रयत्ना नंतर मी ज्या सोनेरी क्षणांची वाट पहात होते, तो क्षण समोर येऊन ठेपला. मी भरत नाट्य म् या अवघड नृत्य प्रकारामध्ये एम ए. ही पदवी मिळवून मास्टरी केली. तो क्षण मी, आई-बाबा, घरातील सर्व, ताई, गोखले काकू, श्रद्धा, माझ्या मैत्रिणी सगळ्या साठीच अविस्मरणीय होता.

एम ए. पदवी प्राप्त केल्यामुळे माझी आणि माझ्या व्यक्तिमत्वाची ओळखच पूर्णपणे बदलून गेली. कदाचित या परिस्थिती मध्ये मी घरातल्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात बसून राहिले असते. आई-बाबां साठी कायमची चिंता बनून राहिली असते. पण त्यावर मात करून मी हे मोठे यश प्राप्त केले होते.

अनेक शाळांमधून, महिला मंडळांमधून, रोटरॅक्ट क्लब, लायन्स क्लब मधून मला नृत्याचे कार्यक्रम करण्यासाठी आमंत्रणे येऊ लागली समाजामध्ये माझी ओळख अंध शिल्पा अशी न रहाता, नृत्यांगना शिल्पा म्हणून झाली. एक चांगला कलाकार म्हणून मला ओळखले जाऊ लागले. मीही माझे भाग्य समजते की माझ्या वाट्याला कलाकाराचे आयुष्य आले.

सतत कार्यक्रम, त्यासाठी ड्रेसअप होणे, मेकअप करणे, हेअर स्टाईल करणे, दागदागिने घालणे, पायात घुंगरू, कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचणे यामध्ये माझा वेळ आनंदात जात होता. घुंगरां च्या छुन छुन गोड गोड नादाने माझ्या जीवनात अनोखे संगीत निर्माण केले होते. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट, त्यांचे अभिप्राय, रंगमंचावरून खाली उतरताना पासून त्यांची पाठीवर पडलेली कौतुकाची थाप, त्यांनी हसत मुखाने केलेले हस्तांदोलन या मुळे मी हर्षून जात होते. माझ्या जीवनाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली होती. माझे हे कौतुक बघून आई बाबांच्या चेहर्‍यावरील आनंद आणि समाधान मला जाणवत होते.

भरत नाट्यम् मध्ये एम.ए होणं हे ताई आणि माझ्यासाठी तपश्चर्येचा प्रदीर्घ काल होता. प्रवास होता. त्याचा परिपाक म्हणून त्याला पदवीच्या रुपात एक छान, गोंडस फळ आलं होतं. त्या आनंदा प्रित्यर्थ्य आईबाबांनी एक कौटुंबिक समारंभ करायचं ठरवलं. तो दिवस माझ्यासाठी न भूतो न भविष्यति असा होता. या कार्यक्रमामध्ये आपटे कुटुंबीय, आमचे सर्व कुटुंबीय, सुपरिचित या सर्वांना आमंत्रित केले होते. त्यांच्या समोर मी माझी कलाही सादर केली. सगळे जणं नृत्यामध्ये रमून गेले.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments