डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ जगात भारी…. आम्ही भिक्षेकरी…!!! – भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

“पुणेरी टोमणे मारूया… प्लास्टिकला पळवून लावूया… “

प्लास्टिकच्या वस्तू…. खास करून प्लास्टिकच्या पातळ पिशव्या यांचे विघटन होत नाही.

पुरातन काळात राक्षस नावाची संकल्पना होती, आजच्या काळात प्लास्टिकच्या पिशव्या हाच एक राक्षस आहे. विघटन न झाल्यामुळे पर्यावरणाला धोका… माणूस म्हणून आपल्यालाही अनेक वैद्यकीय – सामाजिक धोके…. आणि उकिरड्यात पडलेल्या पिशव्या निष्पाप मूक प्राण्यांच्या पोटात जातात आणि त्यांचे मृत्यू होतात.

गोहत्या थांबवण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न केले जातात; परंतु प्लास्टिक पिशव्या खाऊन ज्या गोमाता देवाघरी गेल्या, त्यांचा हिशोब कोणी ठेवला आहे का… ? 

हा विषय विविध स्तरावर सांगितला, तरी काही मूठभर लोक सोडुन इतरांना या विषयाशी काहीही घेणं देणं नाही… ! 

“भिक्षेकरी” हा असाच दुसरा ज्वलंत विषय…

भीक मागणारे मागतात आणि दोन पाच रुपये भीक देऊन, पुण्य मिळेल या भावनेने लोक भीक देतात…

… दोन पाच रुपयात पुण्य मिळतं ??? पुण्य इतकं स्वस्त असतं… ? 

अशा दोन पाच रुपये भीक देण्याने; देणारा, अप्रत्यक्षपणे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढवायला मदत करतो, भीक मागण्यासाठी आपली मुलं पळवली जातात, चांगल्या लोकांना धाक दाखवून भीक मागायला लावली जाते, यांची मुलं कधीही शाळेत जात नाहीत, मुलांचं अख्ख आयुष्य बरबाद होतं….

अजून सुद्धा खूप काही आहे… विषय मोठा आहे, तो मी माझ्या पुस्तकात सविस्तर मांडला आहे…

“भीक नका देऊ… एखाद्याला पायावर उभं राहण्यासाठी मदत करा… ” हे मी विविध स्तरावर जीव तोडून सांगितलं आहे, तरी आपल्यासारखे काही संवेदनशील लोक सोडुन इतरांना या विषयाशी काहीही घेणं देणं नाही… ! 

तर या दोन समस्यांची सांगड एकत्र कशी घालता येईल याचा विचार करत होतो… ! 

भीक मागणाऱ्या लोकांची खूप मोठी ताकद आज माझ्या मागे उभी आहे…. या सेनेचा सेनापती म्हणून कसा वापर करून घेऊ ? हा सतत विचार मी करत असतो….

रस्त्यात जाताना कितीतरी वेळा आपल्याला पाईपलाईन फुटलेली दिसते, आकाशाकडे हे पाणी उंच उसळी घेत असतं…. त्याचा फोर्स खूप जास्त असतो….. म्हणजे फुटून बाहेर पडणाऱ्या या पाण्याला सुद्धा आकाशात उंच भरारी घ्यायची आहे, त्याच्यात तितकी धम्मक आहे, परंतु योग्य वेळी योग्य साथ मिळत नाही… म्हणुन मग ते पाणी निपचितपणे गुपचूप जमिनीवर पडतं आणि शेवटी एखाद्या गटारात वाहत जातं… आणि मग गटारातलं पाणी म्हणून पुढे कधीही याचा उपयोग होत नाही…. ! 

हाच संबंध मी भीक मागणाऱ्या लोकांशीही जोडतो…

त्यांच्याकडे असणारी ताकद अशीच अफाट आहे… त्यांच्यातही खूप मोठा फोर्स आहे…. त्यांनाही आभाळात उंच भरारी घ्यायची आहे; परंतु योग्य वेळी योग्य ती साथ मिळत नाही… शेवटी थकून ते सुद्धा निपचितपणे गुपचूप जमिनीवर पडतात… पुढे एखाद्या गटारात सापडतात…. आणि मग “भिकारी”असं हिनवून, त्यांच्यावर शिक्का मारून, त्यांनाही कधीही माणसात आणलं जात नाही…. !

भीक मागणाऱ्या माझ्या लोकांमध्ये असलेल्या इतक्या मोठ्या ताकदीला, सेनापती म्हणून आवरण्यास… सांभाळण्यास… वळण लावण्यास… बऱ्याच वेळा मी कमी पडतो… बऱ्याच वेळा मला अपराधी वाटतं…. !

निसर्गाने या समाजाच्या देखभालीसाठी माझी निवड केली, परंतु मी खरंच तितका सक्षम आहे का ? या विचाराने काही वेळा मी खचून जातो…. ! 

खूप वेळा मी परिस्थिती समोर गुडघे टेकतो… खाली मान घालतो… पण खाली मान घालून सुद्धा विचारच करत असतो; की मला यांच्यासाठी अजून काय करता येईल ??? 

कित्येक लोक मला म्हणतात, ‘डॉक्टर, तुम्ही किती सुखी आहात… तुम्हाला किती सुखात झोप लागत असेल…. ‘

पण मला झोपच लागत नाही; ही वस्तुस्थिती आहे… अजून काय करता येईल ? काय करता येईल ??  काय करता येईल??? – हा इतकासा किडा रोज रात्री मला चावत असतो… मग माझी झोप उडून जाते, मी घड्याळाकडे कुस बदलत येड्यासारखा पहात राहतो…. बारा वाजतात, मग दोन वाजतात, चार वाजतात, पुढे  सहा सुद्धा वाजतात… घड्याळाचा काटा शांतपणे फिरतच असतो… तो मला चिडवत असतो… आणि हे कमी म्हणून की काय अलार्म वाजतो…. उठ रे बाबा…. ! 

उठायला मी झोपलोच कुठे आहे मित्रा…. ? पण कोणाला सांगू ? 

रात्रीच्या त्या अंधारात आम्ही दोघेच जागे असतो….

एक तो घड्याळाचा काटा आणि दुसरे माझे विचार… ! 

तो शांतपणे फिरत असतो…. आणि मी  सैरभैर… !

याच सैरभैर विचार मंथनातून, एक संकल्पना माझ्या डोक्यात परवा मध्यरात्री जन्माला आली…

मला नाही वाटत, या अगोदर संपूर्ण जगामध्ये अशी काही संकल्पना राबवली गेली असेल… !

संकल्पना सांगतो थांबा…. त्या अगोदर थोडी पार्श्वभूमी सांगावी लागेल….

मी मूळचा साताऱ्याचा, परंतु आख्ख आयुष्य पुण्यात गेलं… मग वाण नाही तर गुण लागणारच की…. ! 

माझ्या या पुण्यानं मला खूप काही दिलं…. त्याबरोबर टोमणे मारायला सुद्धा मला शिकवलं…

त्या अर्थाने “पुणेरी माणूस” माझा गुरु आहे… ! 

म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी माझ्या घरात बसून एक फूल, सर्व अस्सल पुणेरी माणसांना नेहमीच समर्पित करतो… (हो एकच फूल मिळेल… आमच्या बागेतली सर्व फुलं तुम्हाला वहायला, आम्ही काय कुठचे जहागीरदार नाही किंवा कुठल्या संस्थानचे संस्थानिक सुद्धा नाही… शिवाय तुम्ही काय आमचे जावई नाहीत किंवा व्याही सुद्धा नाहीत… तेंव्हा एक फूल घ्यायचं तर मानानं घ्या, नाहीतर तेही आम्ही परत काढून घेऊ… )

तर हा असा आहे पुणेरी टोमण्यांचा झटका… ! 

टोचत नाही…. बोचत नाही…. पण विषय हृदयापर्यंत भिडतो थेट…. !!! 

आता वर जाऊन कंसातील वरील वाक्य परत वाचा…. वाचताना मनातल्या मनात नाकातून वाचावे, म्हणजे “कोंकणी” हापूस आंब्याचा खरा स्वाद येईल….

ओके… वर जाऊन, नाकातून वाचून…. परत खाली आला असाल, तर आता संकल्पना सांगतो…

ती मात्र नाकातून वाचायची नाही…

१. तर, अशाच पुणेरी टोमण्यांचा वापर करून मी काही बोर्ड तयार करणार आहे…. ! 

“प्लास्टिक पिशव्या वापरणे सोडून द्या आणि कापडी पिशव्या आमच्याकडून घ्या…. किंमत तुम्ही ठरवाल ती…. ” अशा अर्थाचे बोर्ड तयार करून घेणार आहे, अर्थात पुणेरी स्टाईलनेच, टोमण्यांच्या स्वादासह…. ! 

२. पूर्वी भीक मागणाऱ्या लोकांना आपण नवीन शिलाई मशीन घेऊन दिली आहे अशा, सुरुवातीला किमान चार लोकांना पिशव्या शिवायला लावायच्या. त्यांना पिशव्या शिवता येईल अशा प्रकारचे कापड आपणच द्यायचे, एक पिशवी शिवल्यानंतर त्याचे पाच रुपये त्यांना द्यायचे. (दिवसातून शंभर पिशव्या त्यांनी शिवल्या तर त्यांना पाचशे रुपये मिळतील)

३. शिवलेल्या पिशव्या यानंतर पाच ते सहा भीक मागणाऱ्या इतर लोकांना देऊन; तयार केलेल्या  “पुणेरी टोमण्यांच्या पाट्या” त्यांच्या गळ्यात आणि पाठीवर अडकवायच्या….

हो – आम्ही टोमणे छातीवर घेऊन मिरवतो…. :-

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments