श्री सुनील शिरवाडकर

??

☆ देवपूजा… ☆ श्री सुनील शिरवाडकर

आमचे एक शेजारी होते. मला आठवतं ते रोज सकाळी दहा वाजता पुजेला बसायचे.अगदी साग्रसंगीत पुजा चालायची त्यांची.दोन अडीच तास.नंतर मग नैवेद्य वगैरे.त्यांची ही पूजा इतक्या वर्षांनंतरही.. म्हणजे जवळपास चाळीस वर्षांनंतरही मला आठवते यांचं कारण म्हणजे टीव्ही.त्यांचं देवघर  एक मोठ्ठा कोनाडा होता.इतका मोठा कि त्या कोनाड्यात ते स्वतः सुद्धा बसत.तर त्या मोठ्ठ्या कोनाड्यात त्यांनी एक छोटासा टीव्ही बसवुन घेतला होता.अगदी छोटा.. ब्लॅक अँड व्हाईट.एकीकडे पूजा.. मंत्र.. अभिषेक आणि दुसरीकडे टीव्ही बघणं.आरतीच्या वेळी मात्र तो टीव्ही बंद होई.

त्यांना या बद्दल बरेच जणांनी टोकलं.. टीकाही केली.पण त्यांच्यावर काही परीणाम झाला नाही.त्यांचं म्हणणं मी मनापासुन पूजा करतो.. माझ्या मनातला भाव महत्त्वाचा.. आणि माझा देव तो भाव जाणतो.त्यांची देवाला एकच प्रार्थना असायची.

‘तु पारोसा राहु नकोस..मला पारोसा ठेवु नको.’

याचाच अर्थ रोज स्नान करून तुझी पुजा करण्या इतपत मला फिट ठेव. आणि खरंच.. आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ते पुजा करत होते.स्नान करुन पूजा करण्याएवढी त्यांची शारीरिक क्षमता अखेरपर्यंत टिकून होती. देवानं त्यांची प्रार्थना ऐकली होती.

रोज पूजा करण्याचा नियम अनेकांचा असतोच.प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत वेगळी.. कालावधी वेगळा.कोणाची पुजा पंधरा मिनिटांत होते..तर कुणाला दोन तासही लागतात.कुणाला पुजा करताना मदतीसाठी बायको लागते.तिनं मागे बसुन गंध उगाळून द्यायचं..फुलं हातात द्यायचे..तीन पर्ण असलेली बेलाची पानं नीट निवडून द्यायची .काही जण पूजा झाली की तिथुन लगेच उठुन जातात ‌मग बायकोने बाकीचा पसारा आवरायचा.

एकाची पुजेची पध्दत काही औरच होती.तो ताम्हणात देव काढायचा.. आणि सरळ वॉश बेसिनखाली धरायचा अगदी भांडे विसळल्या सारखं.मग ते देव कोरडे करून हळदी कुंकु लावायचा..शिंपडल्या सारखं.फुलं वाहिली की झाली पुजा.

अलीकडे काहीजण खुर्चीत बसूनही पुजा करतात. गुडघ्यांच्या प्रॉब्लेम मुळे मांडी घालून बसता येत नाही. मग खुर्चीत बसायचं..आणि पुढे टी पॉय  ठेवायचा..त्यावर ताम्हाण..

मंदिरांमध्ये पूजा करण्याची पद्धत वेगळी असते. तिथे देवाच्या मुर्तीला रोज मंगलस्नान..म्हणजे पूर्ण अभिषेक घातला जात नाही. केली जाते फक्त पाद्यपुजा.फक्त एकादशी आणि सणांच्या दिवशी पुर्ण मूर्तीला अभिषेक केला जातो.

गुरुचरित्रात एका अध्यायात पुजे बद्दल विस्ताराने मार्गदर्शन केलं आहे.पुजेला बसण्यासाठी कोणतं आसन घ्यावं इथपासून त्यात सांगितलं आहे.पळी पंचपात्र कुठे ठेवावं.. निर्माल्य कसं काढावं..शंखपुजा,कलश पुजा, निरांजनाची पुजा करावी‌‌‌‌.. ही पूर्वतयारी झाल्यावर मग चारी दिशांचं पूजन करावं.पुरुष सूक्तामधील वेगवेगळ्या ऋचा म्हणत अभिषेक करावा.त्यातही कोणत्या क्रिया करताना ऋचा म्हणाव्या हेही सांगितलंय.

अभिषेक झाल्यानंतर फुलं कशी वहावी.. कोणत्या देवाला कोणती पुष्पें अर्पण करावी..कोणती वर्ज्य करावी हे सांगितलंय..काही फुलं ही दुसर्या दिवशी पण शिळी समजली जात नाही हे पण सांगितलंय.निरांजन ओवाळताना कोणता मंत्र म्हणावा ..सगळं सगळं विस्ताराने सांगितलंय.

इतकी शास्त्रशुद्ध पूजा आजच्या जमान्यात तशी कठीणच..पण जशी जमेल तशी पूजा आजही घरोघर होतेच.व्यंकटेश स्त्रोत्रात तर अगदी थोडक्यात पूजेचे सुंदर वर्णन केलंय.

करुनी पंचामृत स्नान.. शुद्धोदक वरी घालुन

तुज करु मंगलस्नान.. पुरुषसूक्ते करुनिया

वस्त्रे आणि यज्ञोपवीत.. तुज लागी  करु प्रित्यर्थ

गंधाक्षता पुष्पें बहुत.. तुजलागी समर्पूं

धूप दीप नैवेद्य.. फल तांबुल दक्षिणा शुद्ध

वस्त्रे भूषणे गोमेद.. पद्मरागादी करुनी

ऐसा षोडशोपचारे भगवंत.. यथाविधी पुजिला ह्रदयात

मग प्रार्थना आरंभिली बहुत.. वर प्रसाद मागावया.

पूजेचे असं वेगवेगळं वर्णन.. मार्गदर्शन बऱ्याच ग्रंथात आहे.अगदी तश्याच पध्दतीने पूजा झाली पाहिजे असं नाही.खरंतर कोणताच देव  पूजा करा म्हणत नाही.पूजा ही देवासाठी नसतेच मुळी.ती असते आपल्यासाठी.आपलं मन प्रसन्न करण्यासाठी.आपण या कारणाने देवापुढे तासभर बसतो.कधी अथर्वशीर्ष..कधी रुद्रातील मंत्र म्हणतो..देवाला स्नान घालतो.छान लाल सुती रुमालाने देवाचं अंग पुसतो.अष्टगंधाचा टिळा लावतो.. हळदीकुंकू लावतो..मग फुले वहातो..त्यानंतर धुपदिप.. नैवेद्य..आरती.

असं सगळं झाल्यावर मग देवघरातील देवाचं ते रुप..नजर हटत नाही त्यावरुन.कानात अजुनही ‘घालीन लोटांगण..’ मधील शब्द निनादत असतात..

अष्टगंध..अत्तर..उदबत्ती..रंगीबेरंगी सुवासिक फुले या सर्वांचा संमिश्र दरवळ.. देवाच्या कपाळावरचं ते ओलसर ताजं  गंध.. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे‌‌ देवाच्या चेहर्यावरंच मंद स्मित..ते प्रसन्न सुहास्य.जणु देव सांगत असतो..आता नि:शंक मनाने कामाला जा..मी आहे तुझ्यासोबत..

आणि साक्षात देव आपल्या सोबत असणं.. यापेक्षा अधिक आपल्याला काय हवंय? मानसिक बळ म्हणजे हेच तर असतं….. पूजा करायची ती यासाठी.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments