सौ. अमृता देशपांडे
☆ मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…भाग-3 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
बाबांचा पेशा वैद्यकीय, आयुर्वेदिक वैद्य.(BAMS) पुढे integrated courses करून शल्य चिकित्सक व भूलतज्ञ (anesthetist) ही झाले.
त्यांची बोटे हार्मोनियमवर जितक्या सहजतेने व चपळाईने फिरत तितक्याच किंबहुना जास्तच अचूकतेने आणि सावधपणे शस्त्रक्रिया करत असत. हार्मोनियम मधून मधुर स्वर निर्मिती होत असे तर शस्त्रक्रियेतून शरीराची व पंचप्राणांची दुरुस्ती होत असे.
एक 10-11 वर्षाची मुलगी चालत्या स्कूटरवरून पडली आणि कानापासून हनुवटीपर्यंतचा गाल चक्क कागद फाटावा तसा फाटला. तशीच तिला रक्तबंबाळ अवस्थेत CPR kolhapur ला आणले. बाबा होतेच तिथे. लगेचंच तिला OT मध्ये घेण्यात आलं. जवळ जवळ दोन तास ऑपरेशन चालू होतं. हळूहळू बरी झाली, तर एका महिन्यानं तिचे आईवडील तिला घेऊन हाॅस्पिटल मध्ये छान बरी झाली म्हणून भेटायला गेले.बाकीचे सगळे डाॅक्टर्स ही होतेच तिथे. तिचा फाटलेला गाल पूर्णपणे बरा झाला होता. गोरीपान मुलगी, गालावरची शस्त्रक्रिया म्हणजे आयुष्यभर तोंडावर टाके, आणि शस्त्रक्रियेची खूण कायमच रहाणार. कदाचित थोडी विद्रूपता येण्याचीही शक्यता. असाच ठाम समज झाला होता. पण तिच्या बाबतीत प्रत्यक्षात वेगळंच झालं होतं. बाबांनी इतर डाॅक्टर्सना सांगितली तिची case. पण तिला बघितल्यावर डाॅक्टर्स सगळे चकित झाले. OTच्या नर्सेस नी जेव्हा सांगितलं की तिचा पूर्ण गाल फाटला होता, पण सरांनी (बाबांनी) तो इतका नाजुकपणे आणि कम्मालीच्या सफाईने शिवला की, डाग किंवा विद्रूपता सोडाच, गालावरून एक लांब बारीक केस यावा असा भास होत होता. गोरा पान चेहरा, गुलाबी ओठ, एका गालावर खळी, आणि दुस-या गालावरचा हा केस सौंदर्यात आणखीच भर घालत होता.
सगळ्या डाॅक्टर्सनी अक्षरशः बाबांना दंडवत घातलं.
हाॅस्पिटल मध्ये शिस्त, स्वच्छता याबाबतीत बाबांची करडी नजर असे. दराराच होता म्हणा ना! पण प्रेम ही तितकेच होते. बाबांना बाकीचे डाॅक्टर्स डॅडी म्हणायचे.
बाबांना शस्त्रक्रियेतल्या कौशल्यासाठी नावाजले जात होते.
क्रमशः…
© सौ अमृता देशपांडे
पर्वरी- गोवा
9822176170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈