श्री सुनील शिरवाडकर
☆ बापू … ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
आज बापू पुन्हा दिसला. त्याच गल्लीतून बाहेर पडत होता. मागच्या आठवड्यात मी या भागातुन चाललो होतो. टु व्हिलरवरून. तेव्हा तो दिसला. पण मी घाईत होतो. त्यामुळे थांबू शकलो नाही. आज पुन्हा इकडे या भागात आलो..पुन्हा बापू दिसला.. हो तो बापूच होता.कितीतरी वर्षांनी दिसला होता.
मलाही वेळ होता.एकदम त्याच्या पुढ्यातच गाडी थांबवली. बापू दचकला.. माझ्याकडे जरा रागानेच त्यानं पाहीलं..पण मग मला ओळखल्यावर एकदम दिलखुलास हसला.काही बदल नव्हता त्याच्या त्या हसण्यात..आणि दिसण्यातही.गोरटेलासा..उंचीने जरा कमी..कुरळे केस..
बापूचं हे असं हसणंच मला खूप आवडायचं.आम्ही दोघे शाळकरी मित्र.दोन वर्ष तर एकाच बाकावर बसायचो.त्याची माझी मैत्री खुप पटकन जमली.
“काय बापू ..इकडे कुठे?”
मी विचारले.
“अरे,कांता किती वर्षांनी भेटतो आहेस..”
“हो ना.मागच्या आठवड्यात पण मी तुला पाहीलं.याच गल्लीतुन येताना. इकडे काय कोण रहातं का?”
“नाही रे..इकडे एक उदबत्तीचा कारखाना आहे. मी तिथेच नोकरी करतो.”
बापू ही अशी नोकरी करतो याचा मला जरा धक्काच बसला. कारण बापुची खुप मोठी स्वप्नं होती.बापुचे वडील पेपर विकायचे.पहाटे उठून पेपरचे गठ्ठे आणायचे.. घरोघर ते टाकायचे.आणि मग त्यांच्या घराच्या पुढे एक टेबलवर स्टॉल लावायचे.मी कधी शाळेत जातांना बापुला बोलवायला जायचो.बापु तिथेच स्टॉलवर बसलेला असायचा. एका खुर्चीवर. एक लोखंडी घडीची खुर्ची. निळ्या रंगाची. बापु त्यावर मोठ्या ऐटीत बसायचा.एखाद्या बादशहा सारखा. एक पाय खाली सोडलेला,आणि दुसरा पाय त्यावर आडवा..सतत हलणारा….. मला त्याची ही पोज खुप आवडायची.
मी आलो की बापू उठायचा.आत घराकडे बघुन त्याच्या वडिलांना हाक मारायचा. ते आले की बाजुला ठेवलेलं दफ्तर उचलायचा.आणि मग आम्ही शाळेकडे जायचो.
त्या लोखंडी घडीच्या खुर्चीत बसुन बापु स्वप्नं रंगवायचा.त्याला मोठं झाल्यावर डॉक्टर बनायचं होतं.आपला एकदम पॉश दवाखाना असेल..मोठ्ठं टेबल..आणि त्यामागे आपली खुर्ची. गोल गोल फिरणारी..खाली छोटे चाकं असणारी.
कधी त्याला वाटायचं..आपण बँकेतला साहेब व्हावं..आपल्याला छानसं केबिन असेल..बाहेर दरवाज्यावर नावाची पाटी असेल.. आणि आपल्या साठी खास खुर्ची.. अशीच.. गोल गोल फिरणारी.
वेळोवेळी त्याची स्वप्नं बदलायची.. पण एक गोष्ट मात्र कॉमन.. ती त्याची खुर्ची.
शाळा सोडल्यानंतर बापु आज प्रथमच भेटत होता.मधली बारा पंधरा वर्षं कशी झरकन गेली होती.त्याला पाहीले..अन् मला हे सगळं आठवलं.बापुच्या त्या डॉक्टर बनण्याच्या स्वप्नांचं..मोठा अधिकारी बनण्याच्या स्वप्नाचं पुढं काय झालं ते मी विचारुच शकलो नाही.त्याच्या एकंदरीत अवसानावरुन.. त्याच्या नोकरीवरून मला त्याच्या परीस्थितीचा अंदाज आला.
पण मग गप्पा मारताना त्यानेच सगळं सांगितलं.शाळा सुटली..मार्क जेमतेमच.अकरावीला कॉलेजमध्ये पण गेला.आणि अचानक त्याचे वडील वारले.घरची जबाबदारी त्याच्यावर पडली.कॉलेज सोडुन तो पेपर स्टॉलवर बसु लागला.पण त्याला त्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता.
कोणाच्या तरी ओळखीने त्याला ही नोकरी मिळाली होती.
“तु बघ कांता.. मला आता या उदबत्तीच्या धंद्याची बरीचशी माहिती झाली आहे.अजुन फारतर दोन तीन वर्षे..मग..”
“..मग..काय?” मी विचारलं.
“मीच एक उदबत्तीचा कारखाना टाकणार आहे.मुंबईहुन कच्चा माल आणायचा.. दहा बारा बायका..मुलं कामाला ठेवायची.आपण फक्त लक्ष ठेवायचं..गोल गोल फिरणाऱ्या खुर्चीत बसुन..”
गोल गोल फिरणाऱ्या खुर्चीचं वेड काही त्याच्या डोक्यातुन गेलं नव्हतं.
त्यानंतर मात्र बापुची भेट नाही.मधल्या काळात असाच एकदा रस्त्यानं जात असताना एक भंगारवाल्याची गाडी दिसली.त्यावर एक जुनी खुर्ची ठेवलेली होती.. उलटी करुन.तुटकी चाकं अशी वरती दिसत होती.ती खुर्ची बघुन मला एकदम बापुची आठवण आली.
मग एकदा वेळ काढून मी बापुकडे गेलोच.तो तिथेच रहात होता अजुन.पत्र्याच्या खोलीत.पेपर स्टॉलमागेच त्यांचं घर होतं.आता तो रस्ता खुपच रहदारीचा झाला होता.
दार वाजवलं.एका विशीच्या मुलानं दार उघडलं.बापूचा मुलगाच असावा तो.दिसायला साधारण बापुचाच तोंडावळा.
“कोण आहे रे..”
म्हणत बापु बाहेर आला.त्याचं हे असं भेटणं मला एकदमच अनपेक्षित होतं.बापु खुर्चीत बसला होता.. चाकाच्या खुर्चीत..पण..
..पण ती व्हिल चेअर होती.दोन्ही हातांनी चाकं फिरवत तो बाहेर आला.त्याचा एक पाय प्लास्टरमध्ये होता.
मला बघताच बापुला खुप आनंद झाला.बापुला भेटुन मलाही बरं वाटलं.नुकताच त्याचा एक छोटा अपघात झाला होता काही दिवसांसाठी पाय प्लास्टरमध्ये ठेवला होता.म्हणुन त्याच्या मुलानं ही खुर्ची आणली होती.
गप्पा मारताना आम्ही जरा भुतकाळात हरवलो.. आणि मला आठवलं ते बापुचं स्वप्न.
आणि मग बापुच म्हणाला..
“तुला आठवतं..माझं एक स्वप्न होतं ते? चाकाच्या खुर्चीच? ते पुर्ण झालं बघ.बसलो आहे चाकाच्या खुर्चीत.”
बापू हसला.पण त्यांचं ते हसणं कसंतरीच होतं.नेहमीचं नव्हतं.मलाच वाईट वाटलं.त्याला समजावलं.
“अरे आत्ता महिनाभरात ही खुर्ची सुटेल तुझी.चांगला हिंडायला फिरायला लागशील.”
मग आम्ही विषय बदलला त्याच्या त्या जुन्या खुर्चीची आठवण झाली.बापुनं ती अजुन जपुन ठेवली होती.बापाची आठवण म्हणुन.पोराला सांगुन त्यानं ती खुर्ची आतल्या खोलीतून मागवली.गंजली होती..पण बाकी तशीच होती.निळ्या रंगाची..पांढर्या पाईपची.थोडा रंग उडाला होता इतकंच.
मी उठून ती खुर्ची उघडली.करकर आवाज करत ती उघडली.त्यात बसलो.अगदी बापुच्याच थाटात.
“तुला सांगतो कांता..मला अजुनही वाटतं कधी कधी..माझं ते स्वप्न पुर्ण होणार आहे.चाकाच्या खुर्चीचं..गोल गोल फिरणार्या खुर्चीचं.”
बापुचं ते वाक्य ऐकुन मला बरं वाटलं.पुन्हा जुना बापु दिसला मला.त्याचं ते अधुरं स्वप्न त्याच्या मनातुन गेलं नव्हतं.अशी स्वप्न पहाण्याची क्षमता असणारी माणसं एका अर्थानं मला ग्रेट वाटतात.खरंच..बापु बदलला नव्हता.बापुचं ‘बापुपण’ हे त्याच्या ह्या स्वप्नाळू व्रुत्तीमध्ये होतं.
_____________________
बापुंचं पाठवलेलं निमंत्रण माझ्यासमोर पडलं होतं.बापुच्या मुलानं दुकान टाकलं होतं.आणि त्यांचं हे निमंत्रण होतं.
संध्याकाळी मी गेलो.बापुच्या त्या जुन्या घराशेजारीच एक नवीन बिल्डिंग झाली होती.तेथेच एका गाळ्यात बापुच्या मुलानं दुकान सुरू केलं होतं.ते एक जनरल स्टोअर होतं.छान नवीन फर्निचर.. फुलांच्या माळा…बाहेर मंडप टाकला होता.बोर्डवर लाईटस् माळा होत्या.मुलगा आत काउंटरवर होता.
आणि कडक पांढर्या सफारीतला बापु इकडुन तिकडे फिरत होता.कोण कोण येतंय.. कुणाला डिश मिळतेय की नाही यावर लक्ष देऊन होता.
मला बघताच बापु धावत आला माझा हात हातात घेतला.आणि मला घेऊन आत गेला.दुकानच्याच एका भागात एक छोटं केबीन बनवलं होतं.एक टेबल.. आणि एक खुर्ची तीच..बापुला हवी होती तशीच.बापु टेबलच्या मागे गेला.. आणि त्या खुर्चीत बसला.अतीव आनंदाने त्याने एक गोल गिरकी मारली.
“बघ..झालं की नाही माझं स्वप्न पुर्ण? मग? माझ्या पोरांनं खास माझ्यासाठी ही केबीन आणि खुर्ची बनवुन घेतलीय”
बापुला त्या खुर्चीत बसलेलं बघताना मला खुप आनंद झाला.. खुप बरं वाटलं.जसं काही माझंच स्वप्न पुर्ण झालं होतं.
बोलत बोलत आम्ही बाहेर आलो.प्रसाद घेतला,डिश घेतली.
शेजारीच त्यांचं ते जुनं घर होतं.अजुनही तसंच..पत्र्याचं.
दार नुसतंच लोटलेलं होतं.बापु आत गेला.आणि दोन खुर्च्या घेऊन बाहेर आला.मी एका खुर्चीत बसलो.बापु त्याच्या खुर्चीत बसला.तीच खुर्ची.. लहानपणापासून बघत आलो ती.पाठीमागच्या निळ्या पत्र्यावर बापुनं करकटने त्यांचं नाव कोरलेले.. शाळेत असतानाचं.त्यावरुन त्यानं बापाचा मारही खाल्लेला.
आता ती चेपली होती.जराशी डुगडुगत पण होती.बापु त्या खुर्चीत बसला होता.. तस्साच..एक पाय खाली सोडलेला.. दुसरा त्यावर आडवा..हलत रहाणारा.आणि चेहर्यावरचे भाव जग जिंकल्याचा.खर्याखुर्या
बादशहा सारखा..
.. आणि मग आमच्या गप्पा रंगतच गेल्या.
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈