डॉ. शैलजा करोडे
मनमंजुषेतून
☆ डिटॅचमेंट… भाग – 1 ☆ डॉ. शैलजा करोडे ☆
रोजचाच दिवस, रोजचीच सकाळ, तीच धावपळ, तोच दिनक्रम . पण माझ्यासाठी आजचा दिवस वेगळाच होता . अडोतीस वर्षांपूर्वीही तो दिवस खास होता . पण तो माझ्या आयुष्यातील एका नव्या पर्वाचा आरंभ होता .जीवनाची खर्या अर्थानं सुरूवात होती ..माझ्या शिक्षणाचं , मी केलेल्या कष्टांचं जणू ते फळ होतं . रोज उठून रोजगाराच्या जाहिराती पाहणं , अर्ज करणं व प्रतिसादाची वाट पाहाणं हा प्रवास आजच्या दिवशी संपला होता . अर्ज , लेखी परीक्षा नंतरचे मुलाखतीचे सोपस्कर आटोपल्यावर आजच्या दिवशी अडोतीस वर्षापूर्वी बँकिंग सर्व्हीस रिक्रूटमेंट बोर्डाकडून ( BSRB ) मला अपाइंटमेंट लेटर मिळून एका राष्ट्रीयकृत बँकेत मला हजर व्हायचे होते
स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आनंद काही वेगळाचं असतो , तो आनंद मला मिळाला होता .बँकेत लेटर घेऊन जाणे , अधिकार्यांनी सगळ्या पूर्तता झाल्यावर कामावर रूजू करवून घेऊन मला काम सोपविणे , सगळं अद्भूत होतं माझ्यासाठी . आणि आज इतकी वर्षे इमाने इतबारे सर्व्हिस केल्यावर सेवानिवृत्तीचा दिवस आला होता .
इतकी वर्षे या इन्स्टिस्टूटशी जोडलेली मी डिटॅच होणार होते .
आज रोजच्याप्रमाणे मी आॅफीसला जायला निघाले पण मनात एक वेगळीच हुरहुर होती . उद्यापासून हा दिनक्रम थांबणार होता . रोज घड्याळाच्या तालावर नाचणार्या मला एकदम रितेपण जाणवणार होतं .दिवसातील दहा दहा तास कामाच्या चक्रात फिरणारी मी आता या वेळेत काय करणार , या वेळेचं नियोजन कसं करणार .? या प्रश्नांनी वेढली होते .
“मॅडम आता कोठे घेऊ गाडी, मला रस्ता सांगा ” मी तंद्रीतून बाहेर आले . “उजवीकडे घ्या ” . रोज नवनवीन आव्हानांना सामोरी जाणारी मी , आजही नवीन आव्हान समोर आलं . आँटोरिक्षा , टॅक्सीवाल्याँचा आज संप होता . बँकेत वेळेवर पोहोचणं , डे बेगीन करणं , कॅश व सुरक्षा जमा कक्ष उघडणं , वेळेवर होणं गरजेचं होतं . रस्त्यावरून जाणार्या एका फोर व्हीलरला थांबवून त्या व्यक्तिला मी विनंती केली व त्याने मला इच्छितस्थळी पोहोचविले .
सेवानिवृत्ती नंतर मनसोक्त झोपायचं , आरामात उठायचं , वर्तमान पेपर वाचतांना चहाचा एकएक घोट घ्यायचा . आरामात आंघोळीला जायचं . किती किती छोटी स्वप्न असतात आपली नाही का ?. पण रोजच्या धावपळीत , दगदगीत ती सुद्धा पूर्ण होत नाही . सेवानिवृत्तीनंतर आपण हे सगळं करूया , मी मनाशी खूणगांठ बांधलेली .आज ती वेळ आली होती , पण हे काय ? पक्ष्यांच्या चिवचिवाटासोबत मी पण उठून बसले , ते ही नेहमीपेक्षा लवकर . वर्तुळात फिरण्याची इतक्या वर्षांची सवय. हातही भराभर कामे करू लागलीत .स्वयंपाक आटोपला आणि सवयीने डबा भरायला घेतला , ” अगं काय करतेस ? डबा काय भरतेस ? रिटायर झालीस ना तू काल ” यांच्या बोलण्याने मी भानावर आले . डब्यातलं अन्न पुन्हा पातेल्यांमध्ये काढलं . ” इतकी वर्ष सोबत निभावलीस . माझ्यासोबत तू ही रिटायर झालास . तू ही अलिप्त झालास . डिटॅच झालास ” मी हातातील डबा न्याहाळत होते .डबा सिंकमध्ये ठेवला आणि मी गॅलरीत आले .तुळशी चांगली बहरली होती . असं निवांतपणे मी तुळशीला कधी न्याहाळलंच नव्हतं . तुळशीने मंजिर्या खूप धरल्या होत्या . ” मंजिरी वाढली म्हणजे तुळशीचं लाईफ कमी होतं . म्हणून मंजिर्या वरचेवर खुडाव्यात , तुळशी पुन्हा बहरायला मदत होते ” आईचे बोल आठवले व मी तुळशीच्या मंजिर्या खुडू लागले .देवघरात जाऊन श्रीकृष्णाच्या मूर्तीवर मंजिर्या वाहिल्या .
दुपारचा एक वाजला आणि आॅफीसमधील लंचब्रेक मला आठवला .आज मला हे काय होतंय .? सेवानिवृत्तीपूर्वी माझी तीन महिने शिल्लक असलेली रजा मी एंजाॅय करत होते , तेव्हा मला अशी हुरहुर कधीच वाटली नाही . हो त्याला कारणंही तसंच होतं म्हणा , मी अजून त्यांच्याशी जोडलेली होते .
हा काय पहिला बदल होता का आयुष्यातला ? नाही ना . प्रत्येक वेळी जुळवलंच ना आपण . प्राथमिक शिक्षण झालं आणि हायस्कूलला प्रवेश घेतला . जुनी शाळा , मैत्रिणी , शिक्षकवर्ग सगळ्यांचा निरोप घेतांना डोळ्यात अश्रूंनी दाटी केलेली .आम्ही मैत्रिणी एकमेकींना भेटवस्तू देत , पुनःपुन्हा भेटीचं आश्वासन देत डिटॅच झालो .पण नवीन शाळा , नवीन मैत्रिणी आणि पुढे शिकण्याची जिद्द , यांनी नवऊर्जा दिलीच की .
हाच परीपाठ हायस्कूल सोडतांना , पुढे महाविद्यालय सोडतांना , मनाला हुरहुर लावणारा घडत गेला . एकीकडे डिटॅच होतांना दुसरीकडे अँटचही होत गेलेलो आम्ही . पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काही ना काही शिकत होतो . नवी उमेद , नवी आशा आणि जुन्याने दिलेल्या असंख्य आठवणींचा खजिना सोबतीला घेऊन मार्गक्रमण होतंच राहिलं .
आठवणींच्या या चलचित्रात मला आठवलं माझं सगळ्यात मोठं डिटॅचमेंट . माझं लग्न . ज्या घरात माझा जन्म झाला , मी लहानाची शहाणी झाले . आई वडिलांच्या छायेत वावरले , भावंडांच्या सोबतीने खेळले , कधी भांडले , रूसवे फुगवे धरले , यांना सगळ्यांना सोडून नव्या घरी , नवीन माणसांसोबत राहाणं , तेथील रितीरिवाज , घरातील प्रत्येकांचे स्वभावदोष जाणून त्यांच्याशी जुळवून घेत , त्यांची मर्जी राखणं , सासूचा तोरा , दीर जावांचा हेवादावा ,नणंदेचे टोमणे सहन करत संसारगाडी हाकायची , अजबच होतं . माहेर सुटलं , अगदी ”
— क्रमशः भाग पहिला
© डॉ. शैलजा करोडे
नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391
ईमेल – [email protected]