सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर
मनमंजुषेतून
☆ – साधुसंत येती घरा… – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆
पद्मभूषण सुमित्राताई महाजन यांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त अनेकोत्तम शुभेच्छा
(आदरणीय सुमित्राताई माझ्या शिवाजी पार्कच्या घरी प्रथम आल्यावेळी, आनंदाचं शिंपण करून गेल्या, त्यावेळची माझी भावना…)
पुण्यश्लोक अहल्याबाई होळकरांचा वारसा चालवणारी, त्यांची परंपरा जागवणारी आणि स्वतःही ती जगणारी; माझ्या नि अनेकींच्या आयुष्यातली – स्वाभिमानाने, व्रतस्थपणे कसं जगावं हे शिकवणारी, एक आदर्श, सोज्वळ, तेजस्वी, कर्तृत्ववान स्त्री….. ज्यांचं भाषण म्हणजे सदैव रंगलेली मैफल ! भारतातील राजकारणाचा, झाशीच्या राणीसारखा कणखर, करारी तरीही मृदु मुलायम आवाज….. लोकसभेच्या ‘स्पीकर’…. म्हणजेच ज्या आवाजाने भल्याभल्यांना “कृपया शांति रखिए…” असं म्हणत गप्प केलंय ! आणि जो हळवा, कोमल, आर्जवी आवाज, ज्यांच्यावर भारतरत्न आदरणीय अटलजींनी, मुलीप्रमाणे प्रेमाचा वर्षाव केला, ज्यांचा सहवास नेहमीच हवाहवासा वाटतो, अशा सर्वांच्याच ताई….. आज माझ्या घरी येऊन आनंदाचं शिंपण करून गेल्या… ज्यांच्या जिव्हेवर सरस्वती वसली आहे, त्याचं प्रतिरूप म्हणजेच सुमित्राताई! यामुळेच मी ताईंना सुप्रसिध्द शिल्पकार आनंद देवधरांकडे घडलेली सरस्वतीची प्रसन्न आणि सुंदर मूर्ती भेट दिली!
“ताई, तुम्ही माझ्या घरी स्मिताकाकूबरोबर प्रेमाने आलात, मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि प्रत्येक गोष्टीचा मनसोक्त आस्वाद घेतलात, याचा मला खूप आनंद आणि अभिमान वाटतोय, जो शब्दांत वर्णन करणं शक्यच नाही. म्हणून म्हणावसं वाटतं,
“साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा!”
© सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈