☆ मनमंजुषेतून ☆ एक सीट गेली…. ☆ श्रीमती सुधा भोगले ☆
ते दिवस मार्गशीर्षातील होते. नुकतीच थंडीची चाहूल लागली होती. माझे यजमान आणि त्यांचे व्यावसायिक मित्र, महत्वाच्या कामानिमित्य पुण्याला निघाले होते. सकाळीच लवकर ते गाडीने निघाले. जाताना रात्रीपर्यंत परत येईन, असे सांगून गेले.
घरात, मी, मुले, व सासूबाई होतो. त्या दिवसभराची दैनंदिनी हळूहळू पुढे सरकत होती. संध्याकाळ झाली. पुरुषमाणसे जेवायला नसली की स्वयंपाक आवरता करता येतो. त्याप्रमाणे आमची जेवणे चट्कन आवरली. हळूहळू रात्रीने आपले पाय गडदपणाकडे पसरायला सुरवात केली. आणि डोळे त्यांच्या वाटेकडे वळू लागले. १९८९-९० साली भ्रमणध्वनीचा संचार झाला नव्हता. घरोघरी फक्त दूरध्वनी असत. त्यामुळे निरोप मिळणे दुरापास्तच होते.
वाट पाहतापाहता आम्ही निद्राधीन झालो.
सकाळी चहापाणी आवरून, मी परदेशस्थ नणंदेला पत्र लिहायला बसले होते. घड्याळात सकाळचे सात वाजायला आले होते. तेवढ्यात दारावरची घंटा वाजली. मला वाटले यजमानच आले असतील, मुलाने दर उघडले, तर आमचे कार्यालयातील दोन माणसे, कसनुसे चेहरे घेऊन उभी होती. मी विचारले, ”सकाळी, सकाळी, काय काम आहे?”ते जरा घाबरलेलेच वाटत होते. त्यामुळे काहीतरी विपरीत तर घडले नाहीना, अशी शंका मनाला चाटून गेली. मग मी त्यांचेशी खोलात जाऊन बोलू लागल्यावर, त्यांनी माझे यजमान रात्री अपघातात सापडल्याचे सांगितले. पुन्हा पुन्हा, यजमान सुरक्षित असल्याची व किरकोळच लागल्याची ते ग्वाही देत होते. कऱ्हाडला कृष्णा हॉस्पिटलला त्यांना एडमिटकेल्याचे सांगितले. मला न्यायला गाडी येईल, व कार्यालयाच्या शेजारी राहत असलेल्या मावशी माझ्याबरोबर सोबत येणार असल्याचे सांगितले. मी जायची जुजबी तयारी केली. मनात काळजी, आणि असंख्य प्रश्न उभे राहत होते. नुकताच कऱ्हाडला त्याच रस्त्यावर, अशाच खाजगी गाडीच्या अपघातात शहरातला एक व्यावसायिक दगावला होता.
ते सर्व मनात आले. अंगावर सरसरून काटा उभा राहिला. सर्व आवरून जायला निघालो.
ती रात्रीची वेळ होती. त्या काळात चौपदरी मार्ग झालेला न्हवता. कऱ्हाड-पेठ रस्ता दोह्नी बाजूंनी गर्द वृक्षांनी वेढलेला होता. दुपदरी रस्त्यावर, एखाद्या पुढच्या वाहनाला, मागे टाकून जाताना प्रचंड त्रास होत असे. चालवणार्याचे कसबच पणाला लागत असे. त्यात साखर कारखान्याला उस पुरवणार्या ट्रॅक्टर ट्राॅलीची वाहतूक ही चालू असण्याचा तो हंगाम होता काही वेळेस बंद पडलेला ट्रॅक्टर, ट्राॅली मागे सोडून निघूनही जाई. त्या ट्राॅलीला मागे कोणतीही लाल खुण, किंवा दिवा नसे. येणार्या वाहनाला अचानक जवळ गेल्यावरच हि ट्राॅली दिसू शके.
त्या दिवशी माझे यजमान व त्यांचे मित्र पुण्याहून उशिरा निघाल्यावर, साताऱ्यात ते जेवायला थांबले जेवण झाल्यावर ते मार्गस्थ होण्यासाठी निघाले. पुण्यातून येताना मागच्या आसनावर बसलेल्या माझ्या यजमानांना, त्यांचे मित्र म्हणाले ‘भोगले साहेब, तुम्ही पुढच्या आसनावर बसा. मी मागे एकटाच बसतो, म्हणजे आरामात झोपून जाईन. त्या प्रमाणे दोघांनी, आसनांची आदलाबदल केली. गाडीचे सारथ्य तिसरे मित्र होते ते करू लागले. कऱ्हाड सोडल्यावरही प्रवास सुरक्षित चालला होता. थोडेसे अंतर कापल्यावर, एका पुढच्या वाहनाला मागे टाकून पुढे गेल्यावर, एकदम वर वर्णन केले आहे तशी उसाची ट्राॅली दृष्टीपथात आली.
त्या बरोबर सारथ्य करणाऱ्या राय सोहनींनी त्यांच्या गाडीचा वेग कमी करत गाडी शून्य वेगावर आणत ट्राॅली मागे उभी करण्याचा विचार केला. पण हाय !! विपरीत घडणारं टळणारं न्हवतं. मागून एक ट्रक वेगाने येत असलेला त्यांच्या गाडीवर मागच्या बाजूने जोरात आदळला. क्षणात गाडीचा मागचा भाग चेपाटला जाऊन पुढच्या आसनांना टेकला. सारथ्य करणारे राय सोहनी व माझ्या यजमानांना जोरात दणका बसून ते पुढच्या गाडीच्या भागावर आदळले.
थोडा वेळ गेल्यावर माझ्या यजमानांना गुदरलेल्या प्रसंगाची जाणीव होऊ लागली. येणारया जाणार्या गाड्यांना त्या गाडीची अवस्था बघून, त्यात कोणी जिवंत असेल असे वाटतच न्हवते माझ्या यजमानांनी धक्यातून थोडसं सावरल्यावर आपले पाय शाबूत असल्याची खात्री केली. इकडे तिकडे पाहत त्यांच्या हाताला एक तुटलेला लोखंडी लांब तुकडा लागला. तो घेऊन त्यांनी वरच्या तुटलेल्या टपावर जोरजोरात आपटायला सुरुवात केली आणि मग तो आवाज ऐकून येणारया जाणार्या वाहनांना आत कोणीतरी जिवंत असल्याची जाणीव झाली मग वाहने थांबवून लोक मदतीला धावले वाहतूक पोलिसांना पाचारण केल्यावर ते हजर झाले. जिवंत असलेल्या त्या दोघांना बाहेर काढून कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
माझ्या यजमान ज्या कामासाठी गेले होते, त्या साठी त्यांचे मित्र बाफना यांच्या बॅगेत बरीच रक्कम असल्याचे ठाऊक होते. त्यांनी मोठ्या समय सूचकतेने ती पिशवी आपल्या पोटाजवळ ठेऊन दिली. न जाणो ती रक्कम सरकार जमा झाली असती तर परत मिळवणे दुरापास्त होऊ नये. नंतर रुग्णालयात बाफनांचे भाऊबंद पोहोचल्यावर त्यांना ती पिशवी सुपूर्द केली.
आम्ही घरातून निघाल्यावर दोन तासांत रुग्णालयात पोहोचलो बाहेर काही व्यक्ती माझ्या येण्याची वाट पहात उभ्या होत्या. त्यात कर्हाडच्या किर्लोस्कर कंपनीतील, श्री. महाबळ साहेब व श्री. चिपळूणकर साहेब तेथे आलेले होते. मी उतरल्यावर त्यांनी माझ्या यजमानांची तब्येत चांगली असल्याचे सांगून मला धीर दिला. पण त्या पुढे म्हणाले, ‘एक सीट गेली. ’ ती एक सीट म्हणजे यांचे व्यावसायिक मित्र बाफना यांची होती. ज्यांनी साताऱ्याला माझ्या यजमानांना पुढे बसण्यास सांगितले होते (केवढा हा दैवदुर्विलास) पण पुढची माझ्या यजमानांची सीट शाबूत राहिली.
© श्रीमती सुधा भोगले
९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈