सुश्री नीता कुलकर्णी
☆ “आनंद…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
दोघी बहिणी तीन दिवसांच्या ट्रीपला निघाल्या.
पहिला दिवस मजेत …आता उद्या सकाळी नऊला निघायचे आहे .टूर लीडरने सांगितले.
दोघी रूमवर आल्या फ्रेश झाल्या
” उद्याचा ड्रेस काढून ठेवते ” धाकटी म्हणाली.
“थांब एक गंमत दाखवते…. उद्या आपण हे घालायचं आहे…”
“काय ग..”
“हे घे…” .. धाकटीने घडी उलगडली. आणि बघतच राहिली…
ते फ्रॉक सारखं होतं…. पण त्याचा घेर मोठा होता.
“नविन वेगळच दिसतय ..काय म्हणतात ग “
“अग दुकानदारानी काहीतरी नाव सांगितलं बाई..पण मी गेले विसरून आपण पूर्वी फ्रॉक घालायचो त्याच्यासारखंच आहे ना हे…”
“हो ग किती छान आहे ग…”
धाकटीने लगेच घालून बघितला .. ती सुखावलीच..
“ताई किती मस्त आहे ग… आईच्या फ्रॉकचीच आठवण आली उंची जरा जास्त आहे आणि घेरही मोठा आहे एवढाच फरक पण किती कम्फर्टेबल आहे..”
त्याचा गुलाबी रंग एम्ब्रॉयडरी लेस… धाकटी हरखुनच गेली.
“अग ताई याला एक खिसा हवा होता.अजून मज्जा आली असती”
“आवळे चिंचा ठेवायला?”
…. दोघी मनमुराद हसल्या….
“अगं दुकानात हे बघितलं आणि आईची आठवण आली.
ती कापड आणून साधे फ्रॉक शिवायची दोघींचे एकसारखे. फॅशन काही नाही..
शाळेत अकरावीत साडी कंपल्सरी मग आजीने फ्रॉक घालूच दिला नाही
तेव्हा तिची ती मतं….”
“तू गप्प बसायचीस पण मला राग यायचा. किती बावळट होतो अस आता वाटतं”
“जाऊ दे ..आपलं ठरलं आहे ना…. मागचं काढून उगीच गळे काढून रडायचं नाही..आनंदानी पुढे चालायचं …. म्हणून दुकानात हे दिसलं आवडलं की घेतलं…. .. “समजूतदार शहाणी ताई धाकटीला सांगत होती…
दोघी सकाळी ते फ्रॉकसारखं घालून तयार झाल्या….. मैत्रिणी बघायलाच लागल्या..
“ए किती मस्त आहे ग….. कुठून घेतलं.?….. काय म्हणतात..?”
सगळ्यांना तो प्रकार आवडला.
“ए मला पण आवडेल हे घालायला “
दुकानदाराला दाखवायला तीनी फोटोही काढला..
फ्रॉकचा विषय निघाला आणि एकेकीचं मन उलगडायला लागलं…….
“नहाण आलं आणि माझा तर फ्रॉक बंदच झाला.”
“माझ्या आईकडे फॅशन मेकर होतं ती वेगवेगळे डिझाईनचे फ्रॉक शिवायची..”
“माझी मावशी मुंबईला रहायची तिथुन नविन फॅशनचे आणायची”
“एकदा फ्रॉक ची उंची कमी झाली होती ….तर बाबा आईला खूप रागावले होते..”
“माझा लाल लेस वाला फ्रॉक मला फार आवडायचा..”
“मला कायम मोठ्या बहिणीचा जुना मिळायचा….”
….. प्रत्येकीकडे फ्रॉकची एक तरी आठवण होतीच..
खरंतर फ्रॉक एक निमित्त होतं आईची आठवण सुखावत होती…
लहानपणी तिच्याभोवतीच तर सगळं जग होत….हो की नाही…
तुम्हाला आली का तुमच्या फ्रॉकची आठवण…..
मैत्रिणींनो आता आपली छान गट्टी जमली आहे ना….
मग एक सांगते ते ऐका..
जे घालावं असं वाटतंय ते खुशाल घाला….
कोण काय म्हणेल ?
कोणाला काय वाटेल…
याचा विचार करू नका .
कोणी इतकं तुमच्याकडे निरखून बघत नसतं….
कोणी आणून देईल याची पण वाट बघू नका..
तुम्हीच जा आणि घेऊन या..
….. आनंदाची परिस्थिती आपली आपणच निर्माण करायची असते हे लक्षात ठेवा…
“काय म्हणतेस तूच धाकटी आहेस
अगं मग ताई साठी तूच घेऊन ये…..”
मजेत आनंदात राहा…
तुमचा नवीन ड्रेस घालून काढलेला फोटो मला जरूर पाठवा
वाट बघते….
सुखाची गुरुकिल्ली आपल्याच हातात असते…
ती कशी कुठे लावायची हे समजले की आयुष्यच बदलते..
….. ती किल्ली अजून कुठे कुठे लावता येईल याचाही विचार करा….
हेच तर तुम्हाला सांगायचं होतं…… मैत्रिणींनो मजेत राहा…
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈