श्री मोहन निमोणकर
☆ “सहजतेचा आनंद विरळा…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆
काल, परवाची गोष्ट असावी, मी सकाळी सकाळी आपला भाजी मंडईत भाजी घेत होतो, एवढ्यात अचानक बालपणीचा मित्र भेटला. तीस पस्तीस वर्ष जरी झाले असले तरी चेहेरपट्टीच्या खाणा खुणा तश्याच होत्या.पुढे गळा भेट झाली, समोरच्या टपरीवर चहा पीत पीत, आठवणींच्या हिंदोळ्यावर तास दीड तास कसा गेला ? ते कळलंच नाही पण मोठा आनंद देऊन गेला हे मात्र नक्की
पुढं मित्र त्याच्या वाटेनं गेला, मी माझ्या वाटेला..
मनी विचार करू लागलो, की खरंच ही अचानक भेट किती आनंद दायी घडून आली…
खरंच आपण बऱ्याच गोष्टी ठरवून करू पाहतो, पण त्या एवढया आनंद देत नाही, जेवढ्या सहज घडून येतात.
होय आयुष्यातल्या या सहजतेचा आनंदच विरळा..
आता हेच घ्याना, आपल्या ला गाणं ऐकायचा मूड असतो
मग आपण लगेच मोबाइल मध्ये गाणी शोधतो, अवघ्या जगातील संगीत तिथं उपलब्ध असतांना, आपण मग हे लाऊ की, ते असं करता करता दहा, पंधरा मिनिटं अशी निघून जातात, गाण्याचा मूड ही जातो, मग कुठलं तरी नेहेमीच एकून कानाची तृषार्तता भागवतो….
आता जरा, आपलं बालपण आठवा, एकच रेडिओ घरी दिवसभर चालू असायचा, कधी कुठलं गाणं लागेल त्याचा ठाव नाही, पण जे लागेल ते आनंदाने ऐकायचो, हा झाला सहजतेचा आनंद…..
आता टीव्ही चं ही घ्या, आपल्या लहानपणी आठवड्यातुन शनिवारी रविवारी एखादा दुसरा सिनेमा लागायचा, पण त्या साठी आठवडा भर उत्सुकता असायची, कारण सहजता असायची, केवढा मोठा आनंद…..
आज आपल्या टी व्ही वर शेकडो सिनेमा ची चॅनेल आहेत, पण एक सिनेमा आपण धड पाहत नाही, किंवा जाहिराती त्या पाहू देत नाही, प्रचंड उपलब्धतेमुळे त्याचा आनंदच गेला….
तुमच्या आमच्या नाते संबंधाचही तेच, पूर्वी माणसं एक मेकांकडे यायची जायची, सहज एखादा पाहुणा यायचा.. चहा पाणी गप्पा टप्पा व्ह्यायच्या मनं मोकळी व्हायची
आता तशी होत नाही, मग आम्ही कृत्रिम तेचे मित्र सोशल मीडियावर शोधतो, हे असं झालं आमची भूक तिचं आहे, पण आता त्यासाठी आम्ही खरं खूर अन्न पाणी न खाता त्याची
चित्र पाहून भूक भागवण्याचा प्रयत्न करत आहोत..
लग्न समारंभात आम्ही अचानक पणे भेटतो, गाठी भेटी घेतो, याय जायचं आमंत्रण ही देतो….
अन शेवटी एक वाक्य म्हणतो……
मी तसा रिकामाच आहे…
पण येतांना, एक फोन करून या..
अन तिथंच सहजतेचा आनंद हिरावून बसतो…
आता हे झालं बाहेरचं, अगदी आपल्या घरातलं च घ्या
कुटुंबामध्ये पूर्वी संवाद साधतांना नर्म विनोदी पणा असायचं
हास्य विलाप व्हायचा, भांडणा तली कटुता त्याने दूर व्हायची. आता अहंकारापायी, मोबाईल मुळे एकमेकांशी बोलनासो झालो, मग खास हसण्यासाठी, पैसे भरून सकाळी सकाळी, हास्य क्लब ला जातो, आणि नैसर्गिक हास्य सोडून, कृत्रिम हास्य विकत घेतो, ते कितपत आनंद देणार, तास दीड तास……..
आता आपल्या खाण्या पिण्याच्या सवयी बघा केवढ्या सहज होत्या, सकाळी न्याहारीला आम्ही कधी शिळा परतलेला भात, तर कधी पोळीचा भाकरीचा तिखट चुरमा खायचो त्यानं आम्हाला कधी ‘ ऍसिडिटी ‘ झाली नाही क्वचित कधी तरी पोहे, उपमा आम्ही खायचो..असा हलका फुलका नाष्टा घ्यायचो, आता त्याचा ब्रेकफास्ट झाला.. ब्रेड बटर, आम्लेट, पिझ्झा बर्गर खातो, त्यानं वजन वाढतं. आता पुढं गम्मत पहा..
मग खास पैसे खर्चून जिम लावतो, पायी न जाता महागडी गाडी घेऊन जातो, अन मग तिथं ट्रेंड मिल वर चालू लागतो
पुढं डाएटसाठी खास कन्सल्टंट चा सल्ला हजार, दोन हजार रुपये देऊन घेतो, अन तो काय सांगतो…
सकाळी हलकं, फुलकं खा….
ही कृत्रिमता आम्ही विकत घेतो, आणि सहजता हरवून बसतो
…… म्हणून म्हणतो मित्रांनो आयुष्यातली सहजता टिकवण्याचा प्रयत्न करा, नैसर्गिकता जपा, कारण
ठरवून केलेल्या गोष्टी फारसा आनंद देणार नाहीत…
लेखक : श्री सुमंत खराडे
प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈