सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ सिग्नलला भेटलेली कविता !… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

तिन्ही सांजची वेळ… हवेतला उष्मा बराच नरम झाला होता. रस्ताही कधी नव्हे तो निवांत वाटत होता. ना वाहनांची फारशी वर्दळ, ना माणसांची… उन्हाच्या दिवसभराच्या तडाख्यानंतरचा हा हलकासा माहोल खरंतर दिलासा देणारा असाच होता. कधी गाडीच्या खिडकीतून बाहेर कटाक्ष टाकत, तर कधी हातातल्या कवितेच्या पुस्तकातल्या ओळींकडे पाहत माझा प्रवास चालला होता. बाहेरचा प्रवास आणि आतला प्रवास दोघंही बरोबर विरुद्ध दिशेने जात होते त्यामुळे मन काहीसं अस्वस्थ होतं. कवितेतल्या कडव्यांवरून नुसतीच नजर फिरत होती. ना अर्थ पोहोचत होता, ना लय गवसत होती. 

थोडा वेळ डोळे बंद करून मी आतल्या प्रवासाकडे लक्ष द्यायचं ठरवलं. शेजारी बसलेला नवरा मध्येच मला बोलतं करण्याचा प्रयत्न करत होता. पण मला त्याच्या बोलण्यालाही नीट प्रतिसाद देता येत नव्हता. वास्तव-कल्पना यांच्यामध्ये तोल सांभाळणारा लंबक आज जरा भरकटलाच होता. कारण सारं काही यंत्रवत, रुटीनसारखं वाटत होतं. मनाला स्पर्श होणारं, भावणारं, नवं निर्मितीला चालना देणारं असं काही भवतालात घडतंय असं वाटत नव्हतं. लिहायचं तर होतं पण शब्द मध्येच कुठेतरी रुसून बसले होते. काय करावं? 

पुन्हा डोळे उघडले. कवितेच्या ओळींवर नजर फिरवली आणि मनातल्या मनात घोकत पुन्हा डोळे मिटले. असाच थोडा वेळ गेला. अचानक कर्कश्श आवाज यायला लागले. म्हणून डोळे उघडून पाहिलं तर आमची गाडी सिग्नलला थांबली होती. आजूबाजूच्या वातावरणात काहीतरी बदल झाल्यासारखं वाटलं. टिश्यू पेपर विक्रेते, खेळणी विक्रेते, फळवाले, फुलवाले या साऱ्यांना जणू ग्रीन सिग्नल मिळाला होता. जणू त्यांचं थांबलेलं जग सुरू झालं होतं. 

उत्सुकतेनं माझ्या औदासिन्यावर मात केली. मी आजूबाजूला पाहू लागले. इतक्यात रस्त्याच्याकडेला पण मधोमध फुलं घेऊन विकणाऱ्या एका बाईने माझं लक्ष वेधून घेतलं. कमाल सौंदर्य होतं ते… सावळा रंग, अंगावर साधी पण कसंलतरी फुलांचं डिझाईन असलेली साडी,  त्याला अजिबात सूट न होणारा वेगळ्याच रंगाचा ब्लाऊज. चेहरा अगदी चंद्रासारखा गोल, विलक्षण बोलके रेखीव टपोरे डोळे, सरळ टोकदार नाक, त्याला अगदी प्रमाणबद्ध अशी जिवणी आणि मुख्य म्हणजे अत्यंत प्रसन्न, आनंदी चेहरा. रस्त्यावरतीच उभं असलेल्या एकाशी ती बोलत होती. काय बोलत होती हे माहित नाही पण बोलताना तिचा चेहरा प्रसन्न होता. तिच्या पुढ्यात असलेल्या टोपल्यातल्या फुलां इतकीच टवटवीत दिसत होती. बोलता-बोलता तिने मान खाली केली आणि टोपलीतली फुलं काढून आपल्या हातात धरली. तेव्हा तिच्या जाडजूड आणि काळ्याभोर अंबाड्याकडे माझं लक्ष गेलं. त्यावरती तिनं दोन-तीन गजरे मस्त गोलाकार फिरवून माळले होते. सावळ्या हातात अलगद धरलेल्या त्या रंगीबेरंगी फुलांकडे पाहू की तिच्या चेहऱ्याकडे असं मला प्रश्न पडला. फुलवालीला एकूणच नीटनेटकेपणाची आवड होती असं जाणवत होतं.  नक्की काय जास्त सुंदर आहे? असा विचार करत तिचा फोटो टिपावा म्हणून मी माझा मोबाईल काढायला पर्स उघडली… 

इतक्यात एक कोवळा आवाज आला. ‘ताई गजरा घ्या ना मोगऱ्याचा आहे पन्नासला पाच.’ नकळत मी वळून पाहिलं तर एक सात-आठ वर्षाचा मुलगा हातात गजरे घेऊन आमच्या कारच्या खिडकीशी उभा होता. मी नकळतच त्याला नाही म्हटलं. तसं त्याचा चेहरा जरा पडला. ‘निदान एक तरी घ्या’ असं तो म्हणू लागला. तेव्हा मात्र माझं त्याच्या चेहऱ्याकडे व्यवस्थित लक्ष गेलं आणि एकदम चमकायला झालं. फुल विकणाऱ्या त्या बाईचाच तो मुलगा होता हे त्याचा तोंडावळा सांगत होता. त्याचे साधे कपडे, पण नीटनेटकेपणा, चेहऱ्यावरचे शांत भाव, विलक्षण बोलके डोळे… हे सगळं अतिशय सात्विक, निरागस होतं.  

‘घ्या ना ताई एक तरी’ तो पुन्हा म्हणाला. यावेळी त्याच्या डोळ्यात आर्जव दिसलं… ज्या प्रकारे त्यानं गजऱ्यांना हातात जपून धरलं होतं त्यात निरागसता आणि त्या फुलांविषयीची त्याची आपुलकी दिसली. माझ्या मनात आता द्वंद्व सुरू झालं घ्यावं की?? नं घ्यावं?? शेजारी बसलेल्या नवऱ्याने ते अचूक ओळखलं. “अगं घे एखादा तरी, तो एवढं म्हणतोय तर…” तो असं म्हणता क्षणी त्या मुलाचा चेहरा क्षणात आनंदाने चमकला. आणि ते पाहून काय झालं ते मला कळलं नाही मी पटकन म्हटलं, “एक नको मला पन्नासचेच दे!” हे म्हणताच क्षणी तर त्याचा चेहरा आनंदाने फुलून आला होता. मग मी त्याला विचारलं, ‘सुट्टे पैसे आहेत का रे बाळा?’ तेव्हा त्यांनं निराशेनं नाही अशी मान डोलावली. मी म्हणलं, “हरकत नाही थांब! माझ्याकडे असतील मी शोधते.” आता त्याला परत नाराज करणं हे मलाच बरोबर वाटत नव्हतं. मग आम्ही दोघेही आपापल्याकडच्या पैशांमध्ये सुट्टे पैसे शोधू लागलो. नवरा म्हणाला, “सिग्नल संपत आलाय लवकर आटप… ” तो मुलगाही थोडासा बैचेन झाल्यासारखा वाटला. घाई गडबडीत हाताला लागतील ती तीन-चार नाणी गोळा केली आणि त्याच्या हातात पटकन सोपवली. “किती झाले रे?” अंधार पडत असल्यामुळे मला पटकन लक्षात आलं नाही. तो म्हणाला, “पस्तीस रुपये झालेत ताई, अजून पंधरा हवेत.” गडबडीने मग दोघांनी मिळून उरलेले पंधरा रुपये कसेबसे त्याच्या हातात दिले. तोवर सिग्नल सुटला होता. 

गाड्या हळूहळू हॉर्न वाजवत आमच्या पुढून जायला लागल्या होत्या. ‘सांभाळून जा रे बाळा’ असं मी मागं वळून त्याला म्हणत होते. तेव्हा त्याचा फुललेला, आनंदी झालेला चेहरा मला खूप समाधान देऊन गेला. मला वाटलं आता हे पैसे जेव्हा तो त्याच्या आईला देईल तेव्हा तिचा आधीच प्रसन्न आणि आनंदी असलेला चेहरा आणखीन आनंदाने फुलून येईल.  मग दोन चालती बोलती सुगंधी झाडं आनंदाने डवरलेली मला डोळ्यांपुढं दिसू लागली. मघाचची उदासीनता कुठल्या कुठे पळून गेली. सहज वर आकाशात बघितलं तर तिथेही बिनवासाची पण चमचमणारी फुलं हळूहळू उमलत होती. एकदा त्यांच्याकडे पहात आणि एकदा हातातल्या गजऱ्यांचा वास घेत माझा पुढचा प्रवास सुरू झाला. आता कवितेच्या पुस्तकात डोकावण्याची गरज नव्हती कारण सिग्नललाच मला एक जिवंत कविता भेटली होती. 

खरंच काही साध्या घटना किती निरागस आनंद सहजपणे देऊन जातात ना! 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments