श्री अमोल अनंत केळकर
☆ मनमंजुषेतून ☆ विविध गुणदर्शन ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆
मंडळी नमस्कार ?
शाळेत असताना आमचे काही सगळ्यात आवडते दिवस असायचे ते म्हणजे २६ जानेवारी, १५ ऑगष्ट, शेवटची मारुती पूजा आणि विविध गुणदर्शन/स्नेहसंमेलन (तसं आम्ही आमचे विविध गुण शाळेत दररोजच उधळायचो म्हणा). आजच्या अनेक यशस्वी ठरलेल्या कलाकारांनी आपली कला सर्वप्रथम कुठे सादर केली असेल तर माझ्यामते शाळेत.
‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ हे कितीही खरे असले तरी ती कला सादर करायला त्यांना पहिला प्लँटफॉर्म शाळेने दिला हे अनेक जण मान्य करतील.
शाळेच्या वार्षिक स्पर्धा मग त्या मैदानी असू देत किंवा बौद्धिक अनेकजण यात भाग घ्यायचे. गायन, वक्तृत्व (अजूनही हा शब्द मला बरोबर लिहिता आला तर शपथ !), निबंध, धावणे, पोहणे, खो-खो, बुध्दीबळ, रिले-रेस आणि अनेक स्पर्धा. यात ज्यांनी सातत्य राखले, ज्यांना आवडीच्या गोष्टीत अजून पुढे जायची इच्छा झाली त्यांनी पुढे ती कला जोपासली. मग कॉलेज, जिल्हा स्तरीय स्पर्धा, गणेशोत्सव वगैरे निमित्ताने अनेकांचा उदयोन्मुख कलाकार ते प्रसिध्द कलाकार किंवा खेळाडू असा प्रवास झाला. अनेकजणांची किर्ती वटवृक्षाएवढी मोठी झाली पण याचे मूळ मात्र नक्कीच शाळेत रुजले गेले असं म्हणणे वावगे ठरणार नाही. अनेकजण ते मान्य ही करतील.
वार्षिक स्पर्धांचे वेळापत्रक लागले की कुठे कुठे आणि केंव्हा केंव्हा कुठल्या कुठल्या स्पर्धेत भाग घेता येईल याची चाचपणी व्हायची.प्रामुख्याने सकाळच्या सत्रात मैदानी स्पर्था आणि दुपारी गाणे/स्तोत्र पठण/चित्रकला/निबंध अशा पध्दतीने स्पर्धांचे आयोजन व्हायचे. ‘कृष्णा नदीत’ पोहण्याची स्पर्धा हे एक आमच्या शाळेचे वैशिष्ट्य असायचे. त्यावेळीही मॅक्झीमम् स्पर्धेत भाग कसा घेता येईल हे बघीतले जायचे.
ब -याचदा नंबर यायचा नाही. पण यामुळे फार काही कधी दुःखे झालो नाही. ही प्रोसेस मात्र भरपूर एन्जॉय केली जायची, सगळ्यांकडूनच. स्पर्धा संपल्या की एक दिवस शाळेत जेवणाचा कार्यक्रम असायचा. सगळ्या मित्रांसमवेत ‘स्नेह भोजन’ याची मजा काही अनोखी असायची. त्यानंतर पारितोषेक वितरण आणि बहुतेक त्याच दिवशी संध्याकाळी विविध – गुण दर्शनाचा कार्यक्रम असायचा. नाटके, मिमिक्री, डान्स, गाणे आणि बरेच काही सादर होऊन हा ‘अनुपम्य सोहळा ‘ संपायचा आणि सगळेजण (मी सोडून) वार्षिक परीक्षेच्या तयारीला लागायचे.
हेच विविध गुण दर्शन पुढे कॉलेज मध्ये ही सुरु राहिले. इकडे जरा तारुण्याची शिंगे फुटली होती. स्तोत्र पठणाच्या जागी “फिश पॉन्ड” ? आले होते. ‘रेकॉर्ड फिश पॉन्ड’ नामक प्रकार कळला, आणी आमच्या टवाळखोरीला चार चाँद लागले.
संबंध वर्षात एखाद्या मित्राच्या (मैत्रीणींच्या च जास्त) स्वभाव/गुण/घटना यावर समर्पक ओळी लिहिणे. किंवा तिला/त्याला उद्देशून गाणं लावणे या साठी अभ्यास करु लागलो. यात कॉलेजचे प्रोफेसर/प्राचार्य मंडळीही सुटायची नाहीत. नवीन आलेल्या मुलीसाठी – “कुण्या गावाचं आलं पाखरू” हे गाणं लागलं नाही तर फाॅल व्हायचा. “पापा कहते हे बडा नाम करेगा/खुद्द को क्या समजती है/क्या अदा क्या नखरे तेरे पारो” वगैरे गाणी फिक्स असायची, ती कुणाच्या नावे हे फक्त दरवर्षी बदलायचे.
काही फिश-पाॅन्ड ?
ची यानिमित्याने फक्त उजळणी
जिवलग मैत्रीणींसाठी :-
आम्ही दोघी मैत्रिणी जिद्दीच्या,जिद्दीच्या,
हातात वह्या रद्दीच्या,रद्दीच्या
ज्याचा तास कळत नाही अशा शिक्षकास:-
अजीब दास्तां है ये,
कहां शुरु कहां खतम,
ये लेक्चर है कौनसा,
न वो समझ सके न हम..
खालील ‘फिश- पाॅन्ड’ कुणासाठी ते तुम्हीच ठरवा:-?
करायला गेली रक्त दान
करायला गेली रक्त दान
डॉक्टर म्हणाले बाटली नाही चमचा आण…
कोण म्हणत मी खड्ड्यात पडले,
मी पडले म्हणून खड्डा पडला.
म्हणतो मुलींना चल आपण वडापाव खाऊ.
म्हणतो मुलीना चल आपण वडापाव खाऊ.
.
.
कँटीन मधे गेल्यावर मुली म्हणतात
किती माझा चांगला भाऊ…….
उठे सबके कदम
तर रम पम पम
कभी ऐसे मार्क्स लाया करो
कभी झिरो कभी वन
कभी उससे भी कम
कभी तो पास होके आया करो. ?
जिथे असतील फुकटच्या पार्ट्या
जिथे असतील फुकटच्या पार्ट्या
तिथे भेटतील ह्या दोन कार्ट्या
मंडळी,
काय तुम्हाला काही पडलेले का
“फिश -पॉन्ड “? किंवा तुमच्या खास मित्र- मैत्रिणीना?. लिहा की मग कमेंट मध्ये खाली
तर मंडळी आजच्या टवाळखोरीचा शेवट आम्हाला ११ वी का १२ वीला आमच्या “सांगली कॉलेज “मध्ये पडलेल्या (फारच टुकार) फिश-पॉन्डने
“स्वप्नात आली जुही चावला. उठून बघतो तर ढेकूण चावला”
तेव्हा पासून खरं म्हणजे आम्ही कुठलीही गोष्ट चावली की लगेच खाजवायला….. ?
फिशो आपलं असो
(स्तंभ लेखक) अमोल केळकर ?✌?
(इथे आम्ही उधळलेले विविध -गुण वाचायला मिळतील) >>poetrymazi.blogspot.com
© श्री अमोल अनंत केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com