सौ उज्ज्वला केळकर

??

☆ परि तुझ्यावाचुनि करमेना… भाग – १ ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर ☆

माझी एक सख्खी मैत्रीण म्हणजे शुभदा साने. तशा आमच्या प्रत्यक्ष गाठीभेटी कमी होतात. पण आठवड्यातून एकदोनदा तरी फोन होतोच. दिलखुलास गप्पागोष्टी होतात. जून-जुलै च्या दरम्यान फोनमधून हमखास विचारणा असते, ‘कुठली कुठली बोलावणी आली…? काय काय झालं?’… बोलावणी म्हणजे दिवाळी अंकांची बोलावणी… साहित्य पाठवण्याविषयीचं पत्र आणि काय काय झालं, म्हणजे, काय काय लिहून झालं वगैरे… वगैरे… आम्हा मैत्रिणीत सगळ्यांत जास्त आणि सगळ्यात आधी बोलावणी तिला येतात. त्यामुळे हा काळ तिच्या दृष्टीने खुशीचा तसाच व्यस्ततेचाही असतो.

यंदा मात्र थोडंसं वेगळं घडलं. वेगळं म्हणजे काय? तर जूनअखेर अखेरच मला ‘मेहता ग्रंथजगत’ कडून पत्र आलं. फोनवर तसं तिला सांगितलं. ती म्हणाली, ‘हो का? कशावर लिहायचंय?’ मी म्हटलं, ‘माझा सहचर’… पत्र वाचल्यावर एकदम शाळेच्या दिवसांची आठवण झाली. म्हणजे शाळेत नाही का आपण निबंध लिहीत होतो? ‘माझी आई’, ‘माझी मैत्रीण, दादा, ताई, आजी-आजोबा इ.इ.’ माझं वाक्य पुरं होण्यापूर्वीच ती म्हणाली, ‘माझा मोत्या…’ आणि खिदळायला लागली. मग लगेच म्हणाली, ‘गंमत केली ग! पण त्याचा एक गुण आहेच तुझ्या मिस्टरांमध्ये…’ मी जरा विचारात पडले. म्हणजे माझ्यावरचं त्यांचं वसा वसा ओरडणं तिच्यापर्यंत पोचलं की काय? तशी मी सूज्ञपणे आणि संयमाने मैत्रिणीसमोर युध्दाचे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करत असते. तरी पण संगोवांगी तिच्यापर्यंत पोचलं की काय? पण ती गुण म्हणाली… की बदलत्या काळात अनेक बदलांप्रमाणे ‘गुण’ या शब्दाचाही अर्थ बदललाय? क्षणभरात एवढं सगळं माझ्या डोक्यात भिरभरून गेलं. एवढ्यात ती पुढे म्हणाली, ‘आज्ञाधारकपणा… तुमचे मिस्टर खूपच ऐकतात बाई तुमचं… आमच्याकडे नाही बाई असं…’ मला वाटतं, प्रत्येक नव-याला शेजा-याची बायको जास्त देखणी वाटते, तसं प्रत्येक बाईला दुसरीचा नवरा जास्त शहाणा, समंजस, समतोल विचारांचा, मुख्य म्हणजे तिच्या मुठीत रहाणारा वाटतो. निदान माझा सहचर असा आहे, याबद्दल माझ्या सगळ्या मैत्रिणींची शंभर टक्के खात्री आहे आणि तसं काही नसलं, तरी तसंच आहे, हे इतरांना पटवून देणं माझ्या सहचराला छानच जमतं. म्हणजे, तुलना केलीच तर सृजनाची प्रतिभा माझ्यापेक्षा त्याच्याकडे जास्त आहे. आता ते फक्त लिखाणातून नाही, तर बोलण्यातून, वाणीतून जास्त प्रसवतं एवढंच!

त्यानंतर एकदा आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र जमलो होतो. साहित्यकलेपासून राजकारण… क्रीडेपर्यंत सगळ्या विषयांना पालाण घालून झाल्यावर गप्पांना खरा रंग भरला, तो आमच्या यांना.. आमच्या घरात… आमची मुलं… असं नि तसं सुरू झाल्यावर, आता माझ्या सगळ्याच मैत्रिणींना वाटतं, आमचे हे म्हणजे सद्गुणांचा पुतळा… मग मी म्हणून टाकलं,

‘आमच्या सुखी आणि समृध्द सहजीवनाचं मधुर पक्व फळ

चाखत माखत खातोय आम्ही गेली कित्येक वर्षं….’

‘याचं रहस्य?’ एकीने लगेच टोकलं. म्हटलं,

‘रहस्य कसलं त्यात? आमच्या घरात नेहमीच घडतं माझ्या इच्छेप्रमाणे…’

‘तेच तर आम्ही म्हणतो…’

सगळ्यांनी एकदमच गिल्ला केला.

‘थांबा… थांबा… पुरतं ऐकून घ्या…’

मी त्यांना थांबवत म्हणते.

‘आमच्या घरात नेहमीच घडतं  माझ्या इच्छेप्रमाणे

जेव्हा एकमत असेल तेव्हा

आणि घडतं त्यांच्या इच्छेप्रमाणे

दुमत असेल तेव्हा…’

क्षणभर त्या गोंधळल्याच. ‘बंडल मारू नका’ त्या एकदमच म्हणाल्या. ‘शप्पथ!’ मी म्हटलं. हे हे आत्ता म्हटलं ना, ते सुध्दा त्यांचंच म्हणणं आहे. मी आपली कवितेच्या फॉर्ममध्ये त्याची मांडणी केली, एवढंच!

विद्येचे माहेरघर असलेल्या आणि साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं केंद्रबिंदू असलेल्या पुण्यनगरीतून १९६५ साली, लग्न होऊन मी माधवनगरला आले. गाव सांगलीपासून तीन-चार मैलावर, पण वहातूक व्यवस्था फारशी नव्हती. अधूनमधून येणा-या महामंडळाच्या बसेस किंवा मग टांगे. टू व्हिलर म्हणजे सायकलीच प्रामुख्याने. घराघरात स्कूटर्स दिसायचा काळ अद्याप खूपच दूर होता. त्यामुळे सांगलीला होत असलेल्या कार्यक्रमांचा मला फारसा उपयोग नसे.

घर मोठं होतं. बारा पंधरा माणसं नित्याचीच. येणं जाणंही खूप असे. घरात माणसांचा तसाच कामाचाही खूपच धबडगा असे. गृहस्थाश्रमाच्या रहाटगाडग्यात उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त काम आणि कामच असे. मन-बुध्दीला, विचार, कल्पनाशक्तीला तसा विश्रामच असे. माय स्पेस किंवा माझा अवकाश याबद्दल आज जे सातत्यानं बोललं जातं, तो मला त्यावेळी बिंदूतसुध्दा मिळत नव्हता. नाही म्हणायला, गावात ब-यापैकी असलेले वाचनालय आणि महिला मंडळ हे हिरवळीचे तुकडे होते. ‘वंदना’ हे वार्षिक हस्तलिखित मंडळातर्फे निघत असे. त्याचं संपादन, महिला मंडळासाठी बसवायचे कार्यक्रम यातून थोडीफार कल्पनाशक्तीला चालना मिळायची.

मला आठवतंय, मी माझी पहिली कथा ‘वंदना’ हस्तलिखितासाठी लिहिली होती. पण ते सारं कधीमधी. रोजच्या जीवनात माझ्या शिक्षणाशी संबंधित असं काहीच नव्हतं. यामुळे होणारी माझी घुसमट यांच्या लक्षात आली. (आमचा काळ हा, हे अहो… जाहोचा! इकडून तिकडून पुढे एक पाऊल पडलेलं. सर्रास ‘अरे तुरे… चा काळ यायला अजून वीस-पंचवीस तरी वर्षं लागणार होती.) लग्नानंतर दुस-या वर्षी मला बी.एड्. ला जाणार का? म्हणून विचारलं. त्या वेळी शिक्षकी पेशाविषयी आस्था वा आकर्षण म्हणून नव्हे, तर स्वयंपाकघर-माजघर, उंबरठा-अंगण या परिघाबाहेर पाऊल टाकायची संधी मिळणार, म्हणून मी ‘होय’ म्हणून टाकलं. सकाळी कॉलेज, दुपारी पाठ, एवढं सोडून जागं असलेल्या वेळात घरकाम, त्यामुळे खूप फरफट झाली. पण मजाही खूप वाटली. शारीरिक ओढाताण झाली, तरी मन प्रसन्न, टवटवित राहिलं. कॉलेजमधील विविध कार्यक्रम, पाठाची तयारी यात कल्पकतेला खूप वाव मिळायचा. त्यावेळी जरी मी घराबाहेर पडण्याची संधी एवढ्याच दृष्टीने बी.एड्. कडे पाहिलं असलं, तरी पुढच्या आयुष्यात मला त्याचा खूप फायदा झाला आणि ते करायला सुचवलं होतं माझ्या सहचराने.

– क्रमशः भाग पहिला 

© सौ उज्ज्वला केळकर

संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments